Slipper Health Tips | फॅशनेबल पादत्राणे की आरोग्याशी खेळ? अयोग्य चपलांमुळे गुडघे आणि कंबरदुखीचा वाढतोय धोका

Slipper Health Tips
Slipper Health Tips | फॅशनेबल पादत्राणे की आरोग्याशी खेळ? अयोग्य चपलांमुळे गुडघे आणि कंबरदुखीचा वाढतोय धोकाFile Photo
Published on
Updated on

डॉ. संजय गायकवाड

अयोग्य पादत्राणांमुळे पाय, घोटे यांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या दुखण्यांचा परिणाम पुढे गुडघे, कंबर आणि पाठीपर्यंत पोहोचतो. याचे कारण आजची अनेक फॅशनेबल पादत्राणे मानवी पायांच्या नैसर्गिक रचनेशी सुसंगत नाहीत.

आजच्या काळात फॅशनच्या विश्वात पादत्राणे किंवा चप्पल केवळ पायांचे संरक्षण करणारे साधन राहिलेले नाही, तर त्या शैली, अभिरुची आणि व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक बनल्या आहेत. उंच टाचांच्या चप्पला, टोकदार पुढील भाग असलेली पादत्राणे, जड तळाच्या स्नीकर्ससद़ृश चप्पला किंवा साध्या सपाट चप्पला फॅशनचे प्रवाह इतक्या वेगाने बदलत आहेत की, आरोग्याचा विचार मागे पडून केवळ ट्रेंडच्या मागे धावण्याची प्रवृत्ती वाढली आहे.

ट्रेंडी पादत्राणांमुळे वेदना का होतात?

अयोग्य पादत्राणे पायांची नैसर्गिक हालचाल बाधित करतात. परिणामी, वेदना, सूज निर्माण होतेच; पण दीर्घकाळात गोखरू, हॅमरटो, प्लांटर फॅसिआयटिस अशा विकृती उद्भवतात. याचा परिणाम केवळ पायांपुरता मर्यादित न राहता गुडघे, नितंबाचा भाग आणि पाठीपर्यंत पोहोचतो.

उंच टाचांच्या चप्पला दिसायला मोहक असल्या, तरी पायांसाठी त्या सर्वाधिक हानिकारक ठरतात. टाच जितकी उंच तितके शरीराचे वजन पुढील भागावर जास्त पडते आणि बोटांवर ताण येतो. त्यामुळे पायाच्या पुढील भागात तीव्र वेदना व सूज, मोठ्या अंगठ्याजवळ हाड उभारले जाणे म्हणजेच गोखरू, बोटे वाकडी होऊन दाबली जाणे म्हणजे हॅमरटो, टाच व घोट्यात वेदना निर्माण करणारा अकिलीज टेंडनचा ताठरपणा तसेच चुकीच्या देहबोलीमुळे कंबर व गुडघेदुखी अशा समस्या वाढतात. टाच जितकी उंच आणि तळ जितका पातळ तितके नुकसान अधिक होते.

टोकदार पुढील भाग असलेली पादत्राणे फॅशनच्या जगात लोकप्रिय असली तरी ती बोटांना एकमेकांवर दाबतात. त्यामुळे गोखरू, नसांवर दाब येणे, नख आत वाढण्याची समस्या, वेदनादायक कडक गाठी निर्माण होतात आणि कालांतराने बोटांचा नैसर्गिक आकारही बदलू शकतो. दिसायला साध्या व आरामदायक वाटणार्‍या बॅले प्रकारच्या सपाट चप्पलांमध्ये कमानीचा आधार किंवा कुशनिंग जवळजवळ नसते. त्यामुळे प्रत्येक पावलागणिक पायांना अधिक मेहनत करावी लागते. परिणामी प्लांटर फॅसिआयटिस, टाचदुखी आणि घोट्यात ताण निर्माण होतो.

जड तळाच्या चंकी प्रकारच्या चप्पला किंवा प्लॅटफॉर्म पादत्राणे ट्रेंडी असली तरी त्या अनेकदा स्थिर नसतात. कठीण तळामुळे पाय नैसर्गिकरीत्या वाकत नाही, चालण्याची पद्धत बदलते, समतोल बिघडतो आणि घोटा वाकण्याची शक्यता वाढते. त्याचा ताण गुडघे आणि कुल्ह्यांवरही येतो. समाजमाध्यमांवरील प्रभावक संस्कृतीमुळे ‘स्टाईल’साठी अस्वस्थ करणारी पादत्राणे घालण्याकडे अनेकजण जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. दीर्घकाळ उभे राहणे, कार्यक्रमांत औपचारिक दिसण्याची अपेक्षा आणि ‘सौंदर्यासाठी वेदना सहन कराव्याच लागतात’ ही मानसिकता पायांच्या तक्रारी अधिक तीव्र करत आहे. त्यामुळे पूर्वी वय वाढल्यानंतर दिसणार्‍या समस्या आता तरुणींमध्येही दिसू लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news