

डॉ. मनोज कुंभार
पोट किंवा आतड्यांमध्ये तयार होणारी हवा म्हणजेच गॅसेसची समस्या ही अनेक समस्यांना जन्म देणारी ठरते. केवळ पोटच नव्हे तर शरीराच्या इतर भागांमध्येही यामुळे वेदना होऊ शकतात.
पोट किंवा आतड्यांमध्ये तयार होणारी हवा जास्त प्रमाणात साचते, तेव्हा पोटात ताण आणि दाब निर्माण होतो. हा दाब पोटाभोवतालच्या स्नायूंवर व नसांवर परिणाम करतो आणि त्यामुळे होणारा त्रास फक्त पोटापुरता मर्यादित न राहता कधी कधी पाठीपर्यंत, खांद्यापर्यंत, छातीत किंवा मांड्यांपर्यंत जाणवू शकतो.
गॅसेसची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे कारण त्याद्वारे आपण सामान्य पोटदुखी आणि गॅसमुळे होणारी वेदना यात फरक करू शकतो. गॅसचा दाब नसांवर पडल्यास वेदना बहुधा टोचल्यासारखी किंवा झटका बसल्यासारखी जाणवते. तसेच अनेक वेळा छातीत जळजळ होणे, छातीमध्ये वेदना जाणवणे ही लक्षणे गॅसची असू शकतात. पोटात तयार झालेला दाब पाठीमागील नसांवर परिणाम करून कंबरदुखी किंवा पाठीच्या खालच्या भागात ओढल्यासारखा त्रास निर्माण करू शकतो.
पोटात गॅसेस होण्यामागे कारणे काय?
गॅसेस होण्यामागे काही ठराविक कारणे असतात. जड, तेलकट व तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे गॅस जास्त प्रमाणात तयार होतो. त्याचप्रमाणे जेवणानंतर लगेच झोपणे किंवा आडवे होणे यामुळे पोटात हवा साचून जाते आणि पचनक्रिया मंदावते. मानसिक ताणतणाव आणि चिंता हेही गॅस वाढवण्यामागील लपलेले घटक आहेत कारण स्ट्रेसमुळे पचनसंस्था नीट कार्य करत नाही.
उपाय काय आहेत?
यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही सोपे उपाय करता येतात. आहार हलका आणि संतुलित ठेवणे हा पहिला नियम आहे. तळलेले, मसालेदार आणि जड पदार्थ टाळणे योग्य ठरते. आहारात फळे, भाज्या आणि भरपूर प्रमाणात तंतुमय अन्नपदार्थांचा समावेश करावा. नियमित चालणे, हलका व्यायाम व योगासन केल्यास पचनक्रिया सुधारते आणि गॅस तयार होण्याचे प्रमाण कमी होते. दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्यानेही गॅस कमी होण्यास मदत मिळते.
गॅसची समस्या वारंवार त्रास होत असल्यास काय करावे?
तथापि, जर गॅसची समस्या वारंवार होत असेल, छातीत सतत वेदना होत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा वेदना असह्य वाटत असेल, तर तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. गॅस ही किरकोळ समस्या असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास ती गंभीर त्रासाचे रूप धारण करू शकते. त्यामुळे जीवनशैलीत बदल, योग्य आहार आणि नियमित व्यायाम यांच्या मदतीने गॅसवर नियंत्रण ठेवणे आणि शरीर निरोगी ठेवणे शक्य आहे.