Honey Baby Health Risks | बाळाला मध देताय?

 Honey Baby Health Risks |
Honey Baby Health Risks | बाळाला मध देताय?Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

डॉ. प्राजक्ता पाटील

अनेक घरांमध्ये लहान बाळाला मध चाटवण्याची जुनी पद्धत आहे. मध हा नैसर्गिक आणि गुणकारी मानला जात असल्याने तो बाळासाठी सुरक्षित असेल असा समज पालकांमध्ये असतो. परंतु, एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना मध दिल्याने ‘इन्फंट बॉट्युलिझम’ नावाचा अत्यंत दुर्मीळ पण गंभीर आजार होण्याचा धोका असतो.

मधातील गोडवा किंवा शर्करा ही बाळांसाठी धोकादायक नसते, तर त्यामध्ये आढळणारे ‘क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम’ नावाच्या जिवाणूंचे सूक्ष्म बीजाणू मुख्य कारणीभूत ठरतात. मोठ्या मुलांची आणि प्रौढांची पचनसंस्था पूर्णपणे विकसित झालेली असते. त्यामुळे त्यांची पचनसंस्था या बीजाणूंना शरीरात वाढण्यापासून सहज रोखू शकते. याउलट, एक वर्षाखालील बालकांची पचनसंस्था आणि आतील सूक्ष्मजीव वातावरण पूर्णपणे विकसित झालेले नसते. जेव्हा हे बीजाणू बाळाच्या पोटात जातात, तेव्हा ते आतड्यांमध्ये वेगाने वाढतात आणि एक विषारी घटक तयार करतात. हा विषारी घटक बाळाच्या मज्जासंस्थेवर आणि स्नायूंच्या हालचालींवर थेट परिणाम करतो.

इन्फंट बॉट्युलिझम या आजाराची लक्षणे सुरुवातीला अत्यंत साधी दिसतात. बद्धकोष्ठता हे या आजाराचे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे लक्षण आहे. यानंतर बाळाला दूध चोखण्यास त्रास होणे, रडण्याचा आवाज अत्यंत क्षीण होणे, चेहर्‍याच्या हालचाली मंदावणे, पापण्या सुस्त होणे आणि मान सांभाळता न येणे अशी लक्षणे दिसू लागतात.

आजार वाढल्यास श्वास घेण्यास आणि अन्न गिळण्यास मदत करणारे स्नायू कमकुवत होतात. अशा वेळी बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करून अतिदक्षता विभागात उपचार द्यावे लागतात. अमेरिकन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या अभ्यासानुसार जगात अनेक ठिकाणी या आजाराचे योग्य निदान न झाल्याने अनेक प्रकरणे समोर येत नाहीत. या पार्श्वभूमीवर पालकांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, शिजवलेला किंवा उकळलेला मधसुद्धा बाळासाठी सुरक्षित नसतो. कारण साध्या तापमानाने हे जिवाणू नष्ट होत नाहीत. त्यामुळे कोणत्याही अन्नपदार्थात, दुधात किंवा पाण्यात मध मिसळून देणे टाळावे.

सुरुवातीच्या सहा महिन्यांत बाळासाठी केवळ आईचे दूध किंवा योग्य फॉर्म्युला दूध पुरेसे असते. सहा महिन्यांनंतर बाळ इतर अन्न खाऊ लागल्यावर त्याला मधाऐवजी केळ, सफरचंदाची प्युरी किंवा इतर मऊ फळे द्यावीत. बाळाचे वय एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्याच्या आहारात मधाचा समावेश गरज वाटल्यास करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news