मुलांमधील डोकेदुखी | पुढारी

Published on
Updated on

डॉ. संतोष काळे

'आई गं डोकं दुखतंय,' असे मोठ्यांनी म्हटले तर पटते; पण जेव्हा लहान मुले म्हणतात की, माझे डोके दुखतेय, तेव्हा आधी आपण काय झालं डोकं दुखायला, असा विचार करतो. कारण, लहान मुलांचे डोके दुखावे, अशी फारशी कारणे आपल्याला जाणवत नाहीत; मात्र लहान मुले सतत अशी तक्रारवजा किरकिर करत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण, फक्त डोकेदुखी हा त्रास नसेल तर इतर कुठल्या समस्येमुळे होणारा परिणाम असू शकेल. त्यामुळे लहान मुलांच्या डोके दुखण्याच्या सततच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होऊ नये. 

लहान मुलांचे डोके दुखण्याला अनेक कारणे असू शकतात. काही मुलांना ताप, सर्दी, खोकला यामुळेही डोकेदुखी जाणवत असेल. एखादा त्रास किंवा आजार झाला आहे तेव्हा डोके दुखणे वेगळे आणि मुलांनी सतत डोकेदुखीची तक्रार करणे वेगळे आहे. त्यामुळे मुले सतत जर डोके दुखत असल्याची तक्रार करत असतील, तर ते गंभीरपणे घेतले पाहिजे. सर्वसाधारणपणे 4 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना ही समस्या जाणवते. 

दोन प्रकारची डोकेदुखी  

प्राथमिक पातळीवरील डोकेदुखी : यामध्ये जाणवणारी डोकेदुखी ही एखाद्या आजारामुळे किंवा रोगामुळे नसते, तर मेंदूला वेदना जाणवणार्‍या संवेदना तंत्रामध्ये जी गडबड होते, त्यामुळे ही डोकेदुखी जाणवते. या डोकेदुखीचे तीन प्रकार आहेत. 

मायग्रेन : मायग्रेन ही समस्या आनुवंशिकही असू शकते. यामध्ये विशेषतः डोक्याच्या एकाच बाजूला तीव्र वेदना होतात. या वेदना होत असताना डोळ्यांना अंधुक दिसते आणि डोळ्यांसमोर आगीचे गोळे दिसू लागतात. मायग्रेनमध्ये उलटी किंवा मळमळ होण्याचीही शक्यता असते. ज्या व्यक्तींना झोप कमी असते, त्यांना याचा अधिक त्रास होतो. या वेदना तीव्र सूर्यप्रकाश किंवा अतिआवाजामुळेही होतात. खूप जास्त धावपळ केल्यास मायग्रेनच्या त्रासात वाढ होते. प्रौढ व्यक्तींमध्ये वेदनांची तीव्रता अधिक असते, तर मुलांमध्ये या वेदना कमी प्रमाणात असतात. 

तणावाशी निगडित डोकेदुखी : तणावामुळे एखाद्याला डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा पूर्ण डोके दुखते. त्यामुळे व्यक्ती बेचैन होते, घाबरी होते. मुलांमध्ये अशा प्रकारच्या डोकेदुखीमध्ये डोक्यावर काही तरी वजन ठेवल्यासारखे वाटते. मुलांना काही भावनिक त्रास किंवा शारीरिक तणाव जाणवत असेल तर त्यांना अशी डोकेदुखी होऊ शकते. या वेदना मान, पाठ यांचे स्नायू ताणणे, थकवा, चुकीच्या स्थितीमध्ये झोपणे आदींमुळे होते. 

क्लस्टर : या प्रकारची डोकेदुखी ही दहा वर्षांच्या पुढील मुलांमध्ये पाहिली जाते. सुरुवातीला थोड्या थोड्या वेळाने ही डोकेदुखी जाणवते. सर्वसाधारणपणे डोळ्यांच्या मागच्या बाजूला या वेदना जाणवतात. ज्या बाजूला वेदना होत असतात त्या बाजूचा डोळा लाल होतो आणि त्यातून पाणी निघू लागते. डोकेदुखीचा हा प्रकार निश्चितपणे गंभीर असतो. या डोकेदुखीला सुसायडल हेडेक असेही म्हणतात. या वेदना 10-30 मिनिटांपर्यंत होतात. या वेदनांवर कोणतेही घरगुती उपाय करता येत नाहीत. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला योग्य वेळी घेणे महत्त्वाचे आहे. 

