

डॉ. अमित मंडोत
बदलत्या जीवनशैलीबरोबरच सध्या नॉनअल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचे प्रमाण वाढत आहे. वेळीच उपचार न केल्यास ते लिव्हर सिरोसिस आणि अगदी लिव्हर कॅन्सरमध्येदेखील परावर्तित होऊ शकते. फॅटी लिव्हरसारख्या समस्येवर कोणताही विलंब न करता त्यामागची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेतल्यास एखाद्याचा अमूल्य जीव वाचविता येतो.
आजकाल सर्वात सामान्य यकृताच्या आजारांपैकी एक म्हणजे फॅटी लिव्हर. दारू न पिणार्या लोकांमध्येही ही समस्या सामान्यतः आढळून येते. सुरुवातीला चटकन समजून न येणार्या फॅटी लिव्हरमुळे कालांतराने गंभीर गुंतागुंत होऊ शकते, ज्यामध्ये लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरचा समावेश आहे.
फॅटी लिव्हर डिसीज तेव्हा होतो जेव्हा यकृतात जास्त चरबी जमा होते. फॅटी लिव्हरचे अल्कोहोलिक आणि नॉनअल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज असे दोन प्रकार आहेत. म्हणून आजकाल चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे नॉनअल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज अधिक सामान्यपणे आढळून येतात. त्याच्या कारणांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, बैठी जीवनशैली, तेलकट आणि शर्करायुक्त पदार्थांचे सेवन आणि काही ठरावीक औषधांचे सेवन असते. त्याची लक्षणे म्हणजे, थकवा किंवा उजव्या बाजूस ओटीपोटात वरच्या भागात होणार्या सौम्य वेदना किंवा जडपणा, भूक न लागणे आणि वजन कमी होणे. या आजाराच्या गुंतागुंतींमध्ये यकृताचा दाह (स्टीटोहेपेटायटीस), फायब्रोसिस (चट्टे), सिरोसिस (यकृताचे नुकसान) आणि शेवटी यकृत निकामी होणे किंवा यकृताच्या कर्करोगाचा समावेश आहे.
यकृताचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा यकृतामध्ये असामान्य पेशी या अनियंत्रितपणे वाढतात. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे हेपेटोसेल्युलर कार्सिनोमा. तो यकृतातून सुरू होतो किंवा शरीराच्या इतर भागांमधून पसरू शकतो. कारणांमध्ये क्रॉनिक हेपेटायटीस बी किंवा सी संसर्ग, सिरोसिस, उपचार न केलेले फॅटी लिव्हर डिसीज, अल्कोहोलचा अतिवापर, दीर्घकालीन यकृताचे नुकसान आणि अफलाटॉक्सिनसारख्या विषारी पदार्थांचा संपर्क यांचा समावेश आहे. पोटाच्या उजव्या बाजूस वरच्या भागात वेदना, वजन कमी होणे, पोटात सूज येणे, त्वचा आणि डोळे पिवळे पडणे (कावीळ), भूक न लागणे आणि थोडे जेवण केल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार न केल्यास, यकृताचा कर्करोग इतर अवयवांमध्ये पसरू शकतो, अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो किंवा यकृत निकामी होऊ शकते. नंतरच्या टप्प्यात उपचार करणे अधिक कठीण होते. म्हणून यकृताच्या आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आणि वेळीच निदान आणि उपचार करणे गरजेचे आहे.
नॉनअल्कोहोलिक फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष केल्यास तो लिव्हर सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगात विकसित होऊ शकतो. फॅटी लिव्हर यकृतामध्ये दीर्घकालीन दाह निर्माण करतो, ज्यामुळे कालांतराने जखमा (फायब्रोसिस) आणि सिरोसिस होतात. या सततच्या यकृताच्या होणार्या नुकसानीमुळे असामान्य पेशींच्या वाढीचा धोका वाढतो, ज्यामुळे यकृताचा कर्करोग होतो. यकृताला जितक्या जास्त काळ सूज असते आणि यकृताचे कार्य बिघडते तेव्हा यकृताच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो.
वजन नियंत्रित राखण्याची खात्री करा, ताजी फळे, भाज्या आणि तृणधान्यांनी भरलेला संतुलित आहार घ्या. जंक फूड, तेलकट, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा. धूम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन सोडा, मधुमेह, लठ्ठपणा किंवा यकृताच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास असल्यास वेळोवेळी यकृत तपासणी करा.