गर्भाशयाचे कार्य संपले म्हणून ते काढून टाकायचे का?

Published on
Updated on

डॉ. प्रवीण हेंद्रे

आयव्हीएफच्या अनुषंगाने आता बहुचर्चित विषय म्हणजे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया.आज आपण त्याबद्दल सविस्तरपणे चर्चा करू या. गर्भाशय काढणे खरोखरच गरजेचे आहे का? ते काढण्यासाठी कोणती कारणे आहेत? त्याचे परिणाम व दुष्परिणाम तसेच समाजात असलेले त्याबद्दलचे समज व गैरसमज याचा आढावा घेऊ या. 

हा विषय ज्वलंंत होण्यामागील मुख्य कारण म्हणजे ऊसतोड करणार्‍या तरुण स्त्रियांचे एका अवैज्ञानिक कारणासाठी गर्भाशय काढून टाकण्याची केलेली वारेमाप शस्त्रक्रिया होय. केवळ त्या स्त्रीला मासिक पाळीदरम्यान होणार्‍या त्रासामुळे ऊसतोडीसाठी गैरहजेरीचे प्रमाण वाढते म्हणून गर्भाशय काढणे हे खरोखरच अक्षम्य आहे व त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय बदनाम होऊ घातला आहे. त्यासाठी हा विषय समजून घेणे जरूरीचे झाले आहे.

गर्भाशय म्हणजे स्त्रीच्या आंत्र जननेंद्रियाचा भाग आहे. आंत्र जननेंद्रिय म्हणजे गर्भाशय, गर्भनलिका व स्त्री बीजांड कोष होय. स्त्री बीजांडातून स्रवणार्‍या इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकामुळे स्त्रीला मासिक पाळी तर येत असतेच. परंतु, त्याचबरोबर इस्ट्रोजेन संप्रेरकामुळे स्त्रीच्या शरीरावर बरेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुकूल परिणाम होत असतात. ते खालीलप्रमाणे आहेत. 

1) मासिक पाळीचे नियंत्रण

2) स्त्रीचा जननमार्गाचा ओलाव टिकवणे

3) कातडीमधील कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रित करणे

4) हाडे बळकट करणे

5) रक्‍तवाहिन्यांची म्हणजेच धमण्यांची लवचिकता टिकविणे, ज्यामुळे रक्‍तदाब नियंत्रित होतो.

6) हृदयावर लाभदायक परिणाम करते व हृदयविकारापासून बचाव.

म्हणूनच नैसर्गिक रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये  

1) जननमार्गाचे जंतुसंसर्गाच्या प्रमाणात वाढ होते.

2) हाडे ठिसूळ होतात.

3) चिडचिड होते.

4) लैंगिक भावना कमी होते.

5) रक्‍तदाबाचे विकार तसेच हृदयविकाराचा झटका व अर्धांगवायूचा झटका येणे, अशी Complication स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतरच आढळतात.

6) कातडीचे तेज कमी होते.

7) रक्‍तवाहिन्यांचे आजार व हृदयाला रक्‍त पुरवठा कमी होतो.

8) छातीत धडधडते.

9) अचानक शरीर गरम होणे, असे बदल रजोनिवृत्ती पश्‍चात होतात. ही सर्व लक्षणे न होण्यामागे इस्ट्रोजन नावाचे संप्रेरकच असते. इस्ट्रोजन संप्रेरकचा पुरवठा हा स्त्री बीजांड कोशामधून होत असतो. जेव्हा रजोनिवृत्ती काळ येतो, तेव्हा इस्ट्रोजन संप्रेरक स्त्री बीजांडात तयार होण्याचे बंद झाले असते व त्यामुळेच शरीररचनेवर जे संरक्षक कवच असते, ते निघून जाते व या गोष्टी स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर होत असतात. पुरुषामध्ये इस्ट्रोजेनचे संरक्षण नसल्यामुळे त्यांना हृदयरोग व रक्‍तवाहिन्यांचे विकार कमी वयात होत असतात.

गर्भाशय काढीत असताना काही वेळेस दोन्ही बाजूंची स्त्री बीजांडे काढली जातात व त्यामुळे हा कृत्रीमरीत्या अकाली रजोनिवृत्ती होते. व रजोनिवृत्तीनंतर वर नमूद केलेल्या घटना व तक्रारी लगेचच सुरू होत असल्यामुळे त्यांच्या दुष्परिणामाला त्या स्त्रियांना तोंड द्यावे लागते. काही वेळेस स्त्रीबीजांडकोष काढत नाहीत; परंतु बीजांडकोषाच्या संप्रेरकांना योग्य परिणाम व योग्य प्रमाणात सोडण्यासाठी त्याचे टार्गेट ऑर्गन म्हणजे गर्भाशयाचे एपवेाशीींर्ळीा होय. स्त्रीबीजांडकोष ठेवला आहे व गर्भाशय काढले असेल, तर बीजांडे जास्तीत जास्त पाच वर्षे कार्यरत राहतात व नंतर निष्क्रिय होऊन जातात. म्हणूनच रजोनिवृत्ती वेळेपूर्वी जर गर्भाशय काढले, तर इस्ट्रोजन हॉर्मोन नसल्याने होणारे दुष्परिणाम लवकरच दिसू लागतात. आपण आता गर्भाशयाचे सर्वसामान्य आजार व गर्भाशय न काढता करता येण्यासारख्या उपचारांबद्दल पाहू या.

त्यापूर्वी शरीरातील कोणताही अवयव अथवा कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी खालील प्रश्‍नांची समर्पक उत्तर मिळणे आवश्यक आहेत.

1) खरोखरच शस्त्रक्रिया करणेची गरज आहे का?

2) शस्त्रक्रियेव्यतिरिक्‍त इतर कोणते हमखास उपाय आहेत का?

3) शस्त्रक्रियेनंतर व्यक्‍ती संपूर्ण व्याधीमुक्‍त होणार आहे का?

4) अजाराची जोखीम (ठळीज्ञ) शस्त्रक्रियेच्या जोखमीपेक्षा जास्त आहे का?

5) शस्त्रक्रियेनंतर एखादा नवीन त्रास सुरू होईल का? 

थोडक्यात, ऑपरेशनची जोखीम अजाराच्या जोखमीपेक्षा जास्त असेल तर ऑपरेशनव्यतिरिक्‍त इतर उपाय शोधावे लागतात. जर आजारावरील शस्त्रक्रियेचे फायदे जास्त व आजारामुळे जोखमीपेक्षा कमी असेल, तर शस्त्रक्रिया करण्यास हरकत नाही. या सर्व गोष्टींचा सारासार विचार गर्भाशय काढण्यापूर्वी करणे खूप गरजेचे आहे. गरज पडल्यास अगदी दोन महिन्यांच्या मुलीचेही गर्भाशय काढावे लागते व सर्व ठीक असल्यास 90 वर्षांच्या स्त्रीच्या गर्भाशयाला हात लावावा लागत नाही. (क्रमश:)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news