उच्च रक्तदाब : वेळीच सावध व्हा!

Published on

डॉ. महेश बरामदे

पुष्कळ व्यक्तींमध्ये हाय बीपी अर्थात उच्च रक्तदाबाचा त्रास गंभीर स्वरूप धारण करेपर्यंत कोणतेही लक्षण दिसून येत नाही आणि लक्षात येते तेव्हा मूत्रपिंड, डोळे व हृदय या नाजूक इंद्रियांवर कायमस्वरूपी दुष्परिणाम झालेले असतात. त्यामुळे वेळीच सावध झालेले बरे!

उच्च रक्तदाबापायी अचानक हार्ट अ‍ॅटॅक येऊन तरुण व्यक्ती दगावल्याच्या घटना आता आपल्याकडे काही अपवाद राहिलेल्या नाहीत. अचानक एखादी टोकाची घटना घडत असली, तरी त्रास अनेकदा आधीपासून होत असतो. अनेक लोकांना अनेक वर्षे उच्च रक्तदाब असतो. परंतु, त्यांना त्याची कल्पनाही नसते. आपण वरवर दिसायला एक शांत, आरामशीर, निवांत व्यक्ती असू शकता आणि तरीही आपल्याला उच्च रक्तदाब असू शकतो; पण हा त्रास वेळीच ओळखला नाही, नियंत्रणात आणला नाही तर स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, हृदय बंद पडणे किंवा मूत्रपिंड निकामी होणे असे काहीही होऊ शकते. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि अपेक्षित असलेल्या कार्यापेक्षा अधिक कार्य हृदयाला करावे लागते. त्यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती घडत असते.

उच्च रक्तदाबामुळे हृदयाला पंप करण्यासाठी अधिक श्रम करावे लागतात. याचा थेट परिणाम हृदयाचे कार्य बंद पडण्यात होतो. केंद्र शासनाच्या 'नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबेटिस, सीव्हीडी अँड स्ट्रोक'च्या माध्यमातून 2018 मध्ये झालेल्या अभ्यासात गेल्या वर्षी महाराष्ट्रात 74 लाख 77 हजार 101 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 2 लाख 6 हजार 945 रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित होत आहे. हे आपल्या किंवा आपल्या आप्तांच्या बाबतीत होऊ नये म्हणून प्रथम रक्तदाब म्हणजे काय आणि त्यात दोष निर्माण होतो म्हणजे काय, त्यामागची कारणे व उपाय काय, हे समजून घेणे आवश्यक ठरते.

जेव्हा हृदयाचे स्पंदन होते तेव्हा त्याद्वारे रक्त रक्तवाहिन्यांमधे पंप केले जाते आणि त्यांच्यामध्ये दबाव निर्माण होतो. एका सुद़ृढ व्यक्तीमध्ये रक्तवाहिन्या या स्नायूंनी बळकट आणि लवचिक असतात. हृदय जेव्हा त्यांच्यामधून रक्त पंप करते तेव्हा त्या प्रसरण पावतात. सामान्य स्थितीत हृदय हे प्रतिमिनिट 60 ते 80 वेळा स्पंदन करते. प्रत्येक स्पंदनाच्या वेळी रक्तदाब वाढतो आणि दोन स्पंदनांच्या दरम्यान हृदय विश्रांती घेते तेव्हा तो कमी होतो. रक्तदाब हा दर मिनिटाला आपल्या शारीरिक स्थिती, व्यायाम किंवा झोपेमुळे बदलत राहतो; परंतु तो सामान्यतः 130/80 इतका एका प्रौढासाठी असावा. या पातळीपेक्षा अधिक रक्तदाब हा उच्च समजला जातो.

रक्तदाब जितका अधिक तितकी हृदयविकाराचा झटका किंवा हृदय बंद पडण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते. तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढत आहे. छातीत धडधड होणे, सततची डोकेदुखी, डोळ्यांपुढे अंधारी येणे, हाता-पायाला बधिरता येणे व चक्कर येणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. परंतु, पुष्कळ व्यक्तींमध्ये या आजाराने गंभीर स्वरूप धारण करेपर्यंत कोणतेही लक्षण दिसून येत नाही व लक्षात येते तेव्हा मूत्रपिंड, डोळे व हृदय या नाजूक इंद्रियांवर कायमस्वरूपी दुष्परिणाम झालेले असतात. ते मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतात, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करतात.

उच्च रक्तदाबाची कारणे पुढीलप्रमाणे सांगितली जातात- निष्क्रियता, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, सिगारेट, तंबाखू, दारूचे व्यसन, अतिमानसिक ताण, आहारात मिठाचे प्रमाण अधिक, मधुमेह, थॉयरॉईड, मूत्रपिंडाचे विकार यासारखी आनुवंशिक कारणे. या कारणांपायी पुढील लक्षणे सामान्यत: दिसून येतात- अंधूक दिसणे, वारंवार चिडचिड होणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे, नाकातून रक्त येणे, धाप लागणे, छातीत कळ येणे, वारंवार डोके दुखणे, डोके जड होणे, उच्च रक्तदाबाचा त्रास आपल्यापासून चार हात लांब राहावा म्हणून पुढील काही गोष्टी करून पाहता येतील- नियमित व्यायाम, ताणतणाव टाळणे, मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, सुद़ृढ जीवनशैली अवलंबणे, सिगारेट, तंबाखू, मद्यपान न करणे, नियमित वैद्यकीय सल्ला घेणे, नियमित ब्लड प्रेशर तपासणे, पुरेशी झोप घेणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे.

असेही अभ्यासातून आढळून आले आहे की, शरीरातील कोलेस्टेरॉलच्या उच्च पातळीमुळे हृदयविकार होण्याची शक्यता चारपटीने वाढते. रक्तातील अतिरिक्त कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जाड, कडक थर जमा होतो. हे कोलेस्टोरॉल किंवा थर जमण्यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती जाड, कडक आणि कमी लवचिक बनतात. परिणामी, हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि काही वेळा अडविला जातो. रक्तप्रवाहात अडथळा येतो तेव्हा छातीत वेदना किंवा अँजायना उद्भवते. हृदयाला होणारा रक्तपुरवठा जेव्हा तीव्र स्वरूपात बिघडतो किंवा पूर्णतः थांबतो तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल यांच्या जोडीला मधुमेह असेल, तर स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका होण्याचा धोका सोळापटीने वाढतो. त्यामुळे या सगळ्याला आपल्यापासून दूरच ठेवलेले बरे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news