

डॉ. लोकेश चौधरी
वाढता स्ट्रेस, धकाधकीचे जीवन, फास्ट लाईफ आणि फास्टफूड, वाढते उच्च रक्तदाब, मधुमेह आणि रक्तातील चरबीचे प्रमाण यामुळे हृदयविकार झपाट्याने वाढत आहे.
हृदयविकाराच्या धक्क्यामध्ये बहुतांश लोकांना छातीत दुखतं. हे दुखणं जबड्ड्यापासून पोटात बेंबीपर्यंत कुठेही होऊ शकते. उजव्या, डाव्या किंवा दोन्ही बाजूच्या छातीच्या पुढच्या भागात किंवा पाठीतसुद्धा होऊ शकते आणि तीव्रतासुद्धा प्रत्येकाला वेगवेगळी असू शकते.
छातीत दुखण्या व्यतिरिक्त अचानक दम लागणे, अचानक चक्कर येऊन बेशुद्ध होणं, अचानक अस्वस्थ किंवा बेचैनी वाटणे अणि घाम सुटणे होऊ शकते. याशिवाय कार्डियाक अरेस्ट म्हणजे अचानक हृदय बंद पडून जागच्या जागी जीव जाणे हे आपण दैनंदिन जीवनात बर्याचदा ऐकत असतो. म्हणून अशी लक्षणे जर कोणाला असतील, तर त्यांनी त्वरित जवळील हॉस्पिटलमध्ये जायला हवे.
हृदयाला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा (ब्लॉकेज) झाल्यास हृदयविकाराचा धक्का येतो. रक्तप्रवाह थांबल्यानंतर 90 मिनिटांत हृदयाच्या स्नायूंच्या पेशी मरण्यास सुरुवात होते आणि जवळजवळ 90 टक्के पेशी 6 तासांमध्ये कायमस्वरुपी नुकसानग्रस्त होतात. रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेस हे हृदयविकाराचे मुख्य कारण आहे.
* ब्लॉकेजेस कुठल्या नसामध्ये आहेत आणि किती प्रमाणात आहेत, हे ओळखण्यासाठी अँजिओग्राफी केली जाते.
* ब्लॉकेजेससाठी स्टेंट बसवून नस ओपन करणे याला अँजिओप्लास्टी म्हणतात.
* जेव्हा अँजिओप्लास्टी मोठा हार्ट अटॅक आलेला असताना इमर्जन्सीमध्ये केली जाते, तेव्हा त्याला प्रायमरी अँजिओप्लास्टी किंवा पामी म्हणतात. प्रायमरी अँजिओप्लास्टीमुळे ब्लॉक झालेली नस खात्रीशीररीत्या लवकरात लवकर उघडल्याने हार्ट अटॅकचा त्रास लगेच कमी होण्यास मदत होते. हृदयाला होणारा डॅमेज कमीत कमी होतो. आणि रिकव्हरीला लवकर सुरुवात होते. शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृत्यूची शक्यता कमी होते आणि 2-3 दिवसांत डिस्चार्ज मिळणे शक्य होते.
पाश्चात्य देशांमध्ये हृदयविकाराचा झटका येणार्या जवळजवळ 90 टक्के रुग्णांना प्रायमरी अँजिओप्लास्टीचा लाभ मिळतो, तर आपल्या देशात हृदयविकाराचा झटका आलेल्यांमध्ये फक्त 5-7 टक्केच रुग्णांना हा फायदा मिळतो.
* ‘गोल्डन अवर’ म्हणजे पहिल्या तासात उपचार मिळाल्यास रुग्णाचे आयुष्य वाचते. ‘गोल्डन अवर’ म्हणजे हृदयविकाराचा झटका सुरुवात झाल्या पासूनचा सुरुवातीचा 1 तास. हृदयाची रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे हार्ट अटॅक येतो, जेव्हा नस बंद होते, तेव्हा त्या भागाला रक्तपुरवठा नसल्यामुळे त्या भागातील पेशी मरण्यास सुरुवात होते आणि सहसा 4-6 तासांत बहुतांश पेशी मरून हृदयाला मोठा कायमचा डॅमेज होण्याची शक्यता असते. शिवाय या 1 तासात अर्रेथमिया होऊन रुग्णाच्या मृत्यूची शक्यता सर्वाधिक असते. म्हणून या एक तासात रुग्णाला योग्य ती ट्रीटमेंट मिळाल्यास किंवा प्रायमरी अँजिओप्लास्टी झाल्यास जीव वाचवता येतो आणि हृदयाला होणारा डॅमेजसुद्धा कमीत कमी ठेवता येतो. म्हणूनच ‘गोल्डन हावर’ म्हणजे योग्य उपचार मिळवण्याची आणि जीव वाचवण्याची ही एक संधी मानली जाते.
हृदयविकाराचे निदान आणि उपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या आपत्कालीन सेवा हृदयविकाराच्या सुसज्ज रुग्णालयात उपलब्ध असतात, जसे की,
1. हृदयविकाराचा झटका आल्यास प्रायमरी अँजिओप्लास्टी ही 24 तास उपलब्ध असते.
2. हृदय निष्क्रिय होणे(म्हणजे हृदयाचे कार्य कमी होऊन धाप लागणे किवा अंगाला सूज येणे) यासाठी आवश्यक उपचार पद्धती उपलब्ध असतात.
3. हृदयाच्या ठोक्यांचे आजार, प्रामुख्याने हार्ट ब्लॉकसाठी पेसमेकर सुविधा उपलब्ध असते.
4. बीपी अति जास्त होऊन त्रास होणे : या आजारावर योग्य तो उपचार तत्काळ उपलब्ध असतो. हृदयरोगतज्ज्ञ 24 तास उपलब्ध असतात. सुसज्ज आयसीयू उपलब्ध असतो, अत्याधुनिक कॅथलॅब आणि उपचार पद्धती कायम उपलब्ध असते.
5. हृदय निरोगी ठेवण्यासाठी लोकांनी दैनंदिन जीवनात साधी पण महत्त्वाची काळजी घ्यायला हवी. आहारात तेलकट पदार्थ, खारट पदार्थ, जंकफूड-फास्टफूड, चरबीजन्य पदार्थ, तुपाचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, बंद पाकिटातील पदार्थ, स्नॅक्स, चिप्स, लोणचे, पापड, मैद्याचे पदार्थ यांचा वापर कमीत कमी असावा. रोजचा किमान 45 मिनिटे व्यायाम असावा. त्यात ब्रिस्क वॉकिंग, सायकलिंग, योगासने, प्राणायाम, एरोबिक्सचा समावेश असावा. ब्लड प्रेशर, शुगर आणि रक्तातील चरबीचे प्रमाण चेक करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करावेत किंवा औषधे चालू करावीत. सिगारेट, तंबाखू, दारूचे व्यसन बंद करावे.