बदलत्या युगातील आयुर्वेदाचे महत्त्व | पुढारी

Published on
Updated on

डॉ. आनंद ओक

बदलत्या जीवनशैलीत ताणतणाव हा प्रत्येकाच्या बाबतीत अविभाज्य भाग बनू लागला आहे. यामुळेच अनेक विकारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या विकारांवर आयुर्वेदीय पद्धतीने चिकाटीने औषधे, पथ्यपालन, स्नेहन, स्वेदन, विरेचन बस्ति, शिरीधारा इ. पंचकर्मानी शरीरशुद्धी, नियमित योगा व प्राणायामाने उत्तम नियंत्रण मिळवता येते.

आहाराच्या सवयी, आहाराचे स्वरूप बदलत आहे. दैनंदिन कामानिमित्त प्रवास नियमित होऊ लागला आहे. राहणीमानात झालेला बदल आणि राहणीमानाचा दर्जा टिकविण्यासाठी करावी लागणारी धडपड स्पर्धेेच्या युगात अर्थार्जनासाठी  करावे लागणारे जादा काम वाढतच चालले आहे. दैनंदिन वाढत गेलेल्या गरजा पुरवण्यासाठी वाढलेल्या महागाईत अधिकाधिक संघर्ष करावा लागत असून, या संघर्षातूनच वाढणारा ताणतणाव बदलत्या जीवनशैलीत अटळ बनला आहे. या सर्वांचाच एकत्रित परिणाम माणसाच्या आरोग्यावर होऊ लागला आहे आणि त्यामुळे काही विकारांचे प्रमाण वाढू लागले आहे. या वाढत चाललेल्या विकारापैकी अनेक विकारात आयुर्वेद उपचार उत्तम काम करतात, असे अनुभवास येते.

शरीर स्वास्थ्य समजून घ्या :

हल्‍ली माझी तब्येत ओके आहे का? यासाठी 14-15 हजार रुपये खर्चून सर्व रिपोर्ट, बॉडी चेकअप करण्याची पद्धत आहे. आपणाला होणार्‍या विकारांचा प्रतिबंध करण्यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी ते उपयुक्‍तही आहे, पण केवळ सर्व रिपोर्ट नॉर्मल आले म्हणजे मी स्वस्थ किंवा पूर्ण हेल्दी आहे असे समजू नये.

आपण खरंच ओके आहेत का?

'समदोष : समाग्‍निश्‍च समधातू मलक्रिया प्रसन्‍नात्मात्मेंन्द्रिय मन:स्वस्थ इत्याभिधीयते। माझ्या शरीरातील वातांचे, पित्तांचे कफांचे प्रमाण व्यवस्थित आहे ना? ते कमी-जास्त नाही ना? त्याची कामे नीट होतात की नाही, मला नियमित भूक लागते का? पचन नियमित व्यवस्थित होते का? मी खाल्‍लेले अन्‍न माझ्या अंगी लागते का? माझ्या शरीरातील रस, रक्‍त, मांस, मेद, अस्थिधातू, मज्जा, शुक्रधातू यांचे प्रमाण नॉर्मल आहे का? या धातूंची कामे कशी आहेत, माझे पोट रोज नीट साफ होते का? माझी लघवी साफ होते का आणि हे सर्व नीट असण्याबरोबरच माझे मन आनंदी, उत्साही, सात्विक आहे ना? या प्रश्‍नांच्या उत्तरावर आपण किती ओके आहोत याचा पडताळा नजीकच्या वैद्याच्या मदतीने एकवेळ तरी करून घ्यावा.

वाढत चाललेले पचनविकार

तेलकट, तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, बाहेरचे पदार्थ, खाण्याची वाढलेली सवय, चहा कॉफी मद्यपानाचा वापर, वेळी-अवेळी खाणे, सतत धावपळ,  वाढलेला तणाव या सर्वांमुळे पित्तविकार तर अनेकांना वाढू लागला आहे. जळजळ, मळमळ,  पोट फुगणे, जड राहणे, अस्वस्थता, शौचाला साफ न होणे, चिडचिडेपणा, निरुत्साह या दुष्परिणामांनी त्रस्त माणसे अनेक तपासण्या करतात. आधुनिक रासायनिक औषधे घेतात त्यामुळे तात्पुरते बरे वाटले तरी अनेकदा या पित्ताच्या गोळीची सवय जडलेली असते. यामुळे पित्त जाणवत नसले तरी हे रोज दडलेले पित्त नंतर उच्च रक्‍तदाबासारख्या विकाराला निमंत्रण देऊ शकते. या पचन विकारांवर आयुर्वेदीय पद्धतीने चिकाटीने औषधे, पथ्यपालन, स्नेहन, स्वेदन, विरेचन बस्ति, शिरीधारा इ. पंचकर्मानी शरीरशुद्धी, नियमित योगा व प्राणायाम यांच्या मार्गदर्शनाने उत्तम नियंत्रण मिळवता येते हे निश्‍चित.

