Health and Winter : हिवाळ्यात उतारवयातील वृद्धाचे 'असे' जपा आरोग्य

Health and Winter : उतारवयातील आरोग्य आणि हिवाळा
pudhari arogya news
उतारवयातील आरोग्य आणि हिवाळाpudhari photo
Published on
Updated on
डॉ. मनोज कुंभार

दसऱ्याचे दिवस सरले की, दिवाळीची चाहूल लागते. दिवाळीसोबतीने येतो तो हिवाळा, हा ऋतू आरोग्य संवर्धनासाठी पोषक असला, तरी हिवाळ्यात वृद्ध व्यक्तींना काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

हिवाळ्यामध्ये जिवाणू आणि विषाणू अधिक सक्रिय होत असतात. वृद्ध व्यक्तींची इम्युन सिस्टीम अर्थात प्रतिकार संस्था कमकुवत झालेली असते. म्हणूनच हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या त्यांना त्रस्त करत असतात. या समस्यांना वैद्यकीय भाषेत सिझनल इफेक्टीव्ह डिसॉर्डर असे म्हटले जाते. या व्यतिरिक्त ज्या वृद्धांना अथ्रायटिस, अस्थमा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या समस्या असतात त्यांच्या समस्या या ऋतूमध्ये वाढतात, म्हणूनच हिवाळ्यामध्ये वृद्धांना आरोग्यासंबंधी कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यावरचे उपाय काय, याबाबत थोडक्यात जाणून घेऊया!

हायपोथर्मिया

हिवाळ्यामध्ये वृद्धांच्या शरीराचे तापमान बाहेरच्या थंडीमुळे कमी होते. थंडीच्या बाबतीत त्यांचे शरीर अतिशय संवेदनशील बनते. यामुळे त्यांच्या स्नायूंमध्ये आणि हाडांत अख्खडलेपण येते. या समस्येपासून बचाव करण्यासाठी वृद्धांनी पुरेशा प्रमाणात उबदार कपडे घातले पाहिजेत. ऑस्टिओपोरोसिस या आजाराच्या रुग्णांनी या कालावधीत सजग राहावे. वाढत्या वयात खरे तर बऱ्याच जणांना ऑस्टिओपोरोसिस हा आजार होतो; परंतु मेनोपॉजनंतर प्रोजेस्ट्रेरॉन हार्मोन्सच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते आणि याचा त्यांना अधिक त्रास होऊ शकतो. थंडीमुळे स्नायूमध्ये कडकपणा किंवा आखडलेपण येते आणि त्यामुळे वृद्धांच्या हातापायातील वेदना अथवा दुखणे वाढते.

या समस्येपासून बचाव करण्यासाठी सकाळ, संध्याकाळ हातात व पायात मोजे घालावेत. अंघोळीसाठी नेहमी गरम पाण्याचा वापर करावा. रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या कोमट पाण्यात पाय बुडवून बसल्यास वेदनेपासून आराम मिळतो. रोज थोडावेळ कोवळ्या उन्हात जरुर बसावे. सूर्यकिरणांपासून मिळणारे ड जीवनसत्त्व वृद्धांच्या हाडांसाठी खूप फायदेशीर ठरते. आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थांना प्रामुख्याने समाविष्ट करावे. वेदना जास्त असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक औषधांचेसुद्धा सेवन करता येऊ शकते,

अस्थमा

अस्थमाचा त्रासदेखील या दिवसात वाढतो. हिवाळ्यामध्ये वातावरणात अॅलर्जी पसरविणारे घटक असतात. या घटकांमुळे वृद्धांच्या श्वासनलिका अतिसंवेदनशील बनून आकुंचन पावतात. म्हणून या ऋतूत वृद्धांना अस्थमा म्हणजेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. या ऋतूतील कोरड्या वातावरणामुळे वृद्ध व्यक्तींना श्वास घ्यायला खूप त्रास होतो. हिवाळ्यामध्ये सकाळच्यावेळी वातावरणात धूलिकण आणि गाड्यांच्या धुराचे गडद आवरण असते. त्याला स्मॉग असे म्हणतात. हा स्मॉग अस्थांच्या रुग्णांसाठी खूप नुकसानकारक असतो. म्हणूनच वृद्धांनी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर जाण्याऐवजी घरातच व्यायाम करावा. रात्री झोपताना खोलीतील सर्व खिडक्या बंद करू नयेत.

