

डॉ. संजय गायकवाड
मेंदू हे संपूर्ण शरीराचा नियंत्रणकेंद्र आहे. विचार करणे, निर्णय घेणे, आठवणी साठवणे, भावना व्यक्त करणे, शरीराच्या हालचाली नियंत्रित करणे आणि दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीचे नियोजन करणे ही सर्व कामे मेंदू करत असतो. त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले असेल तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यही उत्तम राहते.
मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी आणि दर्जेदार झोप घेणे आवश्यक आहे. प्रौढ व्यक्तींनी दररोज किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. झोपेच्या काळात मेंदूमध्ये दिवसभर साचलेले चयापचयातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे घडते. स्मरणशक्ती मजबूत करणे, नवीन माहितीचे दीर्घकालीन संचयन करणे आणि मेंदूच्या पेशींना विश्रांती देणे ही महत्त्वाची कामे झोपेतच होतात. सातत्याने अपुरी झोप घेतल्यास एकाग्रता कमी होणे, निर्णयक्षमता बिघडणे आणि दीर्घकाळात स्मृतिभ्रंशासारख्या विकारांचा धोका वाढू शकतो. सकाळी दहा ते पंधरा मिनिटे नैसर्गिक सूर्यप्रकाशात राहिल्याने शरीरातील जैविक घड्याळ संतुलित राहण्यास मदत होते. यामुळे मेलॅटोनीन आणि इतर जैविक संप्रेरकांचे संतुलन सुधारते, मन प्रसन्न राहते आणि रात्रीची झोप अधिक चांगली लागते. नियमित सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डीची निर्मितीही होते, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा मेंदूच्या आरोग्यालाही होतो.
नियमित व्यायाम हा मेंदूसाठी औषधासारखा मानला जातो. विशेषतः स्क्वॅटस्सारखे पायांच्या मोठ्या स्नायूंना कार्यरत ठेवणारे व्यायाम रक्ताभिसरण सुधारतात. त्यामुळे मेंदूपर्यंत प्राणवायू आणि पोषक घटकांचा पुरवठा अधिक प्रभावीपणे होतो. वजन उचलण्याचे किंवा स्नायू बळकट करणारे व्यायाम केल्याने शरीरात काही जैविक घटक तयार होतात, जे मेंदूतील मज्जापेशींच्या कार्यक्षमतेला चालना देतात. संशोधनानुसार नियमित शक्तिवर्धक व्यायामामुळे स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि संज्ञानात्मक कार्यक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते.
हेही लक्षात ठेवा
व्हिटॅमिन बी-12, ओमेगा-3 स्निग्धाम्ले, फोलेट, लोह आणि व्हिटॅमिन डी यांची कमतरता मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते. मानवी मेंदू हा सामाजिक संवादासाठी बनलेला आहे. त्यामुळे कुटुंबीय, मित्र आणि समाजाशी नियमित संवाद ठेवणे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. एकाकीपणा, सामाजिक अलिप्तता आणि दीर्घकाळ एकटे राहणे यामुळे नैराश्य, चिंता आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढू शकतो. सबब रोज एखाद्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधणे, मित्रपरिवारात सहभागी होणे किंवा सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेणे मेंदूला सक्रिय ठेवते.
नवीन गोष्टी शिकण्याची सवय मेंदूला सतत कार्यरत ठेवते. नवीन भाषा शिकणे, एखादे वाद्य वाजवणे, चित्रकला, बुद्धिबळ, लेखन, वाचन किंवा कोणतीही नवीन कला आत्मसात करणे यामुळे मेंदूमध्ये नवीन मज्जासंयोग तयार होण्यास मदत होते. सततचा ताण शरीरातील कोर्टिसोल या संप्रेरकाची पातळी वाढवतो. दीर्घकाळ कोर्टिसोल वाढलेले राहिल्यास स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णयक्षमता यांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ताण नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. ध्यान, मौन किंवा श्वसनाचे व्यायाम हे मेंदूला विश्रांंती देणारे प्रभावी उपाय आहेत. दररोज दहा मिनिटे ध्यान, प्राणायाम किंवा शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन स्थिर राहते, तणाव कमी होतो आणि भावनिक संतुलन सुधारते. काही संशोधनांमध्ये नियमित ध्यानामुळे मेंदूच्या विचार आणि स्मरणशक्तीशी संबंधित भागांच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.