

डॉ. संजय गायकवाड
सध्याच्या काळात लहान मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये ‘इन्फ्लेमेटरी बाऊल डिसीज’ म्हणजेच ‘आयबीडी’ या आजाराचे प्रमाण अत्यंत वेगाने वाढत आहे. पूर्वी प्रामुख्याने केवळ प्रौढ व्यक्तींमध्ये आढळणारा हा पोटदुखीचा आजार आता कमी वयाच्या मुलांनाही आपल्या विळख्यात घेत आहे.
‘आयबीडी’ हा आजार केवळ पोटापुरता मर्यादित नसून बालकांच्या शारीरिक वाढीवर, त्यांच्या पोषणावर आणि मानसिक आरोग्यावरही याचा खोलवर परिणाम होतो. ‘आयबीडी’ हा मानवाच्या पचनसंस्थेशी संबंधित एक जुनाट आजार आहे. यामध्ये पचनमार्गात दीर्घकाळापर्यंत सूज राहते. प्रामुख्याने याचे ‘क्रोहन्स डिसीज’ आणि ‘अल्सरेटिव्ह कोलायटिस’ असे दोन प्रकार पडतात. बहुतांश वेळा पालक मुलांच्या पोटदुखीकडे किंवा जंतांच्या त्रासाकडे सामान्य पोटाची तक्रार म्हणून दुर्लक्ष करतात; परंतु हे दुर्लक्ष पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करू शकते.
या आजाराची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. पोटात सातत्याने तीव्र वेदना होणे, दीर्घकाळापर्यंत जुलाब किंवा अतिसाराचा त्रास होणे, शौचावाटे रक्त पडणे, कोणत्याही कारणाशिवाय वजन वेगाने घटणे आणि शरीरात कमालीचा अशक्तपणा जाणवणे, भूक मंदावणे, वारंवार थकवा येणे ही लक्षणे सातत्याने दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे ठरते.
वैद्यकीय संशोधनानुसार या आजाराचे कोणतेही एक निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. तथापि, मानवी रोगप्रतिकारक शक्तीमधील बिघाड, जनुकीय संरचना (जेनेटिक्स) आणि सभोवतालचे पर्यावरण यांच्या एकत्रित परिणामामुळे हा आजार उद्भवतो. कुटुंबामध्ये पूर्वी कोणाला हा आजार झाला असेल, तर मुलांमध्ये याचा धोका अधिक वाढतो. याव्यतिरिक्त फास्ट फूड, प्रक्रिया केलेले अन्न (प्रोसेस्ड फूड) आणि साखरेचे अतिप्रमाण असलेल्या पेयांचे सेवन, मानसिक ताणतणाव, आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंच्या रचनेत (मायक्रोबायोम) होणारे बदल आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते.
पोटदुखी किंवा जुलाब दीर्घकाळ थांबत नसतील, तर गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. या आजाराच्या अचूक निदानासाठी रक्त चाचण्या, विष्ठेची तपासणी (स्टूल टेस्ट), कोलोनोस्कोपी आणि काही इमेजिंग चाचण्यांचा अवलंब केला जातो.
‘आयबीडी’ हा कोणताही संसर्गजन्य आजार नाही. वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास मुले पूर्णपणे निरोगी, सक्रिय आणि सामान्य जीवन जगू शकतात. बालकांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी त्यांना संतुलित आहार देणे, पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याची सवय लावणे, नियमित मैदानी खेळांसाठी प्रवृत्त करणे आणि घरातील वातावरण तणावमुक्त ठेवणे आवश्यक आहे.