

डोकेदुखी, पाठदुखी, पायदुखी, कंबरदुखी, पोटात दुखणे, छातीत दुखणे यांबरोबरच दिवसभर सदैव काम करणारे हातही काही वेळा दुखू लागतात; पण बहुतेकदा आपण त्याकडे लक्ष देत नाही. तसे पाहता हातांमधील वेदना ही एक सामान्य समस्या आहे; पण या वेदना सतत जाणवत असतील, तर त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो.
कार्पल टनल सिंड्रोम : यामध्ये हाताच्या तळाशी असलेल्या कार्पल टनलवर दबाव येतो. यामुळे हाताच्या बोटांमध्ये सुन्नपणा जाणवणे, झिणझिण्या येणे यांसह वेदना होऊ शकतात. सतत संगणकाचा वापर करणे, ओझी उचलणे यासारख्या गोष्टी दीर्घकाळ आणि नियमित करत राहिल्याने ही समस्या उद्भवू शकते. आर्थरायटिसमुळेही हाताच्या सांध्यांमध्ये सूज येऊन आणि वेदना होतात. याचे दोन प्रमुख प्रकार आहेत.
ऑस्टियोआर्थरायटिस आणि र्हुमेटाईड आर्थरायटिस. याखेरीज टेंडोनाइटिस हा एक स्नायू तंतूंचा विकार आहे, जो हात किंवा कोपरांच्या जॉईंटस्मध्ये होऊ शकतो. गाऊट म्हणजे शरीरात युरिक अॅसिड जमा होणे. या व्याधीतही हातांमध्ये तीव्र वेदना आणि सूज होऊ शकते. हातातील नसांवर दबाव येण्यामुळे सुन्नपणा जाणवू शकतो. तसेच वेदनाही होऊ शकतात. याला नर्व कॉम्प्रेशन किंवा नर्व इन्फ्लेमेशन म्हणतात.
हातांच्या वेदना टाळायच्या असतील, तर सर्वप्रथम हातांवर जास्त ताण येईल असे काम करणे टाळायला हवे. याखेरीज सुरुवातीच्या टप्प्यात बर्फाने शेक दिल्यास वेदनांमध्ये आराम मिळतो. हलक्या स्ट्रेचिंग व्यायामाने हातांचे स्नायू आणि सांधे लवचिक ठेवता येतात. तसेच या व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. हातांमध्ये होणार्या वेदना दीर्घकाळ टिकून राहिल्यास किंवा तीव्र झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधे, फिजिओथेरपी किंवा इतर उपचारांचे पर्याय डॉक्टर सुचवू शकतात. आर्थरायटिस किंवा इन्फ्लेमेटरी स्थितीसाठी डॉक्टर वेदनाशामक किंवा अँटिइन्फ्लेमेटरी औषधे सुचवू शकतात. काही वेळा हीटिंग पॅडस्चा वापर करून हातांमधील स्नायूंना आराम देता येतो.