

पुरण पोळी आणि बेसनाचे लाडू आवडत नाहीत अशी व्यक्ती सापडणं अवघड! भाकरी आणि चविष्ट पिठलं म्हणजे तर अनेकांचा लाडका मेनू. या अर्थाने आपल्यातल्या बहुतेकांना चणा डाळ अर्थात हरभरा डाळ आवडते.
अर्थात आवडीच्या पलीकडे जाऊन विचार केला तरी माणसाच्या आहारात चणाडाळीचं महत्त्व अनन्यसाधारण म्हणावं असंच! ही डाळ म्हणजे जीवनसत्त्वं आणि खनिजं यांचा चांगला स्रोत आहे.
या डाळीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, बी व्हिटॅमिन, झिंक, सेलेनियम, मँगनीज आणि तांबंदेखील असतं. इतर सर्व डाळींपेक्षा चणाडाळीत जास्त प्रथिनं आढळतात. ही डाळ फायबर म्हणजे तंतुमय घटकांनीही समृद्ध आहे तसंच या डाळीत चांगली आणि उपयुक्त अॅमिनो अॅसिडस्देखील असतात. यामुळे हरभरा डाळ आहाराचा अविभाज्य भाग बनणं हे हिताचं ठरतं.
अलीकडच्या काळात अनेक व्यक्तींंच्या बाबतीत जेवणानंतर रक्तातील साखर वाढण्याची समस्या आढळते. चण्याची डाळ जेवणात असली तर या समस्येवर नियंत्रण राहू शकतं. उच्च रक्तदाब आणि त्यामुळे किडनीवर होऊ शकणारा परिणाम रोखायचा असेल किंवा आटोक्यात ठेवायचा असेल तर आहारात या ना त्या स्वरूपात चण्याच्या डाळीचा समावेश केलेला चांगला!
खाणं-पिणं व्यवस्थित ठेवून नियंत्रणात ठेवण्यासाठी चण्याची डाळ आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. वजनावरचं नियंत्रण हा जसा हल्ली महत्त्वाचा विषय झालाय, तसाच अशक्तपणाही! चणाडाळ हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. हाडं मजबूत करण्यास, शरीराला ऊर्जा देण्यास, रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यात आणि अशक्तपणा दूर करण्यात चणाडाळीचं सेवन साहाय्यकारी ठरतं. म्हणूनच अलीकडच्या काळात चणाडाळीचं महत्त्व पूर्वीपेक्षा जास्त अधोरेखित होतंय.