ड्रायफ्रूटस्मधील मेंदूच्या आकाराचे अक्रोड हे अतिशय गुणकारी आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले ओमेगा 3 मेदाम्ल हे अँटिऑक्सिडंट असल्याने त्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार अक्रोड आणि अक्रोडाचं तेल या दोन्हींचा उपयोग ताण कमी करण्यासाठी होतो.
* अक्रोड आहारात असतील तर ज्याचं वजन जास्त आहे, अशांना फायदा होतो. रक्तवाहिन्या चांगल्या स्थितीत राहतात.
* अक्रोडातील 90 टेफेनॉल्स त्याच्यावरील पातळ सालीत असतात. फ्लेवनॉईडसमुळे अँटिऑक्सिडंट गुणधर्म वाढतात, त्यामुळे अक्रोड खाताना या सालीसकट खावा. शक्यतो पाण्यात भिजत ठेवून पूर्ण भिजला की खावा. पाण्यात भिजवल्यावर त्यातील प्रथिनांचे रेणू शोषून घेतात.
* अक्रोडातील भरपूर प्रमाणात असलेलं ‘इ’ जीवनसत्त्व एका वेगळ्या स्वरूपात म्हणजे गॅमा टोकोफेरॉल या रसायनाच्या स्वरूपात असतं. खास करून पुरुषांच्या हृदयाच्या आरोग्यास यामुळे हातभार लागतो.
* अक्रोड आहारात असल्याने तंतू, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे यांचाही लाभ झाल्याने संधिवातालाही प्रतिबंध होण्यास मदत होते. अक्रोडामध्ये आणखी असे गुणधर्म आहेत, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील लवचीकता टिकून राहते.
* अक्रोड मेंदूसाठीही उत्तम समजला जातो, यामुळे रक्तात गाठी होण्याचं प्रमाण कमी होतं.
अक्रोड पूर्णपणे वाळून त्याची पेस्ट करून ती भाजून मग त्यापासून तेल काढलं जातं. ते सुंदर तपकिरी रंगाचं असतं. या तेलात एलॅजिक आम्ल हा अँटिऑक्सिडंटचा स्रोत असतो, यामुळे कर्करोगाला प्रतिबंध होतो.
* रक्ताभिसरण उत्तम राहण्यास, रक्तवाहिन्या लवचीक राहण्यास, हृदयविकारास प्रतिबंध होण्यास, संधिवातास प्रतिबंध होण्यास या तेलाचा चांगला उपयोग होतो.
* या तेलातील ‘ब’ जीवनसत्त्वाचे प्रकार आणि ‘इ’ जीवनसत्त्व यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. त्वचेवरील सुरकुत्या, अकाली वार्धक्य, एक्झिमा, सोरायसिस यावर अक्रोडाच्या तेलाचा चांगला उपयोग होतो.