Children Health : समस्या मुलांमधील डोकेदुखीची

औषधोपचारांसोबतच जीवनशैलीत बदल गरजेचा
Children Health
समस्या मुलांमधील डोकेदुखीची
Published on
Updated on

डॉ. भारत लुणावत

लहान मुलांमध्ये डोकेदुखीची समस्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. पालकांसाठी ही चिंतेची बाब असली, तरी बहुतेक प्रकरणांमध्ये ही डोकेदुखी गंभीर नसते. या समस्येची कारणे प्रामुख्याने दोन प्रकारांत विभागली जातात, प्राथमिक आणि माध्यमिक.

प्राथमिक डोकेदुखीमध्ये मायग्रेन म्हणजेच अर्धशिशी आणि ‌‘टेंशन हेडेक‌’ यांचा समावेश होतो. अर्धशिशीमध्ये केवळ डोके दुखत नाही, तर मळमळणे, उलट्या होणे आणि प्रकाश किंवा आवाजाचा त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. टेंशन हेडेक हे सहसा अभ्यासाचा ताण, अपुरी झोप किंवा मानसिक दडपणामुळे उद्भवते. यामध्ये डोक्याच्या दोन्ही बाजूंना सतत दाब जाणवतो. याशिवाय अनेक शारीरिक आणि पर्यावरणीय घटक कारणीभूत असतात. सर्दी, ताप, सायनस किंवा घशाचे संक्रमण ही सामान्य कारणे आहेत. मुलांच्या डोळ्यांवर ताण येत असेल किंवा त्यांना दृष्टिदोष असेल, तरीही वारंवार डोकेदुखी होऊ शकते.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि कॉम्प्युटरचा अतिवापर, तसेच स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येतो. याव्यतिरिक्त शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे म्हणजेच डिहायड्रेशन, जेवणाच्या अनियमित वेळा आणि रक्तातील साखरेचे कमी झालेले प्रमाण यामुळेही मुले डोकेदुखीची तक्रार करतात. काही मुलांमध्ये चॉकलेट, कॅफिनयुक्त पेये किंवा विशिष्ट प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यामुळे डोकेदुखीची लक्षणे बळावतात.

डोकेदुखी सामान्य असेल, तर डॉक्टर पॅरासिटामॉल किंवा आयबुप्रोफेनसारखी वेदनाशामक औषधे योग्य डोसमध्ये सुचवतात. मात्र, पालकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे देऊ नयेत. मुलाला डोकेदुखीसोबत मानेमध्ये कडकपणा, खूप ताप, फिटस्‌‍ येणे किंवा दृष्टी धूसर होणे असा त्रास होत असेल, तर तातडीने सीटी स्कॅन किंवा एमआरआयसारख्या चाचण्या करण्याची गरज असते. सायनसमुळे डोके दुखत असल्यास प्रतिजैविकांचा वापर प्रभावी ठरू शकतो.

औषधोपचारांसोबतच जीवनशैलीत बदल करणे हा मुलांच्या डोकेदुखीवर सर्वात प्रभावी उपाय आहे. मुलांना दररोज किमान 8 ते 10 तास शांत झोप मिळायलाच हवी. त्यांच्या आहारात पालेभाज्या, फळे आणि पुरेसे पाणी यांचा समावेश असावा. अभ्यासाच्या किंवा खेळाच्या दरम्यान ठरावीक अंतराने विश्रांती घेणे गरजेचे आहे.

आजच्या काळात पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाईमवर मर्यादा घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित शारीरिक व्यायाम आणि योगासनांमुळे मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे डोकेदुखीचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटते. जमुलाला वारंवार आणि तीव्र डोकेदुखी होत असेल, तर वैद्यकीय तज्ज्ञांकडून डोळ्यांची आणि आरोग्याची संपूर्ण तपासणी करून घेणे हाच सुरक्षित मार्ग ठरतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news