Diabetes and Stomach Health | पोटाचे आरोग्य आणि मधुमेह
डॉ. संतोष काळे
शरीरात उद्भवणार्या कोणत्याही गंभीर व्याधीची चाहूल आपले पोट (गट हेल्थ) फार आधीच देत असते. या संकेतांकडे योग्य वेळी लक्ष दिल्यास मधुमेहासारख्या आजारांपासूनही बचाव करणे शक्य होऊ शकते.
पोटाला शरीराचा ‘दुसरा मेंदू’ मानले जाते. पोटाच्या आरोग्याचा थेट परिणाम पचनसंस्थेपासून ते रोगप्रतिकारशक्ती आणि मानसिक अवस्थेपर्यंत होतो.
पोटाचे ‘वॉर्निंग सिग्नल्स’
पोटातील असंतुलनाचे पहिले लक्षण केवळ पोट फुगणे (ब्लोटिंग) हेच नसते. अनेकदा अचानक सुरू झालेली ‘फूड सेन्सिटिव्हिटी’ (विशिष्ट खाद्यपदार्थांचा त्रास होणे) हा पोटाने दिलेला एक संदेश असतो. शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. विशेषतः जर पूर्वी तुम्हाला अशा प्रकारे एखादा पदार्थ कधी तरी खाल्ल्याने त्रास होत नसेल आणि आता तो सुरू झाला असेल तर किमान डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
मधुमेहाचे पहिले लक्षण म्हणजे रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण, असा सर्वसामान्यांचा समज असतो. आहारात कोणताही बदल नसतानाही पोटाचा घेर किंवा चरबी वाढत राहणे, हे मधुमेहाचे पहिले लक्षण असू शकते. हे ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’च्या आधीचे लक्षण आहे. रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडल्याचे पहिले लक्षण म्हणजे जेवणानंतर अवघ्या दोन तासांत जाणवणारा थकवा. जर तुम्हाला सतत ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटत असेल, तर ते मधुमेहाचे पूर्वसंकेत असू शकतात.
मानसिक ताण केवळ चिंतेमुळे (अँग्झायटी) समजतो असे नाही, तर जेव्हा आयुष्य खूप धावपळीचे होते, तेव्हा त्याचे पडसाद पचनसंस्थेवर उमटतात. आपला मेंदू आणि पोट एकमेकांशी जोडलेले असल्याने पचनाच्या प्रक्रियेत अचानक होणारे बदल हे तुमच्या वाढत्या तणावाचे निदर्शक असतात. पोटाच्या आरोग्याकडे लक्ष देणे म्हणजे केवळ पचन सुधारणे नव्हे, तर भविष्यातील गंभीर आजार रोखणे होय. वेळीच निदान झाल्यास मधुमेहासारखे आजार नियंत्रित करता येतात.

