Heatwave heart attack risk | अतिउष्णतेमुळे हार्ट अ‍ॅटॅकचा धोका

Heatwave heart attack risk |
Heatwave heart attack risk | अतिउष्णतेमुळे हार्ट अ‍ॅटॅकचा धोका
Published on
Updated on

डॉ. मनोज कुंभार

उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि उष्ण लहरी केवळ शरीराला थकवा देत नाहीत, तर त्या हृदयविकाराच्या झटक्याचा धोकाही वाढवू शकतात.

हिवाळ्यात हृदयविकाराच्या घटना वाढतात हे आपल्याला माहीत आहे; परंतु कडाक्याच्या उन्हातही हृदयाची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. शरीरातील पाणी कमी होणे (डिहायड्रेशन) हे यामागचे मुख्य कारण ठरू शकते.

उन्हाळ्यात धोका का वाढतो?

उन्हामुळे शरीरातून जास्त घाम बाहेर पडतो, तेव्हा शरीरातील पाणी आणि क्षारांचे प्रमाण कमी होते. यामुळे रक्त घट्ट होते आणि ते शरीरात प्रवाहित करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. अतिउष्णतेमुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयावर ताण वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण होते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, वृद्ध आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी या काळात विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यातील सामान्य त्रास समजून अनेकदा आपण काही लक्षणांकडे पाठ फिरवतो, जे भविष्यात घातक ठरू शकतात:

श्वास घेण्यास त्रास होणे : तुम्हाला श्वास घेताना अडथळा जाणवत असेल किंवा छातीत जळजळ आणि दबाव वाटत असेल, तर हे धोक्याचे लक्षण असू शकते.

अतिप्रमाणत घाम येणे : वातानुकूलित खोलीत (एसीमध्ये) बसलेले असतानाही अचानक खूप घाम येत असेल, तर ते हृदयविकाराशी संबंधित किंवा रक्तदाब कमी झाल्याचे लक्षण असू शकते.

उलटी आणि अस्वस्थता : सतत मळमळणे, उलट्या होणे किंवा हृदयाचे ठोके अचानक वाढणे ही शरीराने दिलेली धोक्याची सूचना असू शकते.

चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे : उन्हात असताना अचानक चक्कर येणे किंवा अंधारी येणे हे शरीरातील पाणी कमी झाल्याचे निदर्शक असून ते हृदयासाठी घातक ठरू शकते.

तीव्र जुलाब (डायरिया) : जुलाबावाटे शरीरातील पाणी आणि मीठ बाहेर पडल्यामुळे हृदयावरचा ताण वाढतो आणि रक्त गोठण्याची (क्लॉटिंग) भीती निर्माण होते. हृदयविकार, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांना याचा सर्वाधिक धोका असतो. तसेच अतिलठ्ठ व्यक्ती, वृद्ध, धूम्रपान करणारे आणि सतत उन्हात काम करणार्‍या व्यक्तींनी या काळात स्वतःची विशेष काळजी घ्यावी. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे आणि लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news