अस्वस्थ करणारे गॅसेस आणि आयुर्वेद उपचार

Published on
Updated on

डॉ. आनंद ओक

अन्नाचे पचन होत असताना अल्प प्रमाणात गॅस प्रत्येकातच उत्पन्न होत असतात. पण पचनक्रिया व्यवस्थित असल्यास ते आपोआप जीरुनही जातात. परंतु पाचक शक्ती म्हणजेच पाचकस्त्रावांचे प्रमाण कमी असल्यास किंवा आतड्याच्या हालचालीस कोणत्याही कारणाने बाधा आल्यास गॅसेसचा त्रास सुरू होतो.

शुल्लक स्वरुपाचे असूनही वारंवार उदभवल्यास मात्र माणसाचे स्वास्थ्य पूर्णपणे बिघडवू शकतात, अशा तक्रारींपैकी एक तक्रार म्हणजे पोटातील गॅसेस.

पोटात वायू धरणे असेही संबोधन यास वापरले जाते. प्रत्येकाला कधी ना कधी तरी ही तक्रार झालेली असते. तसेच प्रत्येक वेळी डॉक्टरी उपचार करावे लागतातच असेही नाही. तरीदेखील चार चौघात बसणे अशक्य करणार्‍या, मनस्वास्थ्य बिघडविणार्‍या या तक्रारीची शास्त्रीय माहिती प्रत्येकास असणे महत्त्वाचे वाटते ती आपण आज घेणार आहोत.

गॅसेस उत्पन्न होण्याची कारणे

वास्तविक अन्नाचे पचन होत असताना अल्प प्रमाणात गॅस प्रत्येकातच उत्पन्न होत असतात. पण पचनक्रिया व्यवस्थित असल्यास ते आपोआप जीरुनही जातात. परंतु पाचक शक्ती म्हणजेच पाचकस्त्रावांचे प्रमाण कमी असल्यास किंवा आतड्याच्या हालचालीस कोणत्याही कारणाने बाधा आल्यास गॅसेसचा त्रास सुरू होतो. पोटातील विविध अवयवांचा वेगवेगळ्या आजारांमुळे पाचकरस व जठराची आतड्यांची हालचाल बिघडत असते व गॅसेस उत्पन्न होत असतात.

जठराचा दाह/सूज (गॅस्टायटीस) आतड्याचा दाह (कोलायटीस), अमीबीयासीस, पित्त वाढणे हे विकार सामान्यपणे गॅसेसचा त्रास उत्पन्न करतात तर काही वेळा पित्तशयाची सूज, पित्ताशयातील खडा, मूतखडा हे विकारही गॅसेस उत्पन्न करतात. बद्धकोष्ठता किंवा संडास साफ  न होणे यामुळे गॅसेस वाढतात. वार्धक्यामुळे आतड्यांची शक्ती कमी झाल्याने हालचाल मंद असते. त्यामुळे गॅसेस उत्पन्न होतात. लहान बालकांत आतड्याची शक्ती पुरेशी वाढलेली नसल्यामुळे गॅसेसचा त्रास होतो. काहीवेळा हेदेखील कारण ठरते.

वरील कारणांबरोबर गॅसेस उत्पन्न करणारे पदार्थ जास्त किंवा वारंवार खाण्यात आल्याने गॅसेस होतात तसेच जेवल्यानंतर लगेच झोपणे, कोणताही व्यायाम न करणे व सतत खाणे यामुळे गॅसेस उत्पन्न होतात. काही रुग्णात मानसिक ताण वाढल्यानंतर गॅसेसचा त्रास वाढल्याचेही आढळते. अचानक झालेला पिण्याच्या पाण्यातील बदल अथवा अशुद्ध पाणी पिण्यात आल्यानेही गॅसेसचा त्रास होतो.

गॅसेस जास्त वाढविणारे पदार्थ

बटाटा, शाबूदाणा, अंडी, मांसाहार, अतिप्रमाणात भात, पुरणपोळी, इडली, ढोकळा, उत्ताप्पा, भेळ, ब्रेड, उसळी (कडधान्ये) इत्यादी पदार्थ गॅसेसचे प्रमाण वाढण्यास मदत करतात. तसेच अतिप्रमाणामध्ये वारंवार काहीही खात राहणे व व्यायााम व फिरणे न करणे यामुळे सर्वच पदार्थांनी गॅसेस वाढतात.

