

डॉ. महेश बरामदे
शारीरिक आरोग्य मोजताना आपण सहसा रक्तदाब, बॉडी मास इंडेक्स किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर स्टॅमिना यासारख्या गोष्टींकडे लक्ष देतो. मात्र, यासोबतच एक अजून महत्त्वाचा; पण दुर्लक्षित राहणारा आरोग्य निर्देशक आहे तो म्हणजे हाताच्या पकडीची ताकद म्हणजेच ‘ग्रिप स्ट्रेंथ.’
पाहता पाहता साधी वाटणारी ग्रिप स्ट्रेंथ ही गोष्ट आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याविषयी, मेंदूच्या क्षमतेविषयी आणि दीर्घायुष्याविषयी अनेक संकेत देते. फिटनेस कोच ल्यूक कोटिन्हो यांच्या मते, ग्रिप स्ट्रेंथ केवळ शारीरिक ताकद नाही, तर आत्मविश्वास, संतुलन, स्वतंत्रपणा आणि अनेक वेळा मेंदूच्या तीव्रतेशीही संबंधित आहे. आपल्या अलीकडच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ल्यूक म्हणतात, हाताची पकड म्हणजे वय वाढत असताना आणि आजाराचा धोका ओळखण्याचा एक महत्त्वाचा सूचक घटक आहे. अनेक संशोधनांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, ज्यांची ग्रिप स्ट्रेंथ कमी असते, त्यांना हृदयविकाराचा धोका, मेंदूच्या कार्यक्षमतेत घट, हालचालींमध्ये अडचण आणि लहान आयुष्य या गोष्टींचा धोका अधिक असतो.
ल्यूक कोटिन्हो पुढे स्पष्ट करतात की, आपल्या मेंदूला आपल्या शरीराच्या क्षमतेचा सतत फीडबॅक मिळत असतो. आपण वस्तू नीट पकडू शकत नाही, लटकू शकत नाही किंवा वजन उचलू शकत नाही, तर मेंदूला हे संकेत मिळतात की, शरीर कमकुवत होत आहे. त्यामुळे मेंदू शरीराला हळूहळू संथ करतो, कमी हालचाल करायला भाग पाडतो, ऊर्जा वाचवू पाहतो; पण चांगली गोष्ट अशी आहे की, आपण थोड्या सरावाने पुन्हा आपली ग्रिप स्ट्रेंथ वाढवू शकतो.
हातांची पकड सुधारण्यासाठी स्ट्रेस बॉल वापरणे, बारला लटकणे, पूल-अप्स करणे किंवा डंबेल्स वापरणे या गोष्टी उपयोगी पडतात. बाजारात सध्या हाताची पकड मजबूत करणारी साधनेही उपलब्ध आहेत. अशा उपकरणांच्या साहाय्याने आपण हाताने दाब देतो आणि तो दाब सैल करतो. यामुळे हळूहळू हाताची पकड मजबूत होते. ही साधने प्रवासात, ऑफिसमध्ये किंवा टी.व्ही. पाहतानादेखील सहज वापरता येतात. फक्त इतकेच करायचे की, प्रतिकार जाणवू लागेपर्यंत हात दाबायचा आणि सोडायचा.
सुरुवात लहान प्रमाणात करावी. कमी प्रतिकार असलेले हँड ग्रिपर वापरा. सातत्य ठेवा. दररोज फक्त 2-3 मिनिटे ग्रिप ट्रेनिंग पुरेसे आहे. ते ऑफिसच्या डेस्कवर ठेवा, जेणेकरून कामाच्या मध्ये थोडा वेळ याचा वापर करता येईल. याचा परिणाम केवळ हाताच्या ताकदीवर मर्यादित राहत नाही, तर आपल्या शरीराचा पोस्चर, समतोल, मेंदूचा समन्वय, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि आत्मविश्वास यावरही सकारात्मक परिणाम होतो.
ल्यूक कोटिन्हो शेवटी म्हणतात, आपल्याला जटिल गोष्टींची गरज नाही. फक्त थोडीशी जागरूकता, साधेपणा आणि दररोज कृती याची गरज आहे.