Frequent Burping | सतत ढेकर येताहेत?

Frequent Burping |
Frequent Burping | सतत ढेकर येताहेत?
Published on: 
Updated on: 

डॉ. संतोष काळे

जेवणानंतर एक-दोनदा ढेकर येणे ही पचनसंस्थेची एक अत्यंत स्वाभाविक आणि आराम देणारी प्रक्रिया मानली जाते. पोटात अन्नासोबत गेलेली हवा बाहेर पडल्यामुळे पोटावरील ताण कमी होतो. मात्र, दिवसभरात वारंवार, सतत किंवा त्रासदायक ठरेल अशा तीव्रतेने ढेकर येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते.

एका निरोगी व्यक्तीला दिवसभरात साधारणपणे ३० वेळा ढेकर येणे सामान्य समजले जाते. कार्बोनेटेड शीतपेये, मद्यपान, तसेच राजमा, बीन्स, कांदा, कोबी आणि ब्रोकोली यांसारख्या वायू निर्माण करणार्‍या पदार्थांच्या सेवनाने याचे प्रमाण वाढू शकते. याव्यतिरिक्त मानसिक ताण, भीती किंवा अस्वस्थतेमुळेही ढेकरांचे प्रमाण वाढते. अशावेळी व्यक्ती नकळत जास्त हवा गिळते. काही प्रकरणांमध्ये ही हवा जठरात पोहोचण्यापूर्वीच घशातून परत बाहेर ढकलली जाते, ज्याला वैद्यकीय परिभाषेत ‘सुप्रागॅस्ट्रिक बेल्चिंग’ म्हटले जाते. तर काही व्यक्तींमध्ये नकळत वारंवार हवा गिळण्याची सवय (एरोफॅगिया) असते, ज्यामुळे पोट फुगणे, पोटात ताण निर्माण होणे आणि गॅस बाहेर पडणे अशा तक्रारी सुरू होतात. मात्र, ढेकरांचे प्रमाण वाढण्यासोबतच शरीरात इतरही काही त्रास जाणवत असतील, तर ते साधे अपचन नसून तातडीने वैद्यकीय तपासणीची गरज दर्शवणारे धोक्याचे संकेत असतात.

पहिले महत्त्वाचे लक्षण म्हणजे पोटात किंवा छातीत जाणवणारे अनाकलनीय दुखणे. वारंवार ढेकर येण्यासोबत जर छातीत अस्वस्थता, जडपणा किंवा पोटाच्या वरच्या भागात सातत्याने दाब व वेदना जाणवत असतील, तर तो पचनसंस्थेच्या गंभीर विकाराचा संकेत असू शकतो. दुसरे गंभीर लक्षण म्हणजे अन्न गिळताना होणारा त्रास. जेवताना घास घशाखाली उतरवताना वेदना होणे, छातीत अन्न अडकल्यासारखे वाटणे किंवा जेवणानंतर वारंवार उलट्या होणे हे पचनमार्गातील अडथळ्याचे लक्षण असू शकते.

सर्वांत चिंताजनक लक्षण म्हणजे पचनसंस्थेतून होणारा अंतर्गत रक्तस्राव. जर शौचाचा रंग गडद काळा झाला असेल किंवा उलट्यांमधून रक्त पडत असल्याचे दिसून आले, तर हा तातडीने उपचार घेण्याचा धोक्याचा इशारा ठरतो. याकडे एका क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

याशिवाय, कोणतेही स्पष्ट कारण नसताना अचानक वजन वेगाने घटणे, सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, हलका ताप राहणे आणि भूक अचानक मंदावणे ही लक्षणेही ढेकरांच्या समस्येमागे जठर किंवा अन्ननलिकेचा गंभीर आजार असण्याची शक्यता वर्तवतात. यावर घरगुती उपाय करून वेळ काढण्यापेक्षा वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून पोटाची तपासणी करून घेणे हितावह ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news