डोकेदुखीवर उपाय म्हणून अनेक जण गोळ्या घेतात. औषधाच्या दुकानात जाऊन डोकेदुखीवरची गोळी घ्यायची असे बहुतेकजण करतात. मात्र डोकेदुखीवर काही घरगुती उपाय अगदी चपखल परिणाम करतात.
शरीरातील पाण्याचे प्रमाण : डोकेदुखी आणि मायग्रेन याचे प्रमुख कारण असते ते शरीरातील पाणी कमी होणे. शारिरीक आरोग्य चांगले रहावे यासाठी शरीरात पाण्याचे प्रमाणे योग्य असले पाहिजे. त्यासाठी योग्य प्रमाणात पाणी, फळांचे रस, नारळ पाणी प्यावे. कॅफिनयुक्त पेये जसे चहा आणि कॉफी यामुळे शरीरातील पाणी कमी होते.
समतोल आहार : आपल्या शरीराला जीवनसत्व आणि खनिजे यांची गरज असते. त्यासाठी आपण समतोल आहार घेणे महत्त्वाचे आहे. जेवणाच्या वेळा पाळणे हेही महत्त्वाचे आहे कारण अवेळी जेवल्याने आरोग्यावर विपरीत
परिणाम होतोच. मेंदूचे कार्य योग्यरितीने चालावे यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते. आणि ग्लुकोजच्या कमतरतेमुळे हायपोग्लाकेमिया होतो डोकेदुखीला सुरुवात होते.
पुरेशी झोप : दररोज रात्री आठ तासांची पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. अपुर्या झोपेमुळे आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळू शकते. अपुरी झोप किंवा मध्ये मध्ये जाग येणे यामुळे तणाव वाढून डोकेदुखीला सुरुवात होते.
हेड मसाज किंवा डोक्याला मालिश करा : डोके जिथे दुखते आहे तिथे अंगठ्याने किंवा तर्जनीने थोडा दाब द्या. मालिश केल्याने घट्ट झालेले स्नायू मोकळे होतात आणि रक्ताभिसरणात सुधारते.
गरम पाण्याने अंघोळ : कोमट पाण्याने डोके धुवावे आणि मानेवरून पाठीवरून पाणी जाऊ द्यावे. त्यामुळे स्नायूंचे आखडणे कमी होते आणि रक्ताभिसरण वाढते.
आराम करा : स्नायूंना आराम मिळणे आणि तणाव दूर होणे आवश्यक आहे. त्यामुळे डोके दुखत असेल तर डोळे मिटून थोडावेळ शांत आराम करा.
– विजयालक्ष्मी साळवी