डॉ. आनंद ओक
आयुर्वेद शास्त्रात काही विकारांचे अत्यंत विस्तृत आणि वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले आहे, अशा विकारांपैकी एक विकार म्हणजे 'ग्रहणी विकार.' आजच्या काळात या विकारावरील आयुर्वेदीय औषधी उपचारांचे महत्त्व संपूर्ण जगभरात पटू लागले आहे. तसेच या विकारावरील आयुर्वेदीय औषधे जास्त गुणदायी आणि सुरक्षित होत आहेत. अनेक जणांत असणारा, परंतु पुरेसे लक्ष न दिले जाणारा असा हा विकार आहे, असेही म्हणता येते.
आयुर्वेदीय शास्त्रात अतिशय खात्रीशीर उपचार असूनदेखील वारंवार पचन बिघाड होणार्या अनेकांना या विकारांची शास्त्रीय माहिती असत नाही. त्या दृष्टिकोनातून या वैशिष्ट्यपूर्ण विकाराची माहिती आज आपण घेणार आहोत.
ग्रहणीचे सामान्य लक्षण : भूक कमी असते, खाल्लेल्या अन्नाचे पूर्ण पचन न झाल्याने शौचाला पातळ, चिकट, दुर्गंधी, कळ करून होते. काही वेळा अन्नाचे पचन थोडे झालेले असल्यास घट्ट, चिकट दुर्गंधी असते. म्हणजेच 'कधी पातळ तर कधी घट्ट' मलप्रवृत्ती होते. आजार जास्त दिवस टिकून राहिल्यास मात्र बहुतांश वेळा पातळच होते. संडासचा होणारा बिघाड काही वेळा सकाळीच अधिक जाणवतो.
या लक्षणाबरोबरच तोंडाला चव नसते, पाणी सुटते, कडू आंबट करपट ढेकर येतात. बेंबीच्या परिसरात पोटात दुखते. काही वेळा पोट दाबल्यावर दुखते आणि अधूनमधून तोंड येते. कितीही वेळा शौचास जाऊन आले तरी पोट साफ झाल्याचे वाटत नाही.
वारंवार होणार्या तक्रारीमुळे पोटाची सतत काळजी वाटत असते. कोणतेही पदार्थ खाताना मनात भीती वाटते. मन नैराश्य, चिंता याने त्रस्त होऊन चिडचिडेपणा वाढलेला असतो. काही जणांत माझे दुखणे बरे होणार नाही, असा पगडा मनावर बसलेला असतो. या नकारात्मक दृष्टिकोनामुळे काही जणांत जास्तच दुर्लक्ष झाल्याने आजार बळावलेला पाहावयास मिळतो.
ग्रहणी विकाराची कारणे : आपण खाल्लेले अन्न पचन करण्यासाठी पोटामध्ये जी शक्ती असते, तिला अग्नी असे म्हणतात. पोटातील जठरानंतरचा पचन संस्थेचा जो भाग त्यालाच ग्रहणी असे म्हटले जाते. पचनशक्ती कमी झाल्यास म्हणजेच अग्नी मांद्य झाल्यास खाल्लेल्या अन्नाचे उपयोगी आणि निरुपयोगी असे पूर्ण विभाजन होऊ शकत नाही. त्यामुळे आहाररसाचे शोषण करणे व मलस्वरुपी भाग मोठ्या आतड्याकडे ढकलणे ही कार्ये बिघडतात. ही कार्ये ग्रहणीची असल्याने या आजाराला ग्रहणी असे म्हटले जाते. म्हणजेच, अग्नी मांद्य उत्पन्न करणारी कारणे सतत घडत राहिल्यास ग्रहणी हा विकार होतो.
आपल्या पचनशक्तीपेक्षा जास्त, म्हणजेच तडस लागेपर्यंत आहार सेवन करणे, श्रीखंड, बासुंदी, जड असणारे पदार्थ वारंवार सेवन करणे, शिळे बिघडलेले अन्न खाणे, योग्य वेळी न जेवणे, वारंवार उपवास, उलट्या अथवा जुलाब वारंवार होणे, वेळच्या वेळी संडास लघवीला न जाणे, कोणत्याही विकाराने शरीर क्षीण झालेले असणे, जागा व हवेतील बदल तसेच चिंता, भय, दुःख, टेन्शन इत्यादी मानसिक विकारांमुळे अग्निमांद्य उत्पन्न होते. अतिसार किंवा जुलाबाचे दुखणे नुकतेच बरे झाले असताना लगेच पथ्य सोडून जड आहार घेणे यामुळेही ग्रहणी हा विकार होतो.
