भीतीदायक चक्‍कर आणि आयुर्वेद | पुढारी

Published on
Updated on

डॉ. आनंद ओक

फारशी वेदना नसणारा पण माणसाला त्रस्त करून सोडणारा मनाचा आत्मविश्‍वास कमी करणारा असा एक विकार म्हणजे 'चक्‍कर येणे', फिरणे किंवा गरगरणे अशा संज्ञा देखील यासाठी वापरल्या जातात. आधुनिक शास्त्राप्रमाणे यालाच 'व्हर्टिगो' असे म्हणतात. 

रुग्णांची मानसिकता ः 

सर्वसाधारणपणे जेव्हा चक्‍कर येेते अशावेळी फॅमिली डॉक्टरकडून किंवा मेडिकलमधून चक्‍करवरील गोळी घेतली जाते. यानंतर बरेही वाटते, परंतु  काही वेळा या गोळीचा असर संपल्यावर पुन्हा चक्‍कर जाणवू लागते. यानंतर विविध तपासण्या करून तज्ज्ञाकडून चक्‍कर येण्याचे कारणं शोधतात. काही जणं प्रत्येकवेळी तात्पुरती गोळी घेत राहतात. या गोळीमुळे काहींना दुष्परिणामही जाणवत असतात. याचबरोबर 'माझी चक्‍कर बंद का होत नाही? ही चक्‍कर नक्‍की कशामुळे येते?' इत्यादी प्रश्‍न मनाला सतावत असतात. सारखी 'आता चक्‍कर येते की काय?' अशी भीती मनात घर करून राहते. बाहेर फिरण्याचा, भरभर चालण्याचा,  प्रवास करण्याचा आत्मविश्‍वास कमी होतो. काही जणात मन आत्मकेंद्रित होऊन चिंताग्रस्त झालेले असते. आता ही चक्‍कर बरीच होणार नाही, अशी धारणा बनू लागते. 

रुग्णांची मानसिकता ः 

चक्‍करचा आजार असे म्हटले जात असले तरी विविध विकारांच्या परिणामी उद्भवणारे चक्‍कर हे एक लक्षण आहे. आधुनिक वैद्यक शास्त्रात चक्‍कर या विकाराची विविध कारणे सखोलपणे सांगितली आहेत. 

माणसांच्या शरीराचा तोल सांभाळण्यामध्ये कानातील अंतःकर्ण या भागाचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे अंतःकर्ण विकृती करणार्‍या कारणामुळे चक्‍कर येते. काही रासायनिक औषधांच्या दुष्परिणामामुळे चक्‍कर येते. अति प्रमाणात मद्यपान, वारंवार तंबाखू यामुळे चक्‍कर येते. कोणत्याही कारणाने डोळ्याला आघात झाल्यास चक्‍कर उद्भवते. वारंवार कान फुटणे, कानातून स्राव होणे, कान वाहणे यामुळे देखील चक्‍कर येते. अति प्रमाणात पित्त वाहून मळमळ, उलटी याबरोबरच नंतर चक्‍कर असा त्रास होऊ शकतो. कानातून घशात उघडणार्‍या नलिकेला सूज इ.मुळे अवरोध निर्माण झाल्यास चक्‍कर येते. काही वेळा कानातील मळांचा, गाठीबा दाब कानातील पडद्यावर येऊन चक्‍कर येते. 

डोळ्यातील चष्म्याचा नंंबर आल्यामुळे, चुकीच्या नंबरचा चष्मा घातल्याने चक्‍कर येते. वाहनाचा प्रवास त्यावेळी होणारा डोळ्याचा त्रास, वार्‍याचा त्रास यामुळे काहींना मळमळ, उलटी होऊन चक्‍कर येते. मेंदूला पुरेसा रक्‍तपुरवठा न होणे, लहान मेंदूच्या रक्‍तवाहिन्यातील अडथळा, मेंदूतील गाठ, मेंदूला आघात तसेच फिट येण्याच्या विकारामुळे चक्‍कर येऊ शकते. अचानक रक्‍तातील साखर कमी झाल्यामुळे म्हणजेच अति जुलाब, कडक उपास, मधुमेहाची औषधे जास्त होणे इ.मुळे रक्‍तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे म्हणजेच अ‍ॅनिमियामुळे चक्‍कर येते. काही विशिष्ट विषाणूंची संसर्गदेखील चक्‍कर येऊ शकते, अति चिंता, भीती, ताणतणाव, टेन्शन यामुळेदेखील चक्‍कर येते. मानेच्या सर्व्हायकल स्पाँडिलायटिस या विकाराच्या परिणामी देखील चक्‍कर येते. 