बदलत्या जीवनशैलीत आहाराची काळजी

आपला आहार नियमित, समतोल, पोषक, ताजा असावा याकडे लक्ष द्यावे. आवडीनिवडींना रोज महत्त्व न देता शुद्ध. सात्विक आणि चांगल्या ठिकाणी बनवलेला असावा. फास्ट फूड, चौपाटीवरील पदार्थ यांना जेवणाची जागा कधीही देऊ नये. डाएटिंगच्या फॅडमुळे आपण शरीराचे कुपोषण तरी करीत नाही ना, याचा प्रत्येकाने विशेषतः मुलींनी विचार करणे महत्त्वाचे वाटते. शरीराचे वजन जास्त असू नये, हे खरे असले तरी दैनंदिन कामाला पुरेल एवढी एनर्जी तरी मिळावी, एवढा आहार तरी नियमित घ्यावा. पथ्य पाळणेही महत्त्वाचे असले तरी पथ्याचा अतिरेक देखील नको.

वाढलेले तणाव – वाढलेले विकार

बदलत्या जीवनशैलीत ताणतणाव हा प्रत्येकाच्या बाबतीत अविभाज्य भाग बनू लागला आहे. यामुळेच अनेक विकारांचे प्रमाण वाढत चालले आहे. डोकेदुखी, पित्तविकार, झोपेच्या तक्रारीपासून पचनबिघाड, उच्चदाब, मधुमेह, हार्मोन्सचे असंतुलन, पाळीच्या तक्रारी, थायरॉईडचे विकार, चिडचिडेपणा, सौंदर्य समस्या, अशक्‍तपणा, कमजोरी यासारखे अनेक विकार निर्माण करण्यास आणि वाढण्यास तणाव हेच कारण दिवसेंदिवस जास्त मदत करीत आहे. अनेकजण या विकारांवर विविध उपचार घेत असतात, पण तणाव नियंत्रणाकडे पुरेसे लक्ष देत नाहीत असे आढळते. वास्तविक उत्तम तणाव नियंत्रण झाल्यावरच हे विकार चांगले आटोक्यात राहतात. 

मणका विकारांचे वाढते प्रमाण –

दैनंदिन कामे, नोकरी व्यवसायातून येणारा ताण, सततचा अटळ बनलेला प्रवास, दिवसभरात थोडीही न मिळणारी विश्रांती यामुळे मणक्यावरील ताणाचे प्रमाण वाढू लागले. याचबरोबर चुकीच्या आहारामुळे एकतर शरीराला विशेषत: हाडांना होणारे कुपोषण, कॅल्शियमसारख्या घटकांची कमतरता यामुळे मणक्यांची ताण सहन करण्याची क्षमता कमी झालेली असते किंवा काहीजणात अति वजन वाढल्यामुळे वाढलेल्या चरबीचा मणक्यावर येणारा ताण याच्या परिणामी मानदुखी, कंबरदुखी, सायटिका, डिस्कप्रोलॅप्स किंवा मणक्यातील  गॅप, मणक्यातील सांध्यांना सूज, हातापायाला मुंग्या, बधीरपणा यांचे प्रमाण जास्तीत जास्त वाढत चालले आहे. यावर केवळ वेदनाशामक, पेनकिलर, कॅल्शियम घेणे, ट्रॅक्शन लावणे यापेक्षाही आयुर्वेदीय पद्धतीने शास्त्रीय संयुक्‍त आयुर्वेदिक औषधे, मसाज वाफेचा शेक, पिंडस्वेद, कटीबस्ती, बस्ती इ. पंचकर्म, नियमित व्यायाम, उपयुक्‍त योगासने आणि याचबरोबर आपल्या दैनंदिन वर्तणुकीत बदल करून काळजी घेणे या सांघिक उपचारांचा वाढत चाललेल्या मणक्याच्या विकारांवरील नियंत्रणासाठी उत्तम उपयोग होतो.

