Brain Hemorrhage | सामना ब्रेन हॅमरेजचा

मेंदूतील रक्तस्राव हा ‘स्ट्रोक’चे एक रूप
facing the challenge of brain hemorrhage
सामना ब्रेन हॅमरेजचाPudhari File Photo
Published on
Updated on

डॉ. नितीन दर्डा

मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात जटिल आणि संवेदनशील अवयव असून त्याचे कार्य अखंड चालू ठेवण्यासाठी सातत्याने आणि समतोल रक्तपुरवठा आवश्यक असतो. मात्र, मेंदूतील रक्तवाहिन्यांपैकी एखादी अचानक फुटली किंवा त्यातून रक्तस्राव होऊ लागला, तर त्याला ’मेंदूतील रक्तस्राव’ म्हणजेच ब्रेन हॅमरेज असे म्हणतात.

ब्रेन हॅमरेज ही स्थिती आरोग्याच्या द़ृष्टीने अत्यंत धोकादायक असते. कारण, रक्तस्राव झाल्यामुळे मेंदूच्या पेशींवर दाब निर्माण होतो. त्या पेशींना पुरेशा प्रमाणात प्राणवायू मिळत नाही आणि त्यामुळे त्या मृत होण्याचा धोका वाढतो. या अवस्थेमुळे रुग्णाच्या शरीरातील अनेक कार्ये तत्काळ बंद पडू शकतात आणि काही वेळा मृत्यूदेखील होऊ शकतो.

मेंदूतील रक्तस्राव हा ‘स्ट्रोक’चे एक रूप आहे. विशेषतः ही अवस्था हेमोरेजिक स्ट्रोक म्हणून ओळखली जाते. काही रुग्णांमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये गाठी किंवा कमकुवतपणा असतो. अशा वेळी पडण्यामुळे, अपघातामुळे किंवा मार लागल्यामुळे त्या कोणत्याही क्षणी फुटण्याची आणि अचानक रक्तस्राव होण्याची शक्यता असते. गंभीर स्वरूपाच्या रक्तस्रावात शस्त्रक्रियेची गरज भासते.

काही वेळा शस्त्रक्रियेनंतरही मेंदूत रक्ताची गुठळी पुन्हा तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हाता-पायांची हालचाल करण्यात अडथळा निर्माण होणे, हातांना संवेदना न जाणवणे, हातांनी काही उचलता न येणे अशी लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी पुन्हा शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय उरत नाही. मुळात, जेव्हा एखाद्या आजारावर, व्याधीवर औषधोपचार उपलब्ध नसतील तेव्हा शस्त्रक्रियेचा मार्ग निवडला जातो; पण पर्याय उपलब्ध असताना त्याचा अवलंब का करू नये? वास्तविक पाहता, अशा रुग्णांसाठी होमिओपॅथी उपचारपद्धती प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे.

मध्यंतरी एका साठ वर्षीय गृहस्थांना एकदा मेंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही पुन्हा हातांमध्ये संवेदना (सेन्सेशन्स) न जाणवणे, वस्तू उचलता न येणे अशी लक्षणे दिसू लागली होती. त्यांना न्युरोसर्जननी पुन्हा ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता; परंतु त्यांनी शस्त्रक्रियेस तीन महिन्यांचा कालावधी असल्याने यादरम्यान होमिओपॅथी उपचार घेण्याचे ठरवले.

होमिओपॅथी ही एक पर्यायी आणि सखोल सैद्धांतिक पाया असलेली प्रणाली म्हणून ओळखली जाते. होमिओपॅथी एका विशिष्ट तत्त्वावर आधारित आहे. होमिओपॅथी ही केवळ लक्षणांवर उपचार करणारी पद्धत नाही, तर ती माणसाच्या संपूर्ण प्रकृतीचा अभ्यास करते आणि शरीरातील नैसर्गिक संतुलन पुनःस्थापित करण्यास मदत करते. प्रत्येक माणसामध्ये एक जीवनशक्ती किंवा व्हायटल फोर्स असतो. ही जीवनशक्ती त्याच्या आरोग्याची राखण करते. जेव्हा ही शक्ती असंतुलित होते, तेव्हा रोग होतो. होमिओपॅथिक औषधे या जीवनशक्तीला बळ देतात, त्याचे संतुलन पुन्हा प्रस्थापित करतात आणि नैसर्गिकरीत्या शरीरास आजारांशी लढण्यास सक्षम करतात. रोगाच्या किंवा व्याधीच्या मुळाशी जाऊन दिलेल्या उपचारांमुळे शरीरात त्या आजारांविरुद्ध नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित होते. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानेही कोव्हिड काळात याची शिफारस केली होती.

रुग्णावर उपचार करताना होलिस्टिक म्हणजेच सर्वंकष विचार करून औषधे दिली जातात. यासाठी रुग्णाचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, सवयी, शरीराची ठेवण या सर्वांचा सूक्ष्म अभ्यास केला जातो. हा सर्व विचार करून मग औषधोपचार केले जातात. औषधोपचार सुरू झाल्यानंतर रुग्णाची झोपेची गुणवत्ता सुधारते, शांत झोप लागते, पचनक्रिया सुरळीत होऊन भूक वाढते. या सर्व गोष्टी रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे संकेत देणार्‍या असतात. शरीराच्या या प्रतिकारशक्तीचा उपयोग करून तिच्या साहाय्याने व्याधींशी सामना केला जातो आणि रुग्णांना आजारातून बरे केले जाते. रोगप्रतिकारशक्ती ही निसर्गतः लाभलेली असतेच; पण ती कमी पडत असल्यामुळे विविध प्रकारच्या व्याधी निर्माण होतात, संसर्ग होतात; पण ती अधिक सक्षम केल्यास आजारांविरुद्धची लढाई जिंकता येणे सहजशक्य होते. सदर रुग्णाबाबतही त्यांच्या एकूण जीवनशैलीचा, व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून केलेल्या उपचारांमुळे हातातील संवेदना पुन्हा निर्माण झाल्या, हालचाली पूर्ववत झाल्या. परिणामी, दुसर्‍यांदा करावी लागणारी शस्त्रक्रिया टळली.

‘न्यूरोलॉजी’ या अमेरिकन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीच्या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये जर्मनीतील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर हॅम्बुर्ग-एपेनडॉर्फ येथील न्यूरोसर्जन डॉ. ऑलिव्हर हीजे यांनी स्पष्टपणे नमूद केले की, होमिओपॅथीसारख्या पर्यायी उपचारांचा वापर बहुतांश वेळा दुर्लक्षित किंवा कमी लेखला जातो; पण वैद्यक व्यावसायिकांनी रुग्णांच्या पर्यायी उपचार घेण्याच्या इच्छेचा आदर केला पाहिजे. होमिओपॅथी ही सर्वंकष उपचारपद्धती असल्याने दुर्धर व्याधींमध्येही ती प्रभावी ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news