यामुळेच गॅसेसचा त्रास असणार्‍यांनी वरील पदार्थ नेहमी टाळणे महत्त्वाचे असते.

गॅसेसची लक्षणे

पोट जड वाटू लागणे, पोटाचा आकार वाढणे, पोट गच्च होणे किंवा तडस लागल्याप्रमाणे चढणीला लागणे, ढेकर येणे, तेवढ्यापुरते बरे वाटणे, गुदद्वारावाटे गॅस सरकणे सामान्यपणे वरील तक्रारी कमी अधिक प्रमाणात प्रत्येकास जाणवतातच. काहींना मात्र पोटात दुखू  लागते. छातीत दुखते, श्वास घेण्यास त्रास वाटतो, छातीत चमका येतात, अस्वस्थ वाटू लागते. दरम्यान हृदयविकारात अशीच लक्षणे उत्पन्न होत असल्याचे पाहिलेले किंवा वाचलेले, ऐकलेले असते. त्यामुळे 'हे हार्टचे दुखणे तर नाही ना?' अशी शंका मनात उत्पन्न होते आणि एकदा अशी शंका उत्पन्न झाल्यावर 'चिंते'मुळे छातीत धडधडू लागते. श्वास घेण्यास अधिकच त्रास वाटू लागतो. घाम येतो. मग डॉक्टरकडे नेल्यावर इसीजी काढला जातो. पण तो पूर्णपणे नॉर्मल असल्याचे कळते. गॅसेसचे औषध घेतल्यावर झटक्यात बरे वाटते. पण क्षुल्लक वाटणारे गॅसेसचे दुखणे मनात भीती मात्र निर्माण करून ठेवते.

काहीजणात पाठीत दुखणे, कंबर दुखणे, डोके दुखणे या तक्रारी जाणवतात.

गॅसेसचे दुष्परिणाम :

जडत्व, कोणतेही काम नकोसे वाटणे, मरगळ, निरुत्साहीपणा, कार्यक्षमता कमी होणे, पचन कमी झाल्यामुळे पोषकांश कमी मिळतात. सततचे गॅसेस दुर्लक्षित राहिल्यास त्याचा तब्येतीवरही परिणाम होतो.

गॅसेसवरील उपचार

गॅसेसचा त्रास सुरू झाल्यावर अनेकजण जाहिरातीमधून कळलेल्या विविध औषधे तात्पुरती घेत असतात. गॅसेस सरकवण्याची क्रिया या औषधांनी झाल्यामुळे तात्पुरता आरामही मिळतो. पण आपल्याला गॅसेस कोणत्या कारणांनी उत्पन्न होत आहेत? हे कळणे महत्त्वाचे असते. ते कारण दूर होणे गरजेचे असते. त्यामुळे गॅसेसचा त्रास झाल्यावर तज्ञ डॉक्टरला दाखवून या कारणांचा शोध घेऊन त्या कारणावर हुकुम उपचार करावे लागतात.

वनस्पतीज औषधांपैकी सुंठ, मिरी, पिंपळी, हिंग, शेंदेलोण, पांदेलोण, जिरे, लसूण, चिंताक्षार, यवक्षार, सज्जीक्षार, लिंबू रस, शंभभस्म इत्यादी घटकांच्या संयुक्त कल्पाचा रुग्णाच्या प्रकृतीनुसार वापर केला जातो. गॅसेस कमी करणारी ही औषधे अग्निमांद्य दूर करून पचनशक्तीदेखील वाढवितात. या उपचारांच्या जोडीलाच क्षार किंवा लवण युक्त तीळ तैल रोज रात्री 10 ते 15 मिनिटे हलक्या हाताने पोटाला लावावे व लगेच 10 मिनिटे पोट शेकावे. यामुळे उत्तम प्रकारे वातशमन होते तसेच पोटातील स्नायुंची शक्ती वाढून आतड्याची गती सुधारते. काही वेळा गॅसेसचा त्रास जास्त प्रमाणात असल्यास मात्र बस्तीचाही उपयोग करावा लागतो. तसेच गॅसेसचे कारण म्हणून सांगितलेल्या मूळ विकारांचे म्हणजेच आतड्याची सूज इत्यादींची उत्तम उपचार आयुर्वेदीय औषधांनी होतात. त्यामुळे गॅसेसवरील उपचाराबरोबरच मूळ विकाराचे देखील आयुर्वेदीय उपचार घ्यावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news