
उतारवयामध्ये आजारपण कमी करणे, शारीरिक, मानसिक, सामाजिक कार्य सुस्थितीत चालू ठेवणे, समाजाचा उपयुक्त हिस्सा म्हणून जगणे ही तीन महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आहाराविषयी विचार करताना ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यपूर्ण दीर्घायुषी जीवनासाठीच्या आहारामध्ये आणि तरुणांच्या आहारात मूलभूत फरक नाही. परंतु, जसजसे वय वाढते, त्यानुसार आहारातून मिळणार्या उष्मांकाची गरज कमी होत जाते. उष्मांकाची दैनंदिन गरज वय वर्षे 40 ते 50 यामध्ये 5 टक्क्यांनी कमी होते. 50 ते 60 या वर्षाच्या काळात दैनंदिन गरज 7 टक्क्यांनी कमी होते आणि 60 वर्षांच्यापुढे 10 टक्क्यांनी कमी हाते. म्हणजेच वयानुसार उष्मांकाची गरज भागविणारा; परंतु समतोल आहार आवश्यक असतो. समतोल आहाराची गरज भागवताना ज्येष्ठांच्या काही शारीरिक अवस्थांचा, समस्येचा विचार करावा लागतो.
ज्येष्ठांमध्ये वयानुसार काही शारीरिक बदल होत असतात, त्यामुळे भुकेचे प्रमाण कमी होते. शरीरात चालणार्या चयापचयाचा वेग कमी होतो. लवकर पोट भरते आणि गंध आणि चव यांचे प्रमाण कमी होते. नंतरच्या काळामध्ये जास्त गोड आणि जास्त खारट खाण्याकडे कल होतो. दाताचे आरोग्य अतिशय महत्त्वाचे आहे. दात खिळखिळे झालेले असल्यास पदार्थ चावण्याची क्रिया पूर्ण होत नाही. त्यासाठी दातांच्या डॉक्टरांना दाखवणे आणि जरूर पडल्यास कवळी बसवणे महत्त्वाचे.
उतारवयात पदार्थ गिळण्यास त्रास होऊ शकतो. त्यासाठी पदार्थ मऊ बनविणे आणि योग्य प्रमाणात पाणी घेणे जरुरीचे असते. वार्धक्यात पचननसंस्थेची कार्यक्षमता कमी होते. अशा वेळी जड खाणे किंवा जास्त स्निग्धांश असलेला आहार, जास्त प्रमाणातील जेवण, कमी चोथा असलेले पदार्थ, मद्यपान अशा पद्धतीच्या आहारामुळे अपचन होऊन वाताचे प्रमाण वाढते. जास्त गोड आणि मसालेदार खाण्याने पित्ताचे प्रमाण वाढते. कमी प्रमाणात पातळ पदार्थ आणि पाणी तसेच चघळचोथ्याच्या आहारामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे भुकेचे प्रमाण कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणून कुपोषण होते.
स्वास्थ्याच्या द़ृष्टीने मानसिक अवस्था अतिशय महत्त्वाची असते. अनेक ज्येष्ठ नागरिकांना एकटेपणा, उदासीनता याचा सामना करावा लागतो. शारीरिक ताकद कमी असल्यास हालचालींवर बंधन येतात. द़ृष्टी कमी होते. या सगळ्याचा परिणाम आहारावर होऊन शारीरिक गरजेपेक्षा कमी आहार घेतला जातो. ज्येष्ठ नागरिकांना अनेक वेळा काही आजारांची सोबत असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, हदयविकार यांसारख्या आजारांचा सामना करताना काही वेळा त्यांचा बराचसा वेळ दवाखान्यात जातो किंवा कुटुंबातील इतरांच्या वेळापत्रकाशी जमवून घेताना आहाराच्या वेळा आणि प्रमाण पाहणे अवघड जाते. या सर्वांचा परिणाम भुकेचे प्रमाण कमी होणे, पचनसंस्थेचा त्रास जास्त होतो. अर्थातच यासर्व गोष्टींचा विचार करून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी योग्य आहार घेणे आवश्यक आहे.
यासाठी आहारातील जास्तीत जास्त भाग हा वनस्पतीजन्य पदार्थापासूनच असावा. त्यामध्ये अॅन्टी ऑक्सिडंटस्, जीवनसत्त्वे, खनिजे, चघळचोथ्याचे प्रमाण जास्त असते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण शून्य असते. अगदी कमी प्रमाणात सॅच्युरेटेड स्निग्धांश असतो. या पद्धतीचा आहार हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब कॅन्सर, पक्षाघात याला प्रतिबंध करतो. स्मरणशक्ती चांगली राहण्यास मदत होते. तळलेले पदार्थ आरोग्याला हानिकारक असतात. त्यामुळे ट्रान्स फॅटी अॅसिड्स तयार होऊन रक्तवाहिन्यामधील पेशींवर हल्ला चढवून अपाय करतात.
ज्येष्ठ नागरिकांनी असे पदार्थ टाळावेत. पॉलिश केलेले तांदूळ, मैद्याचे पदार्थ यामुळे मधुमेह, हदयविकार, स्थूलता यांचे प्रमाण वाढते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते म्हणून असे पदार्थ वर्ज्य करावेत. कार्यक्षम आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मर्यादित उष्माकांचा आहार घ्यावा. मर्यादित म्हणजेच गरजे इतकाच. आपल्या स्वत:च्या शारीरिक गरजेइतकाच आणि शारीरिक आजारानुसार उष्माकांची गरज किती आहे, हे ज्येष्ठ नागरिकांनी समजावून घेऊन जिभेवर ताबा मिळवावा.