दुय्यम किंवा सेकेंडरी डोकेदुखी : एखाद्या आजारामुळे  मज्जासंस्थेवर परिणाम होत असल्याने दुय्यम प्रकारची डोकेदुखी जाणवते. संसर्ग, मानसिक आजार, उच्च रक्तदाब, डोक्याला इजा, लकवा किंवा ट्युमर या कारणांमुळे या वेदना होतात. त्यामुळे ही डोकेदुखी थांबवण्यासाठी मूळ आजारावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असते. अनेकदा औषधांचा दुष्परिणाम, स्वतःच्या मनाने औषधे सेवन करणे यामुळेही या वेदना जाणवू शकतात. 

डोकेदुखीची कारणे : डोकेदुखी होण्यासाठी काही कारणे असतातच. 

डोळे कमजोर असणे : टीव्ही किंवा मोबाईल पाहताना सलग अभ्यास करताना जर डोके दुखत असेल तर या वेदनेचे कारण असते, डोळे कमजोर असणे. नजर कमी झाल्यास डोकेदुखी होऊ शकते. 

रोग संक्रमण : सर्वसाधारण खोकला, सर्दी तसेच सायनस किंवा कानदुखी यामुळेही डोके दुखू शकते. 

भावनात्मकता : एकटेपणा किंवा एखादा मित्र, नातेवाईक त्रास देत असेल तर त्याच्या तणावामुळेही लहान मुलांना डोकेदुखी भेडसावू शकते.  जुनाट इजा किंवा मेंदूच्या प्रक्रियेतील समस्या ः डोक्यावर खरोखरच पडल्यास किंवा डोक्याला पूर्वी काही इजा, अपघात झाला असेल तर ते डोकेदुखीचे कारण ठरू शकते. ट्युमर किंवा रक्तस्राव यामुळे दबाव पडू शकतो. त्यामुळे दीर्घ काळ तीव्र डोकेदुखी होऊ शकते. 

खाद्यपदार्थ : नायट्रेटयुक्त भोजनाचे जास्त सेवन केल्यास डोकेदुखी होण्याचे कारण ठरू शकते. जसे अतिप्रमाणात चॉकलेट, कोल्ड्रिंक, कॉफी यांचे सेवन केल्यास डोकेदुखी होऊ शकते. 

आनुवंशिक : काही वेळा डोकेदुखीची समस्या ही आनुवंशिकही असू शकते. त्यामुळे एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे हा त्रास जातो. 

सावधगिरीचे उपाय : मुलांना सातत्याने डोकेदुखीचा त्रास असेल तर काही गोष्टींबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. मुलांच्या आहाराकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. याविषयी काही बाबी जाणून घेऊ या. 

संतुलित पौष्टिक आहार गरजेचा आहेय मुलांच्या आहारात मोसमी फळे अवश्य समाविष्ट असावीत. रोज एक सफरचंद सेवन केल्यास डोकेदुखीच्या समस्येमध्ये आराम मिळतो. त्याचबरोबर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आवश्यक पेक्टिन नावाचा घटक सफरचंदामध्ये असतो. तीनही वेळा आहार सेवन करावा. सर्वसाधारण एका विशिष्ट वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावून घ्यावी. मुलांना रात्री किमान 10 तास झोप मिळणे अपेक्षित असते. तणाव जाणवू नये, यासाठी दीर्घ श्वसन करावे आणि प्राणायाम करावा. पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यासही डोकेदुखी होऊ शकते. मुलांचे डोके दुखत असल्यास त्यांच्या आसपासचे वातावरण शांत ठेवावे. मुलांच्या डोकेदुखीशी निगडित सर्वच माहिती एका वहीत नोंदवून ठेवावी. मुलाला डोकेदुखी केव्हा सुरू झाली, किती वेळ डोके दुखत होते, दुखणे कसे थांबले किंवा आराम कसा मिळाला, कोणत्या स्थितीत डोके जास्त दुखत होते, ही सर्व माहिती नोंदवून ठेवा, जेणेकरून डॉक्टरांना या माहितीच्या मदतीने उपचार करणे सोपे जाईल किंवा उपचारांची दिशा ठरवता येईल. डी जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे डोकेदुखी जाणवू शकते. त्यामुळे डी जीवनसत्त्वाची कमतरता भासू देऊ नये. टीव्ही आणि मोबाईल यावरील वेळ मर्यादित असावी. डॉक्टरांचा सल्ला न घेता मुलांना कोणतीही औषधे देऊ नये. 

मुलांकडून सातत्याने डोकेदुखीची तक्रार येत असेल तर दुर्लक्ष न करता त्यावर उपाय योजावेत. नेमके काय होते आहे, हे कळून घेण्यासाठी मुलांना डॉक्टरकडे न्यावे. त्यांनी सांगितल्यास काही चाचण्या करून घ्याव्यात आणि उपचारही करावेत. मुलांच्या डोकेदुखीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचा हलगर्जीपणा करू नये. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news