हार्मोन्सचे असंतुलन आणि थायरॉईडचे विकार –

बदलत्या जीवनशैलीतील धावपळ, अत्याधिक तणाव आणि चुकीच्या आहार सवयींचा दुष्परिणाम शरीरातील विविध हार्मोन्सवर होत आहे. यामुळे अनेक तक्रारी उद्भवत असल्याचे आढळते. अतिकृशपणा, अतिस्थूलपणा, मासिक पाळीची अनियमितता, पाळी न येणे, स्त्रीबीज उत्पत्ती बिघाड, वंध्यत्व यापासून ते चेहर्‍यावरील पिंपल्स, केसांच्या तक्रारी आणि मानसिक अस्वस्थता, टेन्शन, चिडचिडपणा, भीती, आत्मविश्‍वास कमी होणे इ. पर्यंत अनेक बिघाड यामुळे होऊ शकतात. थायरॉईड ग्रंथीच्या बिघाडामुळे वाढत चाललेल्या हायपोथायरॉईडिझमच्या विकारात अंगावर सूज, खूपच वजन वाढणे, जडपणा, सुस्ती, कंबरदुखी, अंगदुखी, विसराळूपणा, केस गळणे, चिडचिडेपणा या तक्रारी असतात. 

काही जणांत या विकारात आधुनिक गोळी नियमित घेऊनही रिपोर्टस नॉर्मल होतात. परंतु, त्रास पूर्णपणे कमी होत नाही. अशावेळी आयुर्वेदीय उपचारांची जोड अतिशय उपयोगी पडते. आयुर्वेदातील मसाज, औषधी वाफेचा शेक, बस्ती, विरेचन, शिरोधारा हे पंचकर्म आणि पुनर्नवा, गोखरू, निरगुडी, त्रिकूट, रास्ना, देवदार, एरंड, वचा, कांचनार, कुंभा, मंडूर, ताम्र, वंग, कुकुटांडत्वक भस्म. इ. पासून केलेल्या औषधांचा नियमित वापर तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने करावा. याबरोबरच नियमित व्यायाम, योगासने आणि आहाराची पथ्ये कटाक्षाने पाळल्यावर थायरॉईडचा विकार उत्तम नियंत्रणात राहतो.

व्यायाम आणि प्राणायाम महत्त्वाचे

आपली प्रकृती, वजन, असणारे विकार, सुरू असणारा ऋतू आणि दिवसभरातील शरीरावर येणारा दैनंदिन कामाचा ताण याचा विचार करून आपले व्यायाम निश्‍चित करा. अनुकरण करू नका. व्यायाम हा नियमित असणेही तितकेच महत्त्वाचे. आपल्या व्यायामातून आपण शरीरातील कोणत्याही अवयवावर जादा ताण तर देत नाही ना? याचाही विचार करावा. शरीरातील हृदय, फुफ्फुस, पोटातील अवयव, मेंदू इ. महत्त्वाच्या भागांना अत्यंत उपयुक्‍त असणारा प्राणायामदेखील एकवेळ तज्ज्ञांकडून शिकून घेऊन नियमित आणि प्रमाणात केल्यासारखी सर्व शरीरोपयोगी क्रिया नाही. त्यामुळे थोडा वेळ का होईना, प्रत्येकाने प्राणायाम करावा.

विकार प्रतिबंधाला महत्त्व देणे गरजेचे :

बदलत्या जीवनशैलीत कोणतेही विकार होणे हे अधिक तोट्याचे असल्याचे लक्षात येते. विकाराच्या निदानासाठी कराव्या लागणार्‍या तपासण्या, त्यानंतर करावे लागणारे उपचार, शस्त्रक्रिया, अ‍ॅडमिट व्हावे लागणे या सर्व गोष्टी आजच्या काळात अधिक खर्चिक झालेल्या आहेत. त्यामुळे येणारा आर्थिक त्रास आणि विकारामुळे होणारा शारीरिक त्रास अनेकदा मनस्वास्थ्य बिघडवीत असतो.

या प्रतिबंधासाठीच दिनर्चा, ऋतुचर्या, सदवृतपालन, नियमित व्यायाम, प्राणायाम, योगासने, पथ्यपालन अशा अनेक गोष्टी आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत. स्वत:ची प्रकृती आणि वयानुसार कोणता आहार ठेवावा या गोष्टीलाही महत्त्व आहे. प्रत्येकाने नजीकच्या आयुर्वेद तज्ज्ञांकडून या सर्वांचे एकदा तरी सविस्तर मार्गदर्शन घ्यावे असे वाटते. या मार्गदर्शनाचे काटेकोर पालन केल्यावर भविष्यात बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणार्‍या विकारांची फारशी भीती राहणार नाही. जो आरोग्याचे रक्षण करतो त्याचे रक्षण आरोग्य करते, हेच कायम लक्षात ठेवावे.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news