Parenting Tips : टीनएजर्स 'प्रायव्हसी' मागत असतील तर पालकांनी काय करावं?
टीनएज म्हणजे आयुष्यातला एक नाजूक आणि निर्णायक टप्पा. या वयात मुलं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदलांचा अनुभव घेत असतात. या प्रवासातच त्यांना स्वतःची ओळख, स्वतंत्र विचार आणि स्वतःचा 'स्पेस' हवा असतो. तेव्हा जेव्हा टीनएज मुले प्रायव्हसीची मागणी करतात, तेव्हा ती बंडखोरी नसून, त्यांचा आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न असतो.
म्हणून, नात्यात दुरावा निर्माण येतो
अनेक वेळा पालक मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात, त्यांचे मित्र कोण आहेत, मोबाईलमध्ये काय आहे, खोलीत काय चाललेय हे सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. परंतु हेच वागणं मुलांना असुरक्षित आणि त्रासदायक वाटतं. त्यामुळे संवादाचं दार बंद होतं आणि नात्यात दुरावा निर्माण होतो.
यासाठी सर्वप्रथम पालकांनी आपल्या मुलांशी मोकळा संवाद साधावा. त्यांच्याशी मित्रासारखं वागणं, त्यांना न विचारता सल्ले न देणं आणि त्यांच्या मतांना महत्त्व देणं गरजेचं आहे. संवादामध्ये सहानुभूती आणि समजूत असावी. त्यांना "तू असं का केलंस?" असे थेट प्रश्न विचारण्याऐवजी "तुला काय वाटतं?" अशा पद्धतीने संवाद साधावा.
विश्वास ही पालकत्वातील सर्वात महत्त्वाची गोष्ट
टीनएज मुलांसाठी त्यांची खोली, डायरी, फोन यांसारख्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग असतो. पालकांनी त्यांच्या खोलीत येताना दरवाजा ठोठावावा, त्यांचा फोन पाहण्याचा आग्रह करू नये. जेव्हा त्यांना आपल्या प्रायव्हसीचा सन्मान मिळतो, तेव्हा ते पालकांशी अधिक खुलेपणाने संवाद साधतात.
विश्वास ही पालकत्वातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता, हे त्यांना जाणवू द्या. ते काही चुकीचं करत असतील, तरही त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी समजून घ्या आणि योग्य मार्गदर्शन करा.
शेवटी, पालकांनी हे लक्षात घ्यायला हवं की टीनएज वयात मुलं केवळ शरीराने नाही, तर विचारांनीही मोठी होतात. त्यांना थोडा ‘स्पेस’ दिला तर ते अधिक जबाबदार, आत्मविश्वासी आणि स्वावलंबी बनतात.

