आजचा दिवस का आहे सगळ्यांचा आवडता?

Published on
Updated on

पुढारी डेस्क

झोप प्रत्येक प्राण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्तीने रोज ७ ते ८ तासांची झोप घेतली पाहिजे हे तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेलाच असाल. झोप पुरेशी झाली नाही तर वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. या गोष्टीचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून मार्च महिन्यातला एक दिवस हा जागतिक निद्रा दिन म्हणून साजरा केला जातो.

केव्हापासून साजरा केला जातो World Sleep Day 

'चांगली झोप, चांगलं आयुष्य, चांगलं जग' हे निद्रा दिनाचं ब्रीदवाक्य आहे. World Sleep Society संस्थेच्या अंतर्गत २००७ सालापासून दरवर्षी मार्च महिन्यात जागतिक निद्रा दिन साजरा केला जातो. निद्रा दिनाची तारीख दरवर्षी बदलत राहते, पण बहुतेककरून शुक्रवारचा दिवसच निवडण्यात येतो. गेल्यावर्षी हा दिवस १३ मार्चला साजरा करण्यात आला होता. 

आता तुम्ही म्हणाल की निद्रा दिन म्हणजे या दिवशी पूर्ण दिवस झोपा काढायच्या का? तर, तसं नाही. झोपेचं महत्त्व आणि त्याच्याशी निगडीत आजारांबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. २००७ सालच्या पहिल्या निद्रा दिनाचं कारणच जगभरातील आरोग्य तज्ज्ञांना एकत्र आणून झोप या विषयावर चर्चा करण्याचं आणि त्याचं महत्त्व जगभर पोहोचवणं हे होतं. त्यानंतर पुढे हा प्रघातच पडला.

अशी आहे चांगल्या झोपेची नियमावली   

– रोज ठरवलेल्या एकाच वेळेवर झोपावे आणि उठावे.   

– दिवसा ४५ मिनिटांपेक्षा जास्त झोपू नये.   

– झोपेच्या ४ तास आधी धूम्रपान किंवा मद्यपान करू नये.   

– झोपेच्या ६ तास आधी चहा, काॅफी किंवा उत्तेजित करणारे पेय घेऊ नये.   

– रोज ४ तास आधी खूप मसालेदार किंवा गोड जेवण करू नये.  झोपेपूर्वी हलके जेवण चालेल.   

– रोज व्यायाम करावा, पण अगदीच झोपेच्या आधी नको.   

– बिछाना तसेच झोपेची खोली आरामदायी व हवेशीर असावी.   

– आवाज किंवा उजेडामुळे झोप माेडणार नाही याची काळजी घ्यावी.   

– झोपेची खोली फक्त झोपण्याकरिता व संबंधाकरिता वापरावी

अपुर्‍या झोपेचे तोटे

१. विसराळूपणा 

झोपताना शरीर आराम करत असेल तरीही मेंदू मात्र जागरूक असतो. आपल्या मेंदूने जी अल्पकालीन स्मृती जतन करून ठेवलेल्या असतात त्या दीर्घकालीन स्मृतींमध्ये साठवण्याचे काम मेंदू करत असतो. मग, जेव्हा आपण जागे होतो तेव्हा अल्पकालीन स्मृती आणखी आठवणी साठवण्यास सज्ज होतात. जेव्हा झोप अपुरी राहते तेव्हा मेंदूच्या या कार्यात अडथळा निर्माण होतो. त्यातून मग विसराळूपणा येऊ लागतो. 

२. अपुर्‍या झोपेचा मेंदूवर परिणाम

कॉम्प्युटरवर एक्सेल शीटवर काम करता करता ग्राहकाशी बोलणे हे आपण सर्वच जण करतो. कारण, बहुतांश कामांमध्ये एकाच व्यक्तीला एकाच वेळी दोन-तीन कामे करावी लागतात किंवा एकाच वेळी दोन-तीन भूमिका साकाराव्या लागतात. या गोष्टींचे महत्त्व नोकरीच्या ठिकाणी असले तरी मेंदूसाठी इतके जास्त नसते. जेव्हा आपण सातत्याने एकाच वेळी अनेक कामे करतो म्हणजे मल्टिटास्किंग करतो तेव्हा मेंदू बंद होतो आणि झोप पुरेशी झाली नसेल तर मात्र मेंदू आपल्या कल्पनेपेक्षाही लवकर बंद होतो. 

३. मनोवस्था 

 ज्या व्यक्तीची झोप अपुरी होत असेल तर व्यक्ती एखाद्या प्रसंगामध्ये भावनिकदृष्ट्या किंवा नकारात्मकदृष्ट्या व्यक्त होऊ शकते. मेंदूच्या ज्या भागात राग, नैराश्य यासारख्या भावना नियंत्रित होतात त्या भागाचे कार्य होण्यासाठी झोप पूर्ण होणे फार गरजेचे असतात. अपुरी झोप झालेली व्यक्ती चिडचिडी, भांडकुदळ होते आणि सहकर्मचारी म्हणून कोणालाही नकोशी वाटते.

४. थकवा 

आपण जेव्हा झोपतो तेव्हा मेंदू काही संप्रेरके सोडत असतो. त्यातील काही संप्रेरके शरीराची अन्नग्रहण करण्याची क्षमता नियमित करतात. आपण पुरेशी व्यवस्थित झोप घेतली तर ही हार्मोन्स आपल्यासाठी चांगले काम करतात आणि त्यामुळेच दुसर्‍या दिवशीही आपण ताजेतवाने राहतो. त्यामुळेच सात तासांची झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. झोप पूर्ण झाली तर दुसर्‍या दिवशी आपण नीट अन्नसेवन करू शकतो. भूक आणि झोप यांची काळजी घेत योग्य सांगड घातली तर कामही व्यवस्थित करू शकतो.

शांत झोप ही मेंदूच्या व शरीराच्‍या दृष्टीने अत्‍यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे माहिती साठवून ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळे रात्रीची जागरणे करण्यापूर्वी विचार करा. त्याचा कामावर परिणाम होतो. कामाच्या ठिकाणी आळसटल्यासारखे राहणे नक्कीच नुकसान करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news