आधुनिक शास्त्राप्रमाणे अमिबा, ई-कोलाय, अॅसकॅटिस इत्यादी जंतूंमुळे म्हणजेच अशुद्ध पाण्यातून हा क्रॉनिक कोलायटीस हा होणारा विकार ग्रहणीप्रमाणेच असतो. तसेच टी.बी.च्या क्युलॉसिसी या विकारासही ग्रहणी म्हटले जाते. कामानिमित्त प्रवास करावा लागणारी विविध क्षेत्रांतील माणसे तसेच ग्रामीण भागात फिल्डवर्क करणारी माणसे यामध्ये वारंवार होणारे दूषित पाण्याचे सेवन या विकाराचे कारण असते.
ग्रहणीचे प्रकार : ग्रहणी या विकाराचे चार प्रकार बघायला मिळतात. पचन बिघडणे हे सर्वसामान्य लक्षण. म्हणजेच, कधी गाठाळलेली कडक तर कध पातळ मलप्रवृत्ती होणे हे लक्षण प्रत्येक प्रकारात आढळतेच, काही प्रकार मात्र वेगवेगळ्या स्वरूपात आढळून येतात.
वाताज ग्रहणी : मलप्रवृत्ती होताना भरपूर गॅसेस बाहेर पडतात. तहान, तोंडाला कोरड, अंधारी, पोटात गॅसेस याबरोबरच पाठ, मांड्या, पिंढर्या, जांघा, मान या ठिकाणी वेदना होत असतात. जेवण झाल्यावर थोड्या वेळाने पोटात गॅसेस, जडपणा वाढतो. शरीर कृश, रूक्ष होऊ लागते.
पित्तज ग्रहणी : पाताळ, हिरवट, चिकट, मलप्रवृत्ती होणे, काही वेळा आग होणे, (पान 1 वरून) याबरोबरच दुर्गंधी, आंबट ढेकर येणे, छातीत, घशात आग होणे, जास्त तहान, अंग गरम राहणे.
कफज ग्रहणी : मळमळणे, उलटी होणे, तोंड गोड राहणे, अन्न उशिरा पचणे, पोट जड राहणे, छातीत जखडल्याप्रमाणे वाटणे, दुर्गंधीयुक्त ढेकर येणे, चिकट आमयुक्त, कफयुक्त लवकर बाहेर न पडणारी मलप्रवृत्ती ही लक्षणे असतात. वजन कमी झालेले असते; परंतु दुर्बलता, अशक्तपणा, निरुत्साह जाणवत असतो.
सन्नपतिक ग्रहणी : वरील तिन्ही प्रकारची लक्षणे आढळणार्या या प्रकारात वात, पित्त, कफ या तीनही बिघाडांमुळे अशक्तपणा जास्त असतो.
ग्रहणीचे उपद्रव : ग्रहणी हा स्वायत्त, चिरकारी कष्टसाध्य म्हणजेच उशिरा बरा होणारा विकार आहे. वेळच्या वेळी निदान व व्यवस्थित उपचार न झाल्यास व्यवस्थित पथ्य न सांभाळल्यास या विकारामुळे लिव्हरची वाढ होणे, प्लीहा वाढणे, कृमी, पोटात पाणी होणे, रक्ताची कमतरता (अॅनिमिया) तीव्र जुलाब हे उपद्रव होतात. काही रुग्णांत मूळव्याध, हातापायांवर सूज येणे असा उपद्रव जाणवतो. पोषण कमी होत असल्याने पायाचे गोळे दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे, मरगळ, अशक्तपणा हे उपद्रव होत असतात.
