जखम झाल्यास… | पुढारी

Published on
Updated on

डॉ. महेश बरामदे

जखम छोटी असो वा मोठी त्याकडे दुर्लक्ष करू नये. काही वेळेला घरात काचेची भांडी फुटल्यामुळे तर अपघातामुळे त्वचेवर कापल्यासारख्या जखमा होतात. काचेपासून झालेल्या या जखमा भरून येण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. खोल जखमेसाठी डॉक्टरांचे उपाय आवश्यक आहेतच; पण इतर जखमांसाठी आपण घरगुती उपाय करून जखम बरी करू शकतो आणि संसर्गाचा धोका टाळू शकतो. 

आरसा, बरणी किंवा अन्य काचेची वस्तू फुटल्यामुळे काही वेळेला हाता-पायाला जखम होते. या जखमेमध्ये त्वचा कापली जाते किंवा फाटते. तर काच आत शिरल्यामुळे त्वचेवर व्रण पडल्यासारखे होते. बर्‍याचदा अपघाताच्या वेळीसुद्धा अशा जखमा होऊ शकतात. काही वेळेला या जखमा विशिष्ट परिस्थितीमध्ये धोकादायक ठरू शकतात. खासकरून वृद्धावस्थेत झालेली जखम, आजारी असताना, स्टिरॉईडचा डोस सुरू असताना, रेडिएशन किंवा केमोथेरपीचे उपचार सुरू असताना, मधुमेही रुग्ण असल्यास आणि अतिरिक्‍त धूम्रपानाची सवय असल्यास हा धोका वाढतो. अशा जखमांची लक्षणे म्हणजे रक्‍तस्त्राव, लालसरपणा, सूज, जळजळ, पू होणे, वेदना होणे किंवा ठणका बसणे. तसे पाहिले तर सर्व प्रकारच्या जखमांचीच संसर्ग होऊ नये, म्हणून विशिष्ट काळजी घेतली गेली पाहिजे. गंभीर, खोल किंवा संसर्ग झालेली जखम असेल तर मात्र डॉक्टरांकडून उपचार करून घेणेच आवश्यक असते. 

जखम छोटी असेल तर सर्वप्रथम जखम स्वच्छ करावी, कारण व्यवस्थितपणे जखम स्वच्छ करणे हे ती भरून येण्यास खूप उपयोगाचे असते. जखम स्वच्छ करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे, वाहत्या पाण्याखाली जखम स्वच्छ धुणे. मध्यम दाबाच्या थंड पाण्याच्या नळाखाली जखम झालेला भाग धरावा. सौम्य साबणाने जखम धुवावी आणि दहा ते पंधरा मिनिटे ती पाण्याखाली धरावी. गार पाणी फिल्टर केलेले नसेल तर गरम करून गार केलेले पाणी वापरावे. यामुळे जखमेवर लागलेली धूळ, जीवजंतू निघून जाण्यास मदत होईल. शिवाय थंड पाण्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. नंतर स्वच्छ टॉवेलने हळूवारपणे जखम कोरडी करावी. त्यानंतर निर्जंतूक ड्रेसिंग करून किंवा बँडेज लावून ती जखम झाकावी. 

खोबरेल तेल ः या तेलामध्ये जीवाणूनाशक, दाहविरोधी, त्वचा मुलायम करण्याचा आणि जखम भरून काढण्याचा अद्भूत गुणधर्म आहे. अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झालेले आहे. खोबर्‍याच्या तेलामुळे त्वचेवर जखमेचे राहणारे डागसुद्ध अस्पष्ट होतात. असे हे गुणकारी खोबर्‍याचे तेल जखम झालेल्या भागावर लावावे. त्यावर बँडेज बांधावे. पुन्हा तेल लावावे आणि दिवसातून दोन-तीनवेळा बँडेज बदलावे. हा उपचार काही दिवस सुरू ठेवावा. त्यामुळे त्वचेवर जखमेच्या खुणा राहणार नाहीत. 

कडूनिंब ः नीम म्हणजे अर्थातच कडूनिंब याचे औषधी गुणधर्म सर्वश्रूत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक फॅटी अ‍ॅसिड असतात. त्यामुळे कोलेजन तयार होेते आणि परिणामी त्वचेची लवचिकता कायम राहते. त्याचा उपयोग जखम भरून येण्यास होतो. तसेच हे अँटिसेप्टिक, दाहविरोधी असते. 

