

पुढारी ऑनलाईन डेस्क : मानवी मेंदू हा निसर्गाचा एक सुंदर अविष्कार आहे. त्यामुळे आपण आपल्या मेंदूचे आरोग्य उत्तम ठेवणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, कारण काही चुकीच्या सवयींमुळे त्याला मोठे नुकसान होऊ शकते. हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोकसारख्या प्रतिष्ठित संशोधन संस्थांच्या अहवालांच्या आधारे, मेंदूच्या आरोग्याला होणाऱ्या हानीबाबतची माहिती समोर आली आहे. तर या बातमीतून आपण जाणून घेऊयात मेंदूचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काही रंजक गोष्टी...
अमेरिकेच्या न्यूरोलॉजी आणि वेलनेस सेंटरच्या मते, आपला मेंदू अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतो, जर आपल्याला पुरेशी आणि चांगली झोप मिळाली. प्रौढांसाठी, 7 ते 8 तासांची सलग झोप आदर्श मानली जाते. झोप घेतल्यानंतर, मेंदूला आवश्यक विश्रांती मिळते, ज्यामुळे तो नवीन पेशी तयार होतात. त्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन मिळते. यासोबतच आपणास अधिक चांगली स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करणे, आणि निर्णय घेणे सोपे जाते. चांगल्या झोपेमुळे, मानसिक आरोग्य सुधारते आणि डिमेंशिया व अल्झायमर यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. म्हणूनच, चांगली झोप घेतल्यास आपल्या मेंदूला बळकटी मिळते आणि जीवन अधिक ताजेतवाने व ऊर्जावान होऊ शकते.
नाश्ता करणे हे आपल्या शरीरासाठी तसेच मेंदूसाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारण रात्रभर जेवण न घेतल्यावर दिवसभराची ऊर्जा नाश्त्यातून मिळते. काही लोक सकाळी वेळेअभावी नाश्ता सोडून देतात, पण हे केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, ज्याचा थोडक्यात मेंदूवर परिणाम होतो. नियमित नाश्ता केल्याने मेंदूला आवश्यक पोषण मिळते आणि त्याची कार्यक्षमता उत्तम राहते. पोषक तत्त्वांची योग्य मात्रा मिळाल्याने, मेंदूला उत्तम कार्य करण्यास मदत मिळते, स्मरणशक्ती व मानसिक ताजेतवानेपणात सुधारणा होऊ शकते. त्यामुळे नाश्ता घेतल्यास आपला मेंदू ताजा आणि सक्रिय राहतो, आणि दिवसाची सुरुवात अधिक चांगली होते.
आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असते. तसेच पाणी मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्वाचे आहे, कारण मेंदूतील 75% भाग पाण्याने भरलेला असतो. मेंदूला हायड्रेटेड ठेवणं हे त्याच्या उत्तम कार्यासाठी आवश्यक आहे. पुरेसं पाणी पिऊन, मेंदूच्या ऊतींना आवश्यक हायड्रेशन मिळवता येते, ज्यामुळे त्याचे कार्य प्रगल्भ व प्रभावी होते. पाण्याच्या योग्य प्रमाणात सेवनामुळे मेंदूला तार्किक विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि चांगले काम करण्याची क्षमता मिळते. तज्ज्ञांच्या मते, प्रौढ व्यक्तींनी दिवसातून किमान दोन लिटर पाणी प्यावे. तुमच्या वजन, आरोग्य, वय, जीवनशैली आणि हवामानानुसार पाण्याचं सेवन थोडं जास्त किंवा कमी होऊ शकतं. त्यामुळे, पुरेसं पाणी पिऊन, आपला मेंदू निरोगी आणि ताजेतवाने ठेवता येतो.
आपल्या आधीच्या पिढीने कॅल्क्युलेटरचा वापर न करता साध्या-साध्या आकडेमोडीचा सराव केला, अनेक फोन नंबर त्यांना सहजपणे लक्षात राहायचे, तसेच भरपूर पुस्तक वाचनामुळे त्यांचे सामान्य ज्ञान खूप मजबूत होते. या सवयींमुळे त्यांच्या मेंदूला चांगला व्यायाम मिळायचा, ज्यामुळे त्यांची विचारशक्ती आणि स्मरणशक्ती दीर्घकाळ तंदुरुस्त राहिली. मात्र आपण आजच्या महाजालाच्या युगाच इंटरनेटचा अतिवापर करतो. त्यामुळे आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आपण जितका अवलंबत्व टाळू ते आपल्या मेंदूसाठी फायदेशीर ठरणार आहे.
हेडफोन किंवा एअरपॉड्स वापरताना त्यांचा योग्य वापर महत्वाचा आहे. 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने श्रवणशक्तीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. जर एकदा तुमची श्रवणशक्ती बिघडली, तर ती दुरुस्त करणे कठीण होऊ शकते. श्रवणशक्ती कमी झाल्यावर, त्याचा थेट प्रभाव मेंदूवर होतो. अमेरिकेतील संशोधकांच्या मते, कमी श्रवणशक्ती असलेल्या लोकांच्या मेंदूच्या ऊतींना हानी पोहोचते, ज्यामुळे त्यांना अल्झायमर सारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे, हेडफोनचा वापर मर्यादित ठेवून आणि आवाजाची पातळी नियंत्रित करून आपली श्रवणशक्ती आणि मेंदूचे आरोग्य जपणं खूप महत्त्वाचं आहे.
जर तुम्हाला सतत नकारात्मक विचार येत असतील, जसे की "काहीही होणार नाही", "जगात सर्व काही वाईट आहे", "भविष्य अंधकारमय आहे", तर हे तुमच्या मेंदूला हानी पोहचवू शकतात. नकारात्मक विचारांमुळे तणाव, नैराश्य आणि चिंता निर्माण होऊ शकते. त्याऐवजी, सकारात्मक विचार करण्याची सवय लावा. "सर्व काही सुधारू शकते", "भविष्य उज्ज्वल आहे" आणि "मी मजबूत आहे" असे विचार करून आपला मेंदू ताजेतवाने आणि सक्षम ठेवा. सकारात्मक विचार तुमच्या मानसिक आरोग्याला बळकट करतात आणि जीवनाला एक नवीन दिशा देतात.