संग्रहणीवरील उपचार : संग्रहणीचा विकार प्राथमिक अवस्थेत असताना विविध प्रकारच्या तपासण्या करून घेतल्या जातात. रासायनिक औषधांचा कोर्स काही काळ केल्यावर बरेही वाटते; पण काही काळ गेल्यावर पुन्हा पूर्वीप्रमाणे त्रास सुरू होतो. डॉक्टर बदलले जातात. पुन्हा काही तपासण्या केल्या जातात. नवीन औषधे दिली जातात. पुन्हा काही काळ आराम पुन्हा बिघाड, असे दुष्टचक्र सुरू राहते. विकार सततच राहिल्याने आपल्या पोटात नक्की काय झाले आहे, याचे नक्की निदानच होत नसावे, अशी शंका मनात घर करून राहते. विकाराबद्दलची भीती निर्माण होऊन आत्मविश्वास कमी होतो. कोणताही पदार्थ खाण्याची प्रथमतः भीती वाटू लागते. अनेक रुग्णांत रासायनिक औषधे घेताना आहारासंबंधी सखोल मार्गदर्शन झालेले नसते, असेही आढळते.
आयुर्वेदीय शास्त्राप्रमाणे प्रकार निश्चिती करून प्रकृती, वय, व्यवसाय, ताणतणाव आहार इत्यादीची सखोल माहिती घेऊन शास्त्रीयपणे, सांघिक उपचार केल्यास हा विकार चांगल्या पद्धतीने बरा होऊ शकतो.
अग्निमांद्य दूर करणे म्हणजेच पचनशक्ती वाढविणे हे मूळ तत्त्व वापरून ग्रहणी या विकारावर उपचार केले जातात. विकाराच्या अवस्थेप्रमाणे वेगवेगळ्या औषधी वापराव्या लागतात. तसेच ग्रहण या अवयवाची म्हणजेच आतड्यांची प्रतिकारशक्ती बल वाढविणारी ही औषधे दिली जातात. सूंठ, मुस्ता, कुटज, बिल्व, आवळा, दशमूळ, लसूण, अतिविशा, चंदन मोडळिंब, डाळिंब साल भल्लातक इत्यादी वनौषधींचा शंभस्म, लोह भस्म, रसपर्पटी, पंचामृत पर्पटी, माक्षिक भस्म, ताम्रभस्म यांच्यापासून बनविलेल्या विविध संयुक्त औषधांचा वापर केला जातो. याच्या जोडीलाच पोटाला तेल लावणे, पोट शेकणे हेदेखील अत्यंत उपयुक्त असते.
ग्रहणीतील आहार नियम : ही औषधे घेत असताना आहाराचे पथ्यदेखील महत्त्वाचे असते. आहारामध्ये ताजे मधूर ताक नियमित घेणे सर्वात उपयोगी असते.
भात, भाकरी, दुधी भोपळ्याची भाजी, मुगाचे वरण अथवा कडण, डाळिंब, सफरचंद, जांभूळ, कच्ची केळी, ताक, लोणी, तूप, लाह्याचे पाणी, गाजर यांचा नियमित उपयोग करावा. भाताच्या लाह्या, जोंधळ्याच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, जायफळ, जिरे, मध यांचा वापरही उपयोगी असतो.
गव्हाची पोळी, रोटी, पराठा, मेथी, पालक, शेपू, आंबाडी, शेवगा या भाज्या उडदाचे पदार्थ, घेवडा, वाटाणा, मटार, मटकी, मांसाहार, आंबा, द्राक्ष, फणस, कलिंगड, अंजीर, पपई ही फळे दूध, बटाटा, साबुदाणा, रताळे, लोणची, चटणी, खरडा, मिरची इत्यादी मसालेदार पदार्थ या गोष्टी आजार वाढविण्यास मदत करत असल्याने टाळणे महत्त्वाचे असते. अर्थात, ठराविक काळ व्यवस्थित उपचार घेतल्यावर पचनशक्ती सुधारल्यावर मात्र हे पदार्थ काही प्रमाणात घेता येतात. उन्हात काम, उन्हात फिरणे, जड वजन उचलणे, रात्री जागरण, अतिकष्ट, धूम्रपान, मद्यपान, अतिमैथुन या गोष्टी टाळणेही ग्रहणीवरील उपचार करताना महत्त्वाचे असते.
थोडक्यात महत्त्वाचे : वारंवार पचन बिघडत असल्यास वरीलपैकी पोटाच्या तक्रारी जाणवत असल्यास घाबरून न जाता आयुर्वेदतज्ज्ञाच्या सल्ल्याने शास्त्रीय आयुर्वेद उपचार घेऊन विकार मुक्त होता येते व सदृढ आरोग्य प्राप्त करता येते.