जखम भरून येण्यासाठी कडूनिंब वापरायचे असल्यास एक टेबलस्पून कडूनिंबाच्या पानांचा रस घ्यावा, अर्धा चमचा हळदपूड घ्यावी आणि त्याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट जखमेवर लावावी. काही तास तसेच ठेवावे आणि नंतर कोमट पाण्याने हा लेप धुवून टाकावा. पुन्हा हीच कृती करावी. अशाप्रकारे काही दिवस हा लेप जखमेला लावत राहावा. 

हळद ः हळद ही नैसर्गिक अँटिसेप्टिक आणि प्रतिजैवीक घटक आहे. त्यामुळे हळदसुद्धा काचेमुळे झालेल्या जखमेसाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी वापरता येते. रक्‍तस्त्राव होत असल्यास त्यावर थेट हळदीची पूड भरून थोडा वेळ तसेच धरून ठेवले तर रक्‍तस्त्राव ताबडतोब थांबतो. जखम लवकर भरून येण्यासाठी अर्धा चमचा हळदपूड घेऊन त्यामध्ये जवसाचे तेल टाकून पेस्ट बनवावी. दिवसातून दोन-तीन वेळा ही पेस्ट जखमेवर लावावी. त्यामुळे वेदना कमी होतात आणि संसर्गदेखील रोखला जातो. तसेच ग्लासभर गरम दुधामध्ये एक चमचा हळदपूड टाकून दिवसातून एकदा घ्यावे. रात्री झोपण्यापूर्वी काही दिवस हळदमिश्रीत दूध घेतल्यास जखम भरून येण्यास मोठी मदत होते. 

कोरफड ः हजारो वर्षांपासून कोरफड जखम भरून काढण्यासाठी वापरली जाते. कोरफडीमध्ये वेदनाशामक, दाहविरोधी आणि थंडावा देण्याचा गुणधर्म आढळून येतो. तसेच कोरफडीमध्ये फायटो केमिकल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वेदना, जळजळ कमी होते. त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो आणि त्यामुळे ती जखम भरून येण्यास मदत होते. तसेच शस्त्रक्रियेनंतरची जखम भरून येण्यासाठीसुद्धा कोरफडीचा उपयोग होतो. 

कोरफडीचे पान घेऊन ते कापून उघडावे. त्याच्यातला रस अथवा गर काढून तो जखमेवर लावावा. हा गर कोरडा होईपर्यंत तसाच ठेवावा. नंतर तो भाग कोमट पाण्याने स्वच्छ करावा. कोरड्या टॉवेलने हळूवारपणे जखम कोरडी करावी. दिवसांतून काहीवेळा ही कृती पुन्हा करत राहावी. जखम भरेपर्यंत नियमितपणे कोरफडीचा गर जखमेवर लावावा.

लसूण ः अनेक वर्षांपासून लसूण जखम भरून येण्यासाठी वापरला जातो. कारण त्यामध्ये अँटिबायोटिक आणि सूक्ष्मजीवविरोधक गुणधर्म आढळतात. लसूण रक्‍तस्त्राव थांबवू शकतो. तसेच यामुळे वेदना कमी होतात आणि जखम भरून येण्यास मदत होते.  

रक्‍तस्त्राव होत असल्यास जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. नंतर त्यावर बारीक केलेल्या लसणाच्या पाकळ्या लावाव्यात वेदना आणि रक्‍तस्त्राव ताबडतोब थांबेल. जखम भरून येण्यासाठी लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करून निर्जंतूक कापसाच्या बोळ्यावर ती पसरवावी. हा बोळा जखमेवर ठेवून स्वच्छ बँडेजने तो बांधून टाकावा. वीस मिनिटे तसेच ठेवून कोमट पाण्याने जखमेचा भाग धुवून टाकावा. जखम पूर्णपणे भरेपर्यंत दिवसातून दोनदा ही कृती करावी. 

बटाटा ः बटाटासुद्धा काचेपासून झालेली जखम भरून येण्यास उपयोगाचा ठरतो. एक ते दोन कच्चे बटाटे किसावे आणि हा किस स्वच्छ कापडावर पसरावा. हे कापड जखम झालेल्या भागावर लावावे. दोन-तीन तास तसेच ठेवावे आणि नंतर काढावे. नंतर तो भाग कोमट पाण्याने धुवून टाका. ही कृती जखम भरेपर्यंत करावी. 

