पित्ताशयातील खडे व होमिओपॅथिक उपचार

Published on
Updated on

पित्ताशय व पित्तनलिका यामध्ये तयार होणार्‍या खड्यांना पित्ताचे खडे असे संबोधले जाते. आता हे पित्ताशय-छातीच्या खाली उजव्या बाजूला उसळलेल्या यकृताच्या खळगीमध्ये असते. यकृतमध्ये तयार होणारे पित्त (बाईल) साठविण्यासाठी पित्ताशयाचा वापर होतो. ज्यावेळी यकृतामधून पित्त हे पित्ताशयात आल्यानंतर ते घट्ट केले जाते व जेवणानंतर कोलेसिस्टोकाईनिन नावाच्या संप्रेरकामुळे आकुंचित होऊन त्यातील पित्त लहान आतड्यात पचनासाठी सोडले जाते.

पित्ताशयातील खडे हे पित्ताशयाच्या आजारांमुळे अथवा, (मेटॉबोलीझम) चयापचयाच्या बदलांमुळे, दोषामुळे तसेच स्त्रियांमधील हार्मोनल बदल, पाळीच्या अनियमितता यामुळे होत असतात. यकृतामधून येणारे पित्त पित्ताशयात साठते. तेथे त्याचे कॉन्सनट्रेट (घट्ट होणे) होणे हे कोलेस्ट्रॉल नावाच्या घटकाने होऊन कोलेस्ट्रॉॅलचे खडे तयार होतात. तसेच पित्ताशयातून लहान आतड्यात जाणार्‍या नळीत अडथळा असेल, तर त्यामुळे तेथे पित्त साठून तेथे खडे होतात. पॅन्क्रियाज या अवयवाला जर सूज असेल तरी ते खडे होतात. बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल तरी तेथे पिग्मेंट नावाचे खडे होतात. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन या हार्मोनची पातळी बदलल्याने तेथे पित्ताशयातील खडे होतात. हे शक्यतो मेनॉपॉजच्या (वयाच्या 40 नंतर) कालावधीत दिसून येतात.

पित्ताशयातील खड्यांचे 3 प्रकार आहेत 

1) कोलेस्ट्रॉॅल – हा प्रकार जास्त प्रमाणात असून याचे खडे मऊ व गुळगुळीत असतात. याचे प्रमाण आपल्याकडे कमी व अमेरिका, युरोपमध्ये जास्त दिसते.

2) पिग्मेंट स्टोन (बाईल पिग्मेंट) – हिमोलायटिक जॉन्डीसमध्ये हे पिग्मेंट स्टोन जास्त आढळतात.

3) कॅल्शियम – भारतातील रुग्णांमध्ये कॅल्शियम स्टोनचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. यात कॅल्शियमचे कॉन्सनटे्रट होऊन हे खडे बनतात. तसेच पित्ताशयाला सूज आल्यामुळे पित्ताशयातील खडे बनू शकतात याला 'अ‍ॅक्यूट कॅलक्युलस कोलेसिस्टायटिस' असे म्हणतात.

लक्षणे ः

पोटात दुखते ः बेंबीच्या थोडे वर उजव्या बाजूस रुग्णास सतत अथवा कधीतरी दुखू लागते. कोणाला दुखण्याबरोबर उलट्या होऊ लागतात. भूक कमी होते, अपचनाच्या तक्रारी वाढतात, करपट ढेकर येणे व त्याला दुर्गंध असणे, पोट फुगणे.

कावीळ ः अत्यंत टोकाच्या अवस्थेमध्ये आतड्यात अवरोध असेल तर कावीळ होणे व सतत उलट्या होणे, श्वासोच्छ्वासाला त्रास होणे.(बिलीअरी प्लुअर फिस्टयुला). बर्‍याच रुग्णांना वर दिलेल्या लक्षणांमधील कुठलीच लक्षणे जाणवत नाहीत, अशा प्रकाराला 'असिम्टोमॅटिक गॉल स्टोन' असे म्हणतात.

खड्यांचे निदान – यासाठी खालील तपासण्या करणे महत्त्वाच्या आहेत.

1.पोटाची सोनोग्राफी – यामध्ये खडा नेमका कुठे आहे. यकृताकडून पित्ताशयात जाणारी नळी, पित्ताशय व पित्ताशय नलिका यामध्ये कुठे आहे व किती साईजचा आहे हे समजते. 

2. एक्स रे तपासणी. 

3.दुर्बिणीने तपासणी. 

