विविध प्रकारच्या तेलांच्या भाऊगर्दीत आपण पुर्वजांच्या वापरात असलेले मोहरीचे तेल विसरूनच गेलो आहोत; मात्र मोहरीचे तेल हृदयासाठी सर्वोत्तम आहे.
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या मते मोहरी, ऑलिव्ह किंवा कॅनोला तेल हृदयासाठी सर्वात चांगले आहे. एफडीएच्या मते आहारात या तेलांचा वापर केला तर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका दूर राहतो. या तेलांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो. काही अभ्यासातून एफडीएने हा दावा केला आहे.
अमेरिकन सरकारने आता तेलाच्या लेबलवर आरोग्यावर पडणारा प्रभाव याविषयी लिहिण्याची परवानगी दिली आहे. अर्थात निकष पाळताना या तेलांमध्ये कमीत कमी 70 टक्के ओलेईक अॅसिड असावे लागते. आहारात पौष्टिकता वाढवणे आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने उचललेले हे सकारात्मक पाऊल आहे, असे म्हणावे लागेल. एफडीएच्या मते रोज ओलेईक अॅसिड असलेले तेल 20 ग्रॅम प्रमाणात वापरले तर हृदयाच्या आजाराचा धोका कमी होतो. अर्थात तेलाच्या लेबलवर हे स्पष्टपणे नमूद करावे लागणार आहे की, या तेलांचा फायदा होण्यासाठी लोकांना जास्त सॅच्युरेटेड फॅट असलेले तेल बदलावे लागणार आहे. तसेच दिवसभरात जितक्या कॅलरीचे सेवन केले जाते त्यादेखील सीमित ठेवाव्या लागणार आहेत.
मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड हा एक प्रकारचा अनसॅच्युरेटेड फॅटी आहार आहे. त्यात चांगल्या मेदाबरोबरच इतर अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे होतात. डॉक्टरांच्या मते भारतात जी तेले उपलब्ध आहेत, त्यातील ऑलिव्ह तेलामध्ये सर्वाधिक ओलेईक अॅसिड असते. त्या खालोखाल कॅनोला, मोहरी आणि शेंगदाणा तेल यांचा क्रमांक लागतो.
डॉक्टरांच्या मते एफडीएने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मोनोसॅच्युरेटेड फॅटस् आरोग्यासाठी चांगले असतात या दाव्याला पुष्टी मिळेल. भारतात तेल आणि फॅट याबाबतीत अनेक गैरसमज आहेत. अनेक लोक सॅच्युरेटेड फॅटस् असलेली तेले वापरण्याचा सल्ला देतात; पण या तेलांमुळे यकृताचे कार्य आणि चयापचय क्रिया खराब होते.
– विजयालक्ष्मी साने