केळी ः केळीची पानेसुद्धा नैसर्गिक जीवाणूरोधक आणि दाहविरोधी गुणधर्म असलेली आहेत. काचेमुळे झालेली जखम भरून येण्यास याची मदत होते. तसेच वेदना आणि दाहसुद्धा यामुळे कमी होतो. केळीची काही पाने बारीक करून पेस्ट करावी. ही पेस्ट जखमेवर लावावी. काही तास ती तशीच ठेवून कोरडी होऊ द्यावी, नंतर ती कोमट पाण्याने धुवून टाकावी. जखम बरी होत नाही तोपर्यंत ही कृती करत राहावी. 

हेही लक्षात ठेवा ः बाह्य उपचारांबरोबरच जखम भरून येण्यासाठी योग्य आहारसुद्धा गरजेचा असतो. म्हणूनच पोषक आहार घेणे हेसुद्धा गरजेचे असते. काही जीवनसत्त्वे आणि क्षार असे आहेत ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या जखमा भरून आणण्याचा गुणधर्म असतो. म्हणूनच असे पदार्थ आहारात समाविष्ट करावेत. 'अ' जीवनसत्त्व प्रचूर प्रमाणात असणारे गाजर, लाल भोपळा, टोमॅटो, खरबूज, जर्दाळू नियमितपणे खावेत. यामुळे पेशींची वाढ चांगल्याप्रकारे होण्यास मदत होते. तसेच 'क' जीवनसत्त्व युक्‍त पदार्थ म्हणजे, ब्रोकोली, द्राक्षे, किवी, संत्र, मिरची यांचा आहारात समावेश करावा. यामुळे शरीरात कोलेजन तयार होण्यास आणि नव्या उती तयार होण्यास मदत होते. 

गहू, बदाम, पालक यामध्ये 'ई' जीवनसत्त्व असते. त्यांचा आहारात समावेश करावा. तसेच झिंक असणारे अन्‍नपदार्थ म्हणजे मोड आलेली कडधान्ये, बिया, शेंगा यांचाही आहारात समावेश करावा. यामुळे जखम भरून येण्यास मदत होते. तसेच बी-कॉम्प्लॅक्स जीवनसत्त्व असणारे अन्‍नपदार्थही नियमित खावेत. यामध्ये चीज, पालक, मासे, वाटाणा, चवळी यासारख्या शेंगा इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. यामुळे जखम लवकर भरून येते आणि त्वचाही उत्तम राहते. 

काही इतर टिप्स ः जखम झाल्यानंतर तो भाग सूजला असल्यास त्यावर बर्फ ठेवावा. त्यामुळे सूज व वेदना कमी होतात. तसेच जखम झालेल्या भागाला लव्हेंडर ऑईल लावावे. यामुळे जखम भरून येण्यास मदत होते. चहाच्या झाडापासून बनवलेले तेलसुद्धा ऑलिव्ह तेलासोबत मिक्स करून दिवसांतून दोन ते पाचवेळा लावता येते. धूम्रपान, मद्यपान करणे टाळल्यास जखम भरून येण्यास मदत होते. पोषक आहार आणि पुरेशा प्रमाणात पाणी घेणेदेखील उपयोगाचे ठरते. ठराविक अंतराने दिवसातून काही वेळ जखम हवेत उघडी करावी आणि स्वच्छ करत राहावी. ताणतणावापासून दूर राहावे. शक्य असल्यास हलका व्यायाम करावा. 

ः जखम झाल्यानंतर तो भाग सूजला असल्यास त्यावर बर्फ ठेवावा. त्यामुळे सूज व वेदना कमी होतात. तसेच जखम झालेल्या भागाला लव्हेंडर ऑईल लावावे. यामुळे जखम भरून येण्यास मदत होते. चहाच्या झाडापासून बनवलेले तेलसुद्धा ऑलिव्ह तेलासोबत मिक्स करून दिवसांतून दोन ते पाचवेळा लावता येते. धूम्रपान, मद्यपान करणे टाळल्यास जखम भरून येण्यास मदत होते. पोषक आहार आणि पुरेशा प्रमाणात पाणी घेणेदेखील उपयोगाचे ठरते. ठराविक अंतराने दिवसातून काही वेळ जखम हवेत उघडी करावी आणि स्वच्छ करत राहावी. ताणतणावापासून दूर राहावे. शक्य असल्यास हलका व्यायाम करावा. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news