

आयुष्यातील आनंद आणि मानसिक स्थिती विविध घटकांवर आधारित असली, तरी त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम आरोग्यावर होत असतो. अनेक वेळा आपण आपला आनंद तत्काळ साधण्यासाठी बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो. पण, खरंतर आपल्या शरीरात विविध हार्मोन्स असतात, जे आपल्याला आनंदी आणि सकारात्मक ठेवण्यासाठी जबाबदार असतात. या हार्मोन्सना ‘हॅप्पी हार्मोन्स’ म्हणून ओळखले जाते.
प्रत्येक हार्मोन शरीराच्या वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांमध्ये सहभाग घेत असतो. हॅप्पी हार्मोन्स हे शरीरातील काही विशिष्ट हार्मोन्स आहेत, जे आपल्याला आनंद, सुख, समाधान आणि ताजेपणा प्रदान करतात. हॅप्पी हार्मोन्समध्ये प्रामुख्याने सेरोटोनिन, डोपामाईन, ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन यांचा समावेश होतो. या हार्मोन्सचे संतुलन शरीरात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सेरोटोनिन : सेरोटोनिन हा मुख्य हॅप्पी हार्मोन मानला जातो. याचा संबंध मूड, झोप, चव आणि पचनसंस्था यांसारख्या विविध शारीरिक क्रियांसोबत आहे. सेरोटोनिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे चिंता, तणाव, आणि डिप्रेशन सारख्या मानसिक समस्या उद्भवू शकतात.
डोपामाईन : जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीत यश मिळते किंवा आपल्याला काही सुखद अनुभव मिळतो, तेव्हा डोपामाईनचे प्रमाण शरीरात वाढते. हा हार्मोन आपल्या आत्मविश्वासाला उत्तेजन देतो आणि जीवनातील लहान-लहान आनंद शोधण्याची प्रेरणा देतो.
ऑक्सिटोसिन : ऑक्सिटोसिनला लव्ह हार्मोन म्हणून ओळखले जाते. हा हार्मोन माणसांमध्ये जिव्हाळा, आपुलकी, आणि विश्वास निर्माण करतो. आई आणि बाळामधील नाते, जोडीदारांमधील प्रेम, आणि कोणतेही नाते मजबूत करण्यामध्ये याची भूमिका असते. आधुनिक जीवनशैलीमुळे ताणतणाव वाढला असून, याचा परिणाम ऑक्सिटोसिनच्या पातळीवर होतो. कमी पातळीमुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते, तसेच एकाकीपणाची भावना वाढते.
एंडोर्फिन : हे शरीरात तयार होणारे नैसर्गिक पेन किलर म्हणून ओळखले जातात. ते शारीरिक आणि मानसिक ताण, वेदना आणि थकवा दूर करण्यास मदत करतात. व्यायाम किंवा शारीरिक कामामुळे शरीरात एंडोर्फिनचे प्रमाण वाढते. यामुळे आपल्याला उत्साही आणि ताजेतवाने वाटते.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार, जे लोक दररोज 30 मिनिटे व्यायाम करतात, त्यांच्यात सेरोटोनिन आणि डोपामाईनचे प्रमाण उच्च असते. यामुळे त्या व्यक्तींच्या मानसिक स्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा होते. जर्नल ऑफ न्यूरोसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, शारीरिक सक्रियतेमुळे एंडोर्फिनच्या प्रमाणात वाढ होऊन मानसिक ताण कमी होतो आणि मन शांत होते. व्यायामाने ताण कमी करण्यासाठी हा हार्मोन खूप प्रभावी ठरतो.
थोडक्यात, हॅप्पी हार्मोन्स मानसिक तणाव, चिंता, डिप्रेशन आणि इतर मानसिक समस्या टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हॅप्पी हार्मोन्सचे संतुलन शरीराच्या निरोगी कामकाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी व्यायाम, चांगला आहार, आणि मानसिक तणाव कमी करणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या शारीरिक आरोग्याच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा होऊ शकतात. हॅप्पी हार्मोन्सचे प्रमाण वाढवण्यासाठी व्हिटॅमिन बी 6, बी 12, आणि ओमेगा-3 फॅटी अॅॅसिडस्चा आहारात समावेश करणे उपयुक्त ठरते.