

थायरॉईड ग्रंथी शरीरातील चयापचय क्रिया नियंत्रित करण्याचे काम करतात. या ग्रंथींचे कार्य योग्य प्रकारे होत नसेल, तर आरोग्याच्या अनेक तक्रारी भेडसावतात. थायरॉईड ग्रंथींचे असंतुलन दोन प्रकारचे असते. पहिल्या अवस्थेत थायरॉईड ग्रंथींमधून कमी प्रमाणात संप्रेरके स्रवतात, त्याला हायपोथायरॉईडिझ्म म्हणतात; तर दुसर्या अवस्थेत थायरॉईड ग्रंथींमधून अधिक प्रमाणात संप्रेरके स्रवतात. त्याला हायपोथायरॉईडिझम म्हणतात. थायरॉईड विकारामुळे जर वजन वाढत असेल, तर आपल्याला हायपोथायरॉईडिझम आहे.
सर्वप्रथम तपासणी करा ः वजन वाढणे हे काही फक्त थायरॉईडचे लक्षण असते असे नाही. त्यामुळे थायरॉईडची तपासणी करून घ्यावी. त्यामधून थायरॉईड असल्यास त्याचा कोणता प्रकार आहे ते समजून घेता येईल. अंडर अॅक्टिव्ह थायरॉईड की ओव्हरअॅक्टिव्ह थायरॉईड यापैकी कोणता आहे हे समजून घेता येईल. या तपासणीच्या निष्कर्षानंतरच पुढे काही मार्ग आखता येईल. इतरही काही गरजेच्या तपासण्या करून डॉक्टर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कशा प्रकारची जीवनशैली अंगीकारावी याविषयी मार्गदर्शन करू शकतील तसेच उपचारांची दिशा देखील ठरवता येईल.
थायरॉईडमध्ये वजन कमी करण्यासाठी शरीराला योग्य पोषण मिळण्याबरोबरच आहाराच्या काही सवयी बदलाव्या लागतील. नियमित व्यायामाबरोबर आहार कमी करून त्याऐवजी उकडलेल्या भाज्या, सलाड यांचे सेवन करावे. याशिवाय मिठाचा वापर अत्यंत कमी करायला हवा.
वजन कमी करण्यासाठी अनेक जण ‘ग्रीन टी’ चा वापर करतात. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी त्याची मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रियाही वेगाने होते; पण थायरॉईडच्या विकारात ग्रीनटीचे सेवन हानिकारक ठरू शकते, असे काही अभ्यासांतून दिसून आले आहे. त्यामुळे याबाबत वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.
थायरॉईड विकारामध्ये स्थूलपणा वाढण्याचे मोठे कारण म्हणजे औषधांमधील अनियमितता. त्यामुळे थायरॉईड असेल तर गोळ्या घेण्याची एक वेळ ठरवा आणि त्याच वेळेला औषधे घ्यावीत. मुख्य म्हणजे गोळी घेणे विसरता कामा नये.
थायरॉईडच्या विकारात आहारात उकडलेला बटाटा, रताळे यांचे सेवन आपण करू शकतो. याच्या सेवनाने शरीराला कोलेस्ट्रॉल कमी मिळते; पण पोटॅशिअम भरपूर प्रमाणात मिळते, जे थायरॉईड विकारात आवश्यक असते. या दरम्यान पांढरा तांदूळ खाण्याऐवजी ब्राऊन राईसचे सेवन करावे. त्याशिवाय तंतुमय घटकांसाठी मोडाची कडधान्ये, डाळी सेवन कराव्यात. बी जीवनसत्त्वासाठी दही, दूध, फळांचे रस तसेच सुकामेवा सेवन करू शकता. कॅफिनयुक्त पदार्थ, ग्लुटेनयुक्त आहार, फास्टफूड तसेच गोड पदार्थांचे सेवन करू नये.