

डॉ. भारत लुणावत
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे ही एक प्राचीन भारतीय परंपरा असून ती आजच्या आधुनिक काळातही तितकीच प्रभावी ठरत आहे. तांब्याच्या भांड्यात किमान आठ तास पाणी साठवले जाते, तेव्हा त्यामध्ये ‘ओलिगोडायनॅमिक’ प्रक्रियेद्वारे तांब्याचे आयन मिसळतात.
मानवी शरीर स्वतःहून तांबे तयार करू शकत नाही. त्यामुळे अन्नातून किंवा पाण्यातून हे अल्प प्रमाणात मिळणे गरजेचे असते. तांब्यामध्ये दाहशामक, कर्करोगविरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असल्याने ते आरोग्यासाठी अत्यंत पोषक ठरते. तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे मुख्य फायदे म्हणजे त्यातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंटस्, जे शरीरातील मुक्त कणांशी लढा देऊन कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. हे पाणी मेलॅनिनच्या उत्पादनास चालना देत असल्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण मिळते.
रक्ताभिसरण प्रक्रियेतही तांब्याचे महत्त्व अनन्यसाधारण असून ते कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडस्ची पातळी कमी करण्यास सहायक ठरते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी तांब्याची योग्य पातळी शरीरात असणे आवश्यक असते. त्याची कमतरता किंवा अतिरेक या दोन्हीमुळे थायरॉईडचे विकार उद्भवू शकतात. पचनसंस्थेसाठी तांब्याचे पाणी म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक औषधच आहे. आयुर्वेदामध्ये याला ‘ताम्रजल’ म्हटले जाते आणि ते पोटातील जंतू नष्ट करते, पचनमार्गातील दाह कमी करते आणि अल्सरसारख्या व्याधींवर गुणकारी ठरते.
तांबे पेशींमधील विद्युत लहरींचे वहन जलद करण्यास मदत करत असल्यामुळे मेंदू अधिक वेगाने कार्य करतो. तसेच सांधेदुखी आणि संधिवाताचा त्रास असलेल्या रुग्णांना तांब्याच्या दाहशामक गुणधर्मांमुळे हाडे आणि सांध्यांमध्ये आराम मिळतो. जखमा लवकर भरून येण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीदेखील हे पाणी उपयुक्त ठरते.
तांब्याच्या भांड्यात साठवलेल्या पाण्यात कॉलरासारख्या घातक आजाराचे जीवाणूदेखील जिवंत राहू शकत नाहीत. तांब्याच्या पाण्याचा वापर करताना काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तांबे शरीरासाठी केवळ अल्प प्रमाणात गरजेचे असल्याने दिवसभर केवळ तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे टाळावे. सकाळी रिकाम्या पोटी आणि संध्याकाळी असे दिवसातून दोनदा हे पाणी पिणे पुरेसे असते. तांब्याची बाटली कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये आणि पाणी साठवण्यासाठी किमान आठ तासांचा कालावधी द्यावा.