आयुर्वेदिक उपचार ः 

आयुर्वेदिक विचाराप्रमाणे शरीराच्या वात आणि पित्त यामध्ये बिघाड झाल्यामुळे तसेच मनाच्या रजोगुण वाढल्यामुळे चक्‍कर हे लक्षण उत्पन्‍न होते. अनेकदा चक्‍करचा त्रास असणारे विविध तपासण्या करून देखील आणि विविध रासायनिक औषधे घेऊन देखील चक्‍कर पूर्णपणे बंद होत नाही, असे रुग्ण आढळतात. अशावेळी या रुग्णात आयुर्वेदातील उपचारांनी खूपच चांगला लाभ होतो असे आढळते. 

आयुर्वेदिक उपचार सुरू करताना चक्‍कर या लक्षणाचा पूर्ण इतिहास, जोडीला असणारा इतर त्रास याची माहिती घेऊन अष्टविध परीक्षांनी रुग्ण तपासणी करून चक्‍करचे निश्‍चित कारण शोधले जाते. चक्‍कर ही दुसर्‍या एखाद्या विकारामुळे होत असल्याचे आढळल्यास या विकाराचे उपचार आणि जोडीला चक्‍कर कमी करणारे उपचार केले जातात. आयुर्वेदाप्रमाणे उपचार करताना विविध औषधांनी सिद्ध केलेले तेल डोक्याला, मानेला काही वेळा सर्वांगाला मसाज करणे हा मुख्य उपचार असतो. चक्‍करचे प्रमाण अती असल्यास पंचकर्मातील शिरोधारा, शिरोबस्ती, विरेचन, बस्ती या उपचारांची मदत घेतली जाते. विविध औषधी सिद्ध तेल नाकात सोडणे म्हणजेच नस्यकर्म या उपक्रमाचा देखील उत्तम लाभ होतो. घरच्या घरी करता येणारा हा एक उपाय आहे. रुग्ण प्रकृतीप्रमाणे अणू तेल, बला तेल, पंचेंद्रिय वर्धन तेल यांचा उपयोग केला जातो. 

शतावरी, अश्‍वगंधा, बला, दशमुळ, त्रिफळा, कवचबीज, गुग्गुळ, ब्राह्मी, शंखपुष्पी, जटांमासी, चंदन वाळा या वनौषधी आणि अभ्रक भस्म, माक्षिक भस्म, रौप्य भस्म, गोदंती भस्म, शृंग भस्म, सुवर्ण भस्म या भस्म औषधींच्या एकत्रिकीकरणातून तयार झालेली वात आणि पित्त शमन करणारी आणि मज्जातंतूंचे बल वाढविणारी औषधे रुग्णाचे वय, प्रकृती, व्यवसाय, आहार, सवयी, ताण तणाव यांचा सखोल सर्वांगीण विचार करून द्यावी लागतात. काही रुग्णात इतर विकारासाठी आधुनिक औषधे सुरू असताना त्याच्या जोडीला देखील चक्‍कर या लक्षणासाठी हेही उपचार देता येतात. याचबरोबर आहाराची सर्वांगीण माहिती घेऊन वात व पित्त प्रकोप टाळण्यासाठी आवश्यक अशा पथ्याचे मार्गदर्शनही केले जाते. 

थोडक्यात महत्त्वाचे ः

चक्‍कर हे लक्षण वारंवार उत्पन्‍न  झाल्यास घाबरून न जाता शास्त्रीय आयुवेरद उपचार करणार्‍या तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक उपचार घ्यावेत आणि भीतीदायक चक्‍करपासून मुक्‍ती मिळवावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news