

डॉ. संतोष काळे
लहान मुलांचे डोके दुखण्याला अनेक कारणे असू शकतात. काही मुलांना ताप, सर्दी, खोकला यांच्यामुळेही डोकेदुखी जाणवत असेल. एखादा त्रास किंवा आजार झाला आहे तेव्हा डोके दुखणे वेगळे आणि मुलांनी सतत डोकेदुखीची तक्रार करणे वेगळे आहे. त्यामुळे मुले सतत डोके दुखत असल्याची तक्रार करत असतील, तर ते गंभीरपणे हाताळले पाहिजे. सर्वसाधारणपणे ४ ते १४ वयोगटातील मुलांना ही समस्या जाणवते.
मायग्रेन: ही समस्या अनुवांशिकही असू शकते. यामध्ये विशेषतः डोक्याच्या एकाच बाजूला तीव्र वेदना होतात. या वेदना होत असताना डोळ्यांना अंधूक दिसते. मायग्रेनमध्ये उलटी किंवा मळमळ होण्याचीही शक्यता असते.
ज्या व्यक्तींना झोप कमी असते त्यांना याचा अधिक त्रास होतो. या वेदना तीव्र सूर्यप्रकाश किंवा अतिआवाजामुळेही होतात. खूप जास्त धावपळ केल्यास मायग्रेनच्या त्रासात वाढ होते. प्रौढ व्यक्तींमध्ये वेदनांची तीव्रता अधिक असते, तर मुलांमध्ये या वेदना कमी प्रमाणात असतात.
तणावाशी निगडीत डोकेदुखी : तणावामुळे एखाद्याला डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा पूर्ण डोके दुखते. त्यामुळे व्यक्ती बेचैन होते, घाबरी होते. मुलांमध्ये अशा प्रकारच्या डोकेदुखीमध्ये डोक्यावर काहीतरी वजन ठेवल्यासारखे वाटते.
मुलांना काही भावनिक त्रास किंवा शारीरिक तणाव जाणवत असेल, तर त्यांना अशी डोकेदुखी होऊ शकते. या वेदना मान, पाठ यांचे स्नायू ताणणे, थकवा, चुकीच्या स्थितीमध्ये झोपणे आदींमुळे होते..
क्लस्टर : या प्रकारची डोकेदुखी ही दहा वर्षांच्या पुढील मुलांमध्ये दिसून येते. सुरुवातीला थोड्या थोड्या वेळाने ही डोकेदुखी जाणवते. सर्वसाधारणपणे डोळ्यांच्या मागच्या बाजूला या वेदना जाणवतात. ज्या बाजूला वेदना होत असतात त्या बाजूचा डोळा लाल होतो आणि त्यातून पाणी निघू लागते.
डोकेदुखीचा हा प्रकार निश्चितपणे गंभीर असतो. या डोकेदुखीला सुसायडल हेडेक असेही म्हणतात. या वेदना १०-३० मिनिटांपर्यंत होतात. या वेदनांवर कोणतेही घरगुती उपाय करता येत नाहीत. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला योग्य वेळी घेणे महत्त्वाचे आहे. दुय्यम किंवा सेकेंडरी
डोकेदुखी : एखाद्या आजारामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होत असल्याने दुय्यम प्रकारची डोकेदुखी जाणवते. संसर्ग, मानसिक आजार, उच्च रक्तदाब, डोक्याला इजा, लकवा किंवा ट्यूमर या कारणांमुळे या वेदना होतात.
त्यामुळे ही डोकेदुखी थांबवण्यासाठी मूळ आजारावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असते. अनेकदा औषधांचा दुष्परिणाम, स्वतःच्या मनाने औषधे सेवन करणे यामुळेही या वेदना जाणवू शकतात.
डोळे कमजोर असणे: टीव्ही किंवा मोबाईल पाहताना, सलग अभ्यास करताना डोके दुखत असेल, तर या वेदनेचे कारण असते डोळे कमजोर असणे. नजर कमी झाल्यास डोकेदुखी होऊ शकते.
रोग संक्रमण : सर्वसाधारण खोकला, सर्दी तसेच सायनस किंवा कानदुखी यामुळेही डोके दुखू शकते.
भावनात्मकता : एकटेपणा किंवा एखादा मित्र, नातेवाईक त्रास देत असेल, तर त्याच्या तणावामुळेही लहान मुलांना डोकेदुखी भेडसावू शकते.
जुनाट इजा किंवा मेंदूच्या प्रक्रियेतील समस्या: डोक्यावर पडल्यास किंवा डोक्याला पूर्वी काही इजा, अपघात झाला असेल,