

बॉलीवूडमधील काही कलाकार आपल्या फिटनेससाठी काटेकोर जीवनशैली पाळतात. यापैकी एक सामान्य सवय म्हणजे रात्रीचा आहार सायंकाळी सातच्या आत घेणं. अलीकडेच हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी सांगितलं की, त्या रात्री काहीही खात नाहीत. विशेष म्हणजे, हा सल्ला त्यांना अभिनेता अक्षय कुमार यांनी दिला होता. तेव्हापासून मुमताज आज वयाच्या 77 व्या वर्षीही या नियमाचं पालन करतात. रात्रीच्या जेवणाऐवजी फळं खातात. त्यांनी आपली दिनचर्या स्पष्ट करताना सांगितलं की, त्या 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान झोपतात आणि 4 ते 5 वाजता उठतात. सकाळी 7 वाजता व्यायाम, नंतर ब्लॅक टी आणि हलकं, चरबी न वाढवणारं न्याहारी करतात. दुपारी नियमित जेवण घेतात; पण संध्याकाळी फक्त फळं.
शास्त्रानुसार 6.30 नंतर अन्न खाणं टाळावं. कारण, रात्री उशिरा खाल्ल्यास शरीर विश्रांती घेऊ शकत नाही. पचनक्रिया सुरू राहते. त्यामुळे शरीरातील विविध अवयवांवर ताण येतो. अक्षयच्या मते रात्री भूक लागलीच, तर सूप किंवा सॅलड यांचे सेवन करावे.
अभिनेते मनोज वाजपेयी यांनी 13-14 वर्षांपासून रात्रीचं जेवण बंद केलं आहे. क्वचित प्रसंगी ते थोडं काही खातात; पण बहुतेकवेळा पूर्ण उपाशी राहण्याला प्राधान्य देतात. पुढे डॉक्टरांचं मत ऐकून त्यांनी संध्याकाळनंतर अन्न टाळण्याचा पूर्ण निर्णय घेतला. सातच्या आत जेवणामुळे पचन सुधारते, झोप चांगली लागते, वजन नियंत्रणात राहतं, रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे शरीरातील ऊर्जा वाढते. बॉडी क्लॉक नीट राहते.
तथापि, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. त्यामुळं रात्रीचं जेवण पूर्णपणे वर्ज्य करणं काहींना त्रासदायक ठरू शकतं. यातून थकवा येणं, चक्कर येणं, पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण होणं यासारख्या समस्या जाणवू शकतात. हे टाळण्यासाठी रात्री दूध, अंडी, पनीर, सुकामेवा, चेरीसारखे हलके पण पौष्टिक पर्याय घ्यावेत.