

डॉ. मनोज शिंगाडे
प्रसूतिपूर्व व्हिटॅमिन्सपासून गर्भधारणेसाठी योग्य वेळ शोधणार्या मोबाईल अॅप्सपर्यंत सगळा भर स्त्रियांच्या प्रजननक्षमतेवर दिला जातो. पण, प्रत्यक्षात गर्भधारणा ही पती आणि पत्नी यांची संयुक्तजबाबदारी आहे. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, गर्भधारणेत अडथळा येण्याच्या 50 टक्केकारणे स्त्रीमध्ये असतात; तर उर्वरित 50 टक्के पुरुषांमध्ये आढळतात. त्यामुळे पिता बनण्यासाठी पतीची शुक्राणूक्षमता सुद़ृढ असणे गरजेचे असते.
निरोगी जीवनशैली असणार्या पुरुषांचे शुक्राणू हे तंदुरुस्त किंवा सक्षम असतात. पित्याच्या भूमिकेसाठी सज्ज होण्यापूर्वी पुरुषांनी शुक्राणूंची गुणवत्ता उत्तम राहील, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
1. वजन नियंत्रणात ठेवा : शरीरातील हार्मोन्सचा समतोल टिकवण्यासाठी योग्य वजन राखणे आवश्यक असते. अत्यधिक चरबी असल्यास हार्मोनल असंतुलन होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम शुक्राणूंच्या संख्येवर व कार्यक्षमतेवर होतो.
2. आहारावर लक्ष ठेवा : ताजे आणि नैसर्गिक अन्न विशेषतः फळे आणि भाज्या यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंटस् व जीवनसत्त्वे असतात. त्यांचे सेवन शुक्राणू सक्षम बनण्यासाठी पोषक ठरतात. खास करून सी आणि ई जीवनसत्त्वे यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. याउलट प्रक्रियायुक्त (प्रोसेस्ड) आणि फास्ट फूड शुक्राणूंसाठी घातक ठरू शकते.
3. नियमित व्यायाम करा : व्यायाम केल्यामुळे शुक्राणूंची निर्मिती सुधारते. संशोधनात असे दिसून आले आहे की, वजन उचलण्याचे व्यायाम आणि आऊटडोअर एक्सरसाईज या दोन्ही बाबी शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी प्रभावी ठरतात. आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करणे योग्य मानले जाते.
4. आवश्यक जीवनसत्त्वे घ्या : व्हिटॅमिन डी, सी, ई आणि को-क्युएनझाइम क्यू10 ही शुक्राणूंसाठी उपयुक्त जीवनसत्त्वे आहेत. आहारातून योग्य प्रमाणात जीवनसत्त्वांचे पोषण मिळत असेल तर सप्लिमेंटस् घेण्याची गरज नसते. तरीही, तुमच्या गरजेनुसार कोणती सप्लिमेंटस् फायदेशीर ठरतील, हे डॉक्टरांकडून समजून घ्या.
5. गरम पाण्याचा अतिरेक नको : शुक्राणूंना योग्य प्रकारे काम करण्यासाठी शरीराच्या तापमानापेक्षा 2-3 अंश कमी तापमान आवश्यक असते. अतिउष्णता ही शुक्राणूंसाठी घातक असते. गरम पाण्याच्या टबमध्ये दीर्घकाळ बसल्यामुळे किंवा अतिगरम पाण्याने स्नान केल्यामुळे शुक्राणूंचे नुकसान होऊ शकते.
6. लॅपटॉप मांडीवर ठेवू नका : लॅपटॉपमधून निर्माण होणारे उष्णतेचे प्रमाण देखील शुक्राणूंवर वाईट परिणाम करते. त्यामुळे लॅपटॉप डेस्क किंवा टेबलवर ठेवून वापरणे अधिक सुरक्षित आहे.
7. कॅफिनचे प्रमाण मर्यादित ठेवा : डेनमार्कमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, जास्त कॅफिन घेणार्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या काही प्रमाणात घटत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दिवसाला 300 मिलिग्रामपेक्षा जास्त कॅफिन घेणे टाळा. म्हणजेच, साधारणतः 2-3 कप ब्लॅक कॉफी पुरेशी आहे. एनर्जी ड्रिंक्समध्ये असलेल्या कृत्रिम पदार्थांपासून लांब राहा.
याखेरीज मद्यपान, धूम्रपान कटाक्षाने टाळा. सिगारेट किंवा तंबाखू केवळ शुक्राणूंची संख्याच कमी करत नाही, तर ते अकार्यक्षम शुक्राणू निर्माण करतात.
अलीकडील काळात कृत्रिम टेस्टोस्टेरॉन घेण्याचा ट्रेंड विकसित झाला आहे; परंतु यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉनची नैसर्गिक निर्मिती थांबते. याचा थेट परिणाम प्रजननक्षमतेवर होतो.
वरील सगळ्या सवयी केवळ गर्भधारणेसाठीच नव्हे, तर संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्तआहेत.