Sciatica Pain : सायटिकाचे दुखणे कमी करण्यासाठी...

कमरेपासून थेट पायाच्या तळव्यापर्यंत ठणक मारतेय? असू शकतं 'सायटिका'चं दुखणं
Sciatica Pain
Sciatica Pain
Published on
Updated on

डॉ. महेश बरामदे

सायटिका ही सर्वसाधारण समस्या आहे. आपल्याला याचा अनुभव नसला तरीही जवळच्या व्यक्तींना ही समस्या भेडसावू शकते. सायटिका म्हणजे सायटिक नसेजवळ निर्माण होणारी वेदना आणि संवेदनशीलता असे म्हणता येईल.

सायटीक नस ही शरीरातील सर्वात लांब नस आहे. आपल्या शरीरात दोन नसा असतात. प्रत्येक पायामध्ये एक सायटिका नस असते. पाठीच्या मणक्यात असणाऱ्या विविध नसांच्या मूळापासून ही नस निघते. पाठीच्या कण्यापासून निघण़ाऱ्या या नसा पार्श्वभागाच्या स्नायूंमधून मांडीच्या मागच्या बाजूने थेट पायाच्या तळापर्यंत जाते.

लक्षणे -

सायटिकाचे दुखणे सुरू झाल्याची काही लक्षणे असतात. बऱ्याचदा आपण खाली वाकताना, धावताना आणि बसताना (विशेषतः जेव्हा आपण गाडी चालवत असतो तेव्हा) हे दुखणे जाणवते.त्यामुळे सायटिकाची काही विशेष लक्षणे आपल्याला दिसतात.

© कंबरदुखी, पार्श्वभाग, मांडीची मागची बाजू किंवा पोटऱ्या यांच्यात वेदना.

© थकवा, बधिरपणा किंवा पायांना जाणीव नसणे.

© पायाला मुंग्या येणे, जळजळणे, टोचल्यासारखे वाटणे.

© टाच जमिनीला टेकवून चालता न येणे.

© पोटऱ्या आणि टाच यांना जोडणाऱ्या नस दुखावणे.

कारणे -

सायटिकाची लक्षणे जाणून घेतल्यानंतर या वेदना का होतात, कशामुळे होतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्याला नेमका हा त्रास कशामुळे होतो आहे, याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि कोणतेही उपचार सुरू करण्याअगोदर योग्य निदान करून घेणे खूप महत्त्वाची पायरी आहे. सर्वसामान्यपणे सायटिकाचा त्रास होण्यामध्ये दोन कारणांचा अंतर्भाव असतो.

हर्निएटेड डिस्क ः यामध्ये मणक्याची गळू आल्यासारखी वाढ होते किंवा त्यावर मांस वाढते त्यामुळे मणक्याच्या जवळून जाणारी नस दबते.

पिरीफोर्मिस सिंड्रोम ः पार्श्वभागातील पिरीफोर्मिस स्नायूमुळे ही सायटिका नस वारंवार दबली जाते. स्नायूबंधापासून दूर होत असल्याने पाय आणि पार्श्वभाग दुखण्यास सुरुवात होते.

सायटिकाच्या दुखण्यासाठी विशिष्ट प्रकारे योगअभ्यास केल्यास या दुखण्यात फायदा होऊ शकतो.

हर्निएटेड डिस्क ः यासाठी हलक्या आसनांपासून सुरुवात करत सर्वसाधारण आसने केली जातात. त्यात उभे राहण्याच्या विविध पद्धती शिकवल्या जातात. आपल्या पाठीच्या खालच्या भागावर लक्ष देऊन नीट उभे राहणे आणि ताकद येण्यासाठी प्रयत्न केले जातात. नियमित योगाभ्यास केल्यास शस्त्रक्रियेची गरज लागणार नाही.

पिरीफोर्मिस सिंड्रोम ः यासाठी या स्नायूला ताण बसेल असे व्यायाम योगअभ्यासात करायला हवे. अर्थातच, हा व्यायाम करताना हळूहळू करत प्रगती करायला हवी; पण अतिताण किंवा अतिव्यायामामुळेही या स्नायूंवर ताण येऊन अंतर्गत सूज येऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news