आपल्या खोलीत अधिककाळ हिटर किंवा ब्लोअर सुरू ठेवू नये. यामुळे खोलीतील नैसर्गिक ऑक्सिजन नष्ट होतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. रात्रीच्यावेळी अचानक जोरात खोकला आल्यानंतर झोपमोड झाली, तर थोडा वेळ खुल्या खिडकीसमोर उभे राहावे. तसेच नेब्युलायजर आणि पफ नेहमी सोबत ठेवावे. म्हणजे गरज वाटल्यास ताबडतोब वापर करता येऊ शकतो. जवळच्या व्यक्ती आणि फॅमिली डॉक्टरांचा नंबर नेहमी जवळ ठेवावा, म्हणजे गरज पडल्यास वेळीच त्यांची मदत घेता येऊ शकेल.

उच्च रक्तदाब आणि थंडी

या ऋतूचा आणि उच्च रक्तदाबाचा जवळचा संबंध आहे. बहुतेक वृद्धांना उच्च रक्तदाबाची समस्या असते. शास्त्रज्ञांद्वारे केल्या गेलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे की, हिवाळ्यात ३३ टक्के लोकांचा रक्तदाब वाढतो. या ऋतृत अंतस्त्रावी ग्रंथीतून विशिष्ट हार्मोन्स स्रवतात जे रक्तदाब वाढविण्यासाठी जबाबदार असतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात मिठाचे प्रमाण कमीतकमी ठेवावे. मद्य, सिगारेट, मांसाहार आणि तळलेल्या वस्तूंपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, सात्विक आहार आणि व्यायामाच्या माध्यमाद्वारे वजन संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करावा. यावरची औषधे वेळेवर व नियमित घ्यावीत, तणावमुक्त राहावे, ध्यानधारणा, योगासने करावीत.

हृदयरोग

हिवाळ्यामध्ये हृदयाचा झटका येण्याचा धोका सर्वात जास्त असतो, असे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे. हिवाळ्यात थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. घामुळे त्यांची सक्रियता कमी होते आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. या व्यतिरिक्त थंडीपासून बचाव करण्याच्या प्रक्रियेमुळे या ऋतूत शरीरातील चयापचय वाढते. यामुळे हृदयावर जास्त दाब पडतो आणि म्हणूनच हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाटते. वृद्धांमध्ये हृदयविकाराची समस्या जास्त असते. म्हणूनच त्यांना या ऋतूमध्ये विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.

हिवाळ्यामध्ये दहा ते पंधरा दिवस असे असतातच ज्यावेळी तापमान खूप कमी असते. अशा काळात वयस्कर हृदयरोगी व्यक्तींनी घराच्या बाहेर पडू नये. रोज किमान अर्धा तास उन्हात जरुर बसावे, उन्हाची किरणे मिळाल्यामुळे ड जीवनसत्त्व मिळते आणि ते शरीराला हृदयविकाराचा झटका येण्यापासून वाचविते. या आल्हाददायक ऋतूमध्ये अनेकदा खूप जास्त खाणे होते. ते हृदयरोगीसाठी नुकसानकारक ठरते. या समस्येपासून बचाव करण्यासाठी साधा आणि संतुलित आहार ठेवा.

सायको-जेरीएट्रिक डिसॉर्डर

वाढत्या वयासोबत वृद्धांना ज्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो त्यांना सायको-जेरीएट्रिक डिसॉर्डर असे म्हणतात. हिवाळ्यामध्ये अशा समस्या वाढतात. शास्त्रीय संशोधनानुसार सिद्ध झाले आहे की, हिवाळ्यात वृद्धांच्या शारीरिक हालचाली खूप मर्यादित होतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांचा बहुतांश काळ घरातच व्यतीत होतो. अशावेळी एकटेपणा आणि कंटाळ्यामुळे डिप्रेशन आणि मानसिक ताण यासारख्या समस्यांचा त्रास होतो.

अशा समस्यांपासून बचाव करण्यासाठी फोन आणि इंटरनेटच्या माध्यमाद्वारे आपल्या जवळच्या लोकांशी बोलावे. ऊन असेल तर त्यावेळी घराच्या बाहेर पडून फिरून यावे. आरोग्य चांगले असेल, तर थोडे बागकाम करावे. व्हिडिओ गेम्स् खेळाव्यात, आजूबाजूच्या मुलांना शिकवावे. आपल्या घरगुती कामात कुटुंबातील व्यक्तींना मदत करावी, यामुळे एकटेपण जाणवणार नाही आणि मानसिकदृष्ट्या प्रसन्न राहणे शक्य होईल.

pudhari arogya news
हिवाळा आणि ज्येष्ठांचे आरोग्य

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news