

डॉ. भारत लुणावत
रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना तेलाने हलकी मालीश करणे, हा केवळ हिवाळ्यातील उपाय नसून, दैनंदिन आरोग्य आणि शांत झोपेसाठी उपयुक्त ठरणारा एक प्रभावी आयुर्वेदीय उपचार मानला जातो.
आयुर्वेदात या पद्धतीस ‘पादाभ्यंग’ असे संबोधले जाते. दिवसभराच्या कामातून निर्माण झालेला शारीरिक थकवा कमी करणे, मानसिक ताण निवळणे, झोपेची गुणवत्ता सुधारणे आणि शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवणे या द़ृष्टीने पादाभ्यंगाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पायांच्या तळव्यांमध्ये असंख्य नाड्या आणि दाबबिंदू असतात, जे थेट शरीरातील विविध अवयवांच्या कार्याशी संबंधित असतात. त्यामुळे रात्री अवघ्या पाच मिनिटांची ही साधी प्रक्रिया संपूर्ण शरीरावर सकारात्मक परिणाम घडवून आणते. तळव्यांवरील नाड्यांना उत्तेजन मिळाल्यामुळे मेंदूला विश्रांती मिळते, मन शांत होते आणि झोप अधिक खोल व निवांत होते.
पादाभ्यंगासाठी वापरले जाणारे तेलही महत्त्वाचे ठरते. उष्णता आणि वेदनाशामक गुणांसाठी मोहरीचे तेल उपयुक्त मानले जाते. थंडावा आणि कोमलपणा हवा असल्यास खोबरेल तेल लाभदायक ठरते. नाड्यांची शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेचा तेज वाढवण्यासाठी बदामाचे तेल वापरले जाते, तर घृताचा उपयोग केल्यास झोप अधिक गाढ लागते आणि शरीरातील कोरडेपणा कमी होतो. नियमितपणे तळव्यांना तेल लावल्याने ताणतणाव आणि थकवा कमी होतो. दिवसभराच्या धावपळीत शरीरात निर्माण होणारा ताण आणि नाड्यांवरील दाब या मालिशेमुळे सैल होतो. परिणामी, शरीर विश्रांतीच्या अवस्थेत जाते. पायांत वेदना, आकडी किंवा सूज जाणवणार्यांसाठीही हा उपाय लाभदायक ठरतो. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे स्नायूंचे जडत्व कमी होते आणि हलकेपणा जाणवतो.
त्वचेच्या द़ृष्टीनेही पादाभ्यंग महत्त्वाचा आहे. तळव्यांची त्वचा मऊ राहते. विशेषतः हिवाळ्यात टाचांना पडणार्या भेगांमध्ये या उपायामुळे लक्षणीय सुधारणा दिसून येते. आयुर्वेदानुसार पायांच्या तळव्यांचा शरीरातील दोषांशी म्हणजे वात, पित्त आणि कफ यांचा निकटचा संबंध असतो. रात्री तेलाने मालीश केल्याने हे दोष संतुलित राहतात, शरीरातील उष्णता नियंत्रित होते आणि ऊर्जा योग्य प्रकारे प्रवाहित होते. नाड्यांवरील दाबबिंदूंवर होणार्या परिणामामुळे हार्मोन्सचे संतुलन सुधारते, नर्व्हस सिस्टीम बळकट होते आणि मनःस्थिती अधिक सकारात्मक राहते. चिंता कमी होते आणि मानसिक स्थैर्य मिळते. पारंपरिक आरोग्यशास्त्रात असेही मानले जाते की, तळव्यांना घृत किंवा तेल लावल्याने डोळ्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. डोळ्यांचा कोरडेपणा, जळजळ किंवा थकवा यामध्ये यामुळे आराम मिळतो.
मालीश योग्य पद्धतीने करण्यासाठी झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ करून कोमट पाण्याने धुवावेत. नंतर तळहातावर थोडेसे तेल घेऊन दोन्ही तळव्यांवर पाच ते सात मिनिटे गोलाकार हालचालीत, हलक्या दाबाने मालीश करावे. खालून वरच्या दिशेने दाब देत केलेली मालीश अधिक परिणामकारक ठरते. त्यानंतर मोजे घातल्यास तेल शोषले जाते आणि कपड्यांवर तेल लागत नाही. नियमितपणे अवलंबिल्यास हा साधा उपाय शरीर आणि मन दोन्हींना दीर्घकालीन लाभ देणारा ठरतो.