

डॉ. प्राजक्ता पाटील
एंडोमेट्रिओसिस हा स्त्रियांच्या गर्भाशयात आढळणार्या एंडोमेट्रियम नावाच्या ऊतींशी संबंधित विकार आहे. ही ऊती सामान्यतः गर्भाशयाच्या आतील बाजूस वाढते; पण या विकारात ती गर्भाशयाबाहेर वाढू लागते. त्यामुळे पोटात वेदना, लैंगिक संबंधांदरम्यान त्रास, वंध्यत्व, मासिक पाळीत तीव्र वेदना अशा अनेक समस्या निर्माण होतात.
मासिक पाळीच्या दरम्यान गर्भाशयातील अस्तर आणि रक्त योनीमार्गाने बाहेर टाकले जाते. पण, काही वेळा हे रक्त पेल्व्हिसमध्ये पोहोचते आणि तिथे ही ऊती वाढू लागते. अॅस्ट्रोजेन हार्मोनच्या प्रभावाने ही ऊती प्रत्येक महिन्याला सूजते, रक्तस्राव करते आणि पुन्हा वाढते. ही ऊती गर्भाशयाच्या बाहेर वाढल्याने ती ज्या अवयवांवर वाढते तिथे सूज, जळजळ आणि चिकट चामट्याच्या स्वरूपात ‘अॅड्हीझन्स’ तयार होतात. यामुळे गर्भाशय, अंडाशय, मूत्राशय, आंत्र किंवा इतर पेल्व्हिक अवयव एकमेकांवर चिकटून तीव्र वेदना निर्माण होतात.
एंडोमेट्रिओसिसचा परिणाम प्रजनन क्षमतेवर, मासिक पाळीवर आणि लैंगिक आरोग्यावर होतो. काही स्त्रियांच्या अंडाशयावर रक्ताने भरलेली सिस्ट म्हणजेच ‘एंडोमेट्रिओमा’ तयार होते. या सिस्टमुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. या व्याधीची मिनिमल, माइल्ड, मॉडरेट आणि सीव्हिअर अशा चार टप्प्यांमध्ये वर्गवारी केली जाते. पण, त्रासाचा आणि टप्प्यांचा परस्पर संबंध नसतो. काही स्त्रियांना सौम्य टप्प्यातही फार वेदना होतात, तर काहींना गंभीर अवस्थेतही त्रास कमी जाणवतो. या आजाराची कारणे अजून स्पष्ट नाहीत; पण काही सामायिक गोष्टी अभ्यासातून दिसून आल्या आहेत. ज्या मुलींना वयाच्या 11-12 व्या वर्षीच मासिक पाळी सुरू होते, ज्या स्त्रियांना जास्त प्रमाणात किंवा जास्त दिवस पाळी येते, त्यांच्यात एंडोमेट्रिओसिसचा धोका अधिक असतो. आई किंवा बहिणीला हा विकार असल्यासही हा धोका तीन ते नऊ पट वाढतो.
या विकाराचे निदान एकाच चाचणीने होत नाही. डॉक्टर वैद्यकीय इतिहास, पोटदुखीचा कालावधी, लैंगिक संबंधांमधील त्रास इत्यादी विचारतात. सोनोग्राफी किंवा एमआरआयसारख्या प्रतिमा चाचण्या वापरूनही ही ऊती शोधता येते. मात्र अंतिम निदान करण्यासाठी ‘लॅपरोस्कोपी’ शस्त्रक्रिया आवश्यक असते, ज्यात कॅमेर्याच्या सहाय्याने पेल्व्हिसमध्ये एंडोमेट्रिओसिसची ठिकाणे पाहिली जातात.
या आजाराचे औषधोपचार प्रामुख्याने हार्मोन थेरपीवर आधारित असतात. मासिक पाळी थांबवणारी औषधे, गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शन्स, औषधे वापरली जातात. यामुळे एस्ट्रोजेनचे प्रमाण घटते आणि ऊतींची वाढ थांबते. यामुळे 80% महिलांमध्ये वेदना कमी होतात.
औषधोपचार उपयोगी पडत नाहीत किंवा इतर आरोग्य कारणांमुळे औषधे घेणे शक्य नाही, त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया हा पर्याय असतो. शस्त्रक्रियेनंतर 80% स्त्रियांना आराम मिळतो; पण 2 वर्षांत पुन्हा 40 ते 80 टक्के महिलांमध्ये पुन्हा वेदना सुरू होतात. त्यामुळे दीर्घकालीन उपचार योजना गरजेची असते.
एंडोमेट्रिओसिस हा आजार शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि सामाजिक आयुष्यावरही परिणाम करतो. त्यामुळे वेळीच लक्ष देणे, निदान करणे आणि समर्पक उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.