4. लिव्हर फंक्शन टेस्ट – यकृताच्या स्रावाची तपासणी.

5. सिरम अमायलेज – अग्नाशयाच्या स्रावाची परीक्षण व तपासणी.

पित्ताशयातील खड्यावर उपचार होमिओपॅथिक चिकित्सेने खूपच चांगला व कायमस्वरूपी होतो. होमिओपॅथीमध्ये प्रत्येक व्यक्ती ही दुसर्‍या व्यक्तीपेक्षा भिन्न मानली जाते म्हणजे जरी याचे चार रुग्ण समोर असतील तरी त्यांची औषधे ही प्रत्येक व्यक्तीच्या भिन्नतेवर, वैशिष्ट्यांवर, त्यांच्यातील शारीरिक लक्षणे कमी/अधिक होण्याच्या वेळा, त्यांची खाण्या-पिण्यातील आवडी-निवडी, आहार-तहान, डोक्यापासून पायापर्यंतच्या इतर तक्रारी व त्यांची माहिती, झोप-स्वप्न, थंड-उष्ण प्रकृती, अनुवंशिकता-आई/वडिलांच्या दोन्ही बाजूचे आजार व सर्वात महत्त्वाचे त्या त्या रुग्णाची मानसिकता (मनाची, स्वभावाची माहिती) इ. गोष्टींचा अभ्यास सखोल व सूक्ष्म करून त्या त्या रुग्णाच्या प्रकृतीनुसार व्यक्तिमत्त्वानुसार योग्य औषधाची निवड करून योग्य मात्रेत दिले जाते. त्यामुळे हळूहळू रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढविली जाते, रुग्णाचे लक्षणे कमीत कमी होऊ लागतात. शिवाय, खड्यांची साईज ही कमी कमी होऊन खडा विरघळून पडण्यास मदत होते. शिवाय ज्या कारणांमुळे ज्या दोषांमुळे हे पित्ताशयातील खडे निर्माण झाले आहेत ती कारणे व दोष समूळ नायनाट होतात व आताच्या तक्रारी व पुढे होणारे त्रास हे सर्व कायमस्वरूपी थांबवले जाते व रुग्णाला फक्त खड्यावर उपचार न होता पूर्व रुग्णाला विचारात घेऊन उपचार होतो.

उपचार –

1) पल्साटीला :– या प्रकारातील रूपण शक्यतो स्त्रिया असतात. अतिशय हळवा स्वभाव असून, पोटदुखी अचानक सुरू होते व अचानक थांबते. कुठला असा ठराविक वेळ नसतो. त्यांना त्रास झाल्यावर जर कोणी दिलासा दिला तर बरे वाटते. सांत्वनाची अपेक्षा असते. कोणाचेही मन दुखावत नाहीत, कुठल्याही कामाला कधी नाही म्हणत नाहीत. लगेच डोळ्याला पाणी येते. उष्ण प्रकृती असून दिसायला नाजूक, बुटक्या, गोया व घार्‍या डोळ्यांच्या असतात. पित्ताशयातील खड्यांवर उपयुक्त पडतात.

2) फॉस्फरस : लिव्हर संदर्भातील आजार, काविळीमुळे पित्ताशयातील खडे होतात. या प्रकारातील रुग्ण हळवे, उंच कलाप्रेमी असतात. आकर्षकता असते. पोटदुखी, गॅस, अपचन, मळमळणे, खाल्ल्यानंतर 5-10 मिनिटांनी उलटी होते.

3) बेलाडोना :– पोटात अचानक दुखणे – – Acute Calculus Colysystitis  या प्रकारात हे औषध उपयोगी पडते. उलटी-उचमळणे या तक्रारी होतात.

4) कॅलकेरीया कार्ब : स्थूल, थुलथुलीत, आळशी व मंद अशी प्रकृती असते. लिव्हरवर सूज येणे, गॉल ब्लॅडरवर सूज येणे व खडा निर्माण होणे हे या प्रकृतीतील रुग्णाचे वैशिष्ट्य आहे. थंड प्रकृती असून थंडीच्या दिवसात जास्त त्रास होतो.

5) लायकोपोडीयम (Lyco)  :- हे उष्ण प्रकृतीचे लोक असतात. गोडाची आवड जास्त असते. उजव्या बाजूला पोटदुखी होऊन गॅस, पित्त, करपट ढेकरांवर यांचा उपयोग चांगला होतो. हे रुग्ण वैचारिक असतात. त्यांच्यात एकसंध ठेवण्याची शक्ती असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news