

डॉ. संतोष काळे
इक्टॉपिक बीट म्हणजे आपल्या नियमित हृदय ठोक्याच्या आधी किंवा मध्ये येणारा एक अनपेक्षित ठोका. काही जण याला हृदय थांबल्यासारखे वाटणे किंवा हृदयातील झटका असे वर्णन करतात. वैद्यकीय भाषेत याला एक्स्ट्रा सिस्टोल किंवा प्रिमॅच्युअर काँट्रॅक्शन असेही म्हणतात.
खांद्यावर अचानक थरथर जाणवणे, छातीत एखादा झटका आल्यासारखे जाणवणे किंवा धपकन पडल्यासारखे वाटणे अशा काही घटनांमुळे आपण घाबरून जातो. काही जण तर माईल्ड हार्ट अॅटॅक येऊन गेला असावा अशी शक्यताही सहज व्यक्त करून मोकळे होतात. वास्तविक, हे प्रकार ‘इक्टॉपिक हार्टबीट’ असू शकतात. ही एक अशी अवस्था आहे, जेव्हा हृदय एका सामान्य ठोक्याच्या दरम्यान अचानक एक अतिरिक्त किंवा अर्ली बीट घेते. ही स्थिती सामान्यतः काही सेकंदांपुरती असते. ती बहुतेक वेळा धोकादायक नसली, तरी अचानक होणार्या अस्वस्थतेचे कारण काय आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
इक्टॉपिक बीट म्हणजे आपल्या नियमित हृदय ठोक्याच्या आधी किंवा मध्ये येणारा एक अनपेक्षित ठोका. काही जण याला हृदय थांबल्यासारखे वाटणे किंवा हृदयातील झटका असे वर्णन करतात. वैद्यकीय भाषेत याला एक्स्ट्रा सिस्टोल किंवा प्रिमॅच्युअर काँट्रॅक्शन असेही म्हणतात. हे ठोके हृदयाच्या वरच्या चेंबर्समधून येत असतील, तर त्यांना प्रिमॅच्युअर अट्रायल काँट्रॅक्शन्स म्हणतात आणि खालच्या चेंबर्समधून येत असतील, तर प्रीमॅच्युअरल व्हेंट्रीक्युलर काँट्रॅक्शन्स म्हणतात.
अनेकदा हे ठोके काही अगदी सामान्य कारणांमुळे होतात. उदाहरणार्थ, कॅफिन (कॉफी, चहा यांचे अतिसेवन), मद्यपान, ताणतणाव किंवा चिंता, तंबाखू किंवा इतर उत्तेजक पदार्थ, अतिव्यायाम, काही विशिष्ट औषधे किंवा ड्रग्ज, रक्तातील क्षार कमी होणे, पोटॅशियमचा अभाव, हृदयाचा आकार वाढलेला असणे यासारखी कारणे यामागे असू शकतात. बहुतांश वेळा ही कारणे तात्पुरती असतात आणि त्यामध्ये कोणताही दीर्घकालीन धोका नसतो. लहान मुले, तरुण आणि आरोग्यदायी प्रौढांमध्येही या बीटस् अधूनमधून होऊ शकतात आणि त्या पूर्णतः निरुपद्रवी असतात. प्रत्येक व्यक्तीला याचा अनुभव वेगवेगळ्या प्रकारे होतो. हे फक्त एका क्षणासाठी जाणवतं आणि लगेच सर्व काही पूर्ववत होतं; पण वारंवार असे अनुभव येत असतील, तर थोडी काळजी घ्यावी लागते.
हे जीवघेणे आहे का? तर, बहुतेक वेळा नाही. ही अतिशय सामान्य गोष्ट आहे, विशेषतः तुम्ही आरोग्यदायी असाल तर. हृदयाला याचा कुठलाही धोका नाही आणि ही एखाद्या गंभीर हृदयविकाराची खूण देखील नसते. हार्वर्ड मेडिकल स्कूल येथील कार्डिओलॉजिस्ट डॉ. अल्फ्रेड ई. बक्स्टन यांच्या मते, जेव्हा रुग्णांना ही बीटस् जाणवतात, तेव्हा मी त्यांना सांगतो की, हे त्यांच्या हृदयाच्या आरोग्याचं लक्षण आहे. कारण, एखादे कमजोर हृदय असे प्रकार सहन करू शकत नाही. अर्थात, काही अपवाद असतात. एखाद्याला पूर्वीपासूनच हृदयाचे आजार असतील, हृदयाचे स्नायू कमजोर असतील, तर हे बीटस् सतत आणि वारंवार जाणवू शकतात. अशावेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक असते. विशेषतः बेशुद्ध होणे किंवा चक्कर येणे, सतत छातीत दुखणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, साध्या उपायांनीही आराम न होणे असे प्रकार दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला तातडीने घ्यावा. सतत पडणारे असामान्य ठोके ही हृदयाच्या झटक्याची पूर्वसूचना असू शकते.