मृणाल सावंत
त्वचेवरील केसाची रंध्रे आणि तैलग्रंथी यांच्यामुळे त्वचेवर फोड येतात. सुरुवातीला त्वचेवर लाल डाग पडतात आणि त्यानंतर फोड मोठे होतात, मग त्यात पू साठतो. ज्या व्यक्ती आपल्या आहाराकडे नीट लक्ष देत नाहीत आणि स्वच्छता बाळगत नाहीत, त्यांना फोडांचा त्रास अधिक होतो. त्वचा कापली गेली किंवा साले निघाली तरीही फोड येऊ शकतात. काही उपायांच्या मदतीने हे फोड बरे होऊ शकतात, तसेच ते जास्त मोठे होणे थांबवता येते. त्वचेवरील फोड बरे होण्यासाठी साबण तसेच प्रतिजैविके यांचा उपाय केला जातो. तसेच शल्यक्रिया हादेखील उपाय केला जातो.
कपडे : आपल्या कपड्यांकडे नीट लक्ष द्यावे. शरीराला चिकटणारे आणि गैरसोयीची कपडे घातल्यास अनेकदा फोड येतात. असे कपडे सतत घातल्याने त्वचेचे खूप नुकसान होते. त्वचेवर फोड येण्यास कारण ठरते.
कापणे किंवा त्वचा सोलणे : कापणे किंवा त्वचा सोलवटणे यामुळे जो संसर्ग होतो त्यामुळेही त्वचेवर फोड येऊ शकतात. कापणे, सोलवटणे यामुळे शरीरात जीवाणू प्रवेश करतात. त्वचा कापली किंवा इजा झाल्यास तो भाग स्वच्छ करून संसर्गापासून बचाव करता येऊ शकतो. इजा स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि साबण यांचा वापर करावा. जखम चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यासाठी त्यावर जीवाणूरोधक मलम जरूर लावावे.
दबाव : एकाच जागी टेकून बसल्याने त्वचेवर फोड येऊ शकतात. असे फोड येणे रोखण्यासाठी एक गोष्ट करता येते ती म्हणजे ज्या जागी फोड येतात त्या भागावर कमीत कमी दाब टाकावा. त्वचारंध्रांची जळजळ होत असल्यास त्वचेच्या त्या भागावर दबाव टाकू नका. त्वचेचा जळजळ होणारा भाग गरम पाण्याने स्वच्छ करून घ्या आणि सुकवून घ्या.
प्रतिजैविकांचा वापर : ज्या व्यक्तींना हायड्राडेनिटिस सपराटिव्हा नावाचा आजार आहे, त्यांना प्रतिजैविके द्यावी लागतात. कारण, या स्थितीत त्वचेवरील फोड पुन्हा येण्याची शक्यता असते. सिस्टिक अॅक्नेमुळे त्वचेवरील फोड बरे करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर केला जातो. फोड मुळापासून काढून टाकण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर दीर्घकाळ करावा लागतो.
शल्यक्रिया : वरील सर्व उपाय करूनही फायदा होत नसेल तर एकच उपाय शिल्लक राहतो, ते म्हणजे शल्यक्रिया. त्वचेचे फोड बरे होण्यासाठी हा खूप महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे. यामध्ये फोड येणार्या जागी अंतर्गत घाम येणार्या ग्रंथी काढून टाकल्या जातात.