डॉ. प्राजक्ता पाटील
सर्वसाधारण स्त्रीला मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती येण्याचे वय असते 45 ते 50 वर्षे; पण काही स्त्रियांमध्ये मात्र या वयोमर्यादेआधीच रजोनिवृत्ती येते. यामुळे त्यांना अनेक शारीरिक मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, वेळीच यावर उपाय केल्यास ही समस्या बरी होते. प्री मॅच्युअर मेनोपॉज किंवा वेळेआधी रजोनिवृत्तीची कारणे आणि लक्षणे तसेच उपचारांविषयी जाणून घेऊया.
विशिष्ट वयानंतर प्रत्येक स्त्रीला रजोनिवृत्तीला सामोरे जावे लागते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्या देशात रजोनिवृत्ती येण्याचे सर्वसाधारण वय हे 49 वर्षांचे आहे, तर युरोपिय देशांमध्ये हे वय 51 वर्षे आहे. रजोनिवृत्तीचा हा टप्पा म्हणजे स्त्रीच्या बीजाशयात बीजनिर्मिती होणे बंद होते. सामान्यतः, बीजाशयातून दर महिन्याला एक अंडे बाहेर पडते आणि त्यानंतर ते बीजनलिकेत किंवा फिलोपियन ट्यूबमध्ये येऊन थांबते. या काळात स्त्रीचे लैंगिक संबंध प्रस्थापित झाले आणि पुरुषाच्या बीजाशी किंवा स्पर्मशी त्याचा संयोग झाला, तर हे अंडे फलित होऊन मग ते गर्भामध्ये येते आणि गर्भधारणा होते; पण अंडे फलित न झाल्यास गर्भाशयात तयार झालेले आवरण गळून पडते त्याला मासिक पाळी येणे म्हणतात. दर महिन्याला ही प्रक्रिया सुरू असते. जोपर्यंत बीजाशयातील अंडी संपत नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया अखंडपणे सुरू राहते. जेव्हा ही प्रक्रिया थांबते, मंदावते तेव्हा त्याला रजोनिवृत्ती येणे असे म्हणतात. रजोनिवृत्तीनंतर मासिक पाळी येणे बंद होते किंवा त्याचे प्रमाण कमी होते. त्यानंतर महिलेला गर्भधारणा होऊ शकत नाही; पण अनेक महिलांमध्ये मात्र या वयोमर्यादेआधीच म्हणजे 45 वर्षांच्या आधीच बीजाशयातील बीजे संपतात. त्यालाच वैद्यकीय भाषेत प्री मॅच्युअर मेनोपॉज म्हणतात. प्री मॅच्युअर मेनोपॉज आला तर महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.
लक्षणे : प्री मॅच्युअर मेनोपॉजच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये स्त्रीमध्ये मासिक पाळी अनियमित होऊ लागते. महिन्यातून एकदा किंवा तीन-चार महिन्यांतून एकदा अशी पाळी येऊ लागते आणि हळूहळू पाळी बंद होते. अशावेळी महिलांमध्ये काही लक्षणे दिसून येतात. हॉट फ्लशेज किंवा खूप गरम होणे, जीव घाबरा होणे, रात्री झोप न लागणे, स्वभाव चिडचिडा होणे, योनी कोरडी पडल्याने खाज येणे, तसेच खोकताना लघवी थांबवू न शकणे, स्तनांमध्ये सूज येणे आणि हलक्या वेदना होतात. त्याशिवाय महिलांमध्ये अनेक प्रकारचे शारीरिक बदल येऊ लागतात. मानसिकदृष्ट्या या गोष्टीसाठी तयार नसल्याने तणाव, नैराश्यासारखे मानसिक, भावनिक विकारही पाहायला मिळतात. प्री मॅच्युअर मेनोपॉजमुळे ऑस्टियोपोरोसिस आणि हृदयरोगाचा धोकाही वाढतो. रक्तवाहिन्यांमध्ये अॅस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होणे आणि लिपिड रक्तातील चरबी वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते. हाडांची घनता कमी झाल्याने हाडे ठिसूळ होतात.
कारणे : प्री मॅच्युअर मेनोपॉज किंवा मुदतपूर्व रजोनिवृत्ती येण्यास अनेक कारणे आहेत. त्यात उशिरा लग्न होणे आणि मूलही उशिरा होणे; त्यात महिलेच्या गर्भधारणा क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे प्री मॅच्युअर मेनोपॉजची शक्यता वाढते.
हल्ली ओव्हेरियन फेल्युअरच्या घटना पाहायला मिळतात. अनेक स्त्रिया आयव्हीएफ, आयव्हीआय करून घेतात. त्यामुळे एका वेळेला 5-5 बीजे बाहेर पडतात. अशा स्त्रियांमध्येही रजोनिवृत्ती लवकर येत असल्याचे दिसून येते. कारण, बीजांडातील बीजे लवकर संपतात.
* थायरॉईड, मधुमेह, रक्तदाब, ओव्हरी इन्फेक्शनसारख्या आजारांचा परिणाम बीजकोषावर होतो.
* कर्करोगाच्या आजारपणात किमोथेरपी किंवा रेडिओथेरपीचा प्रभाव ओव्हरीवर झाला तरीही प्री मॅच्युअर मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती येते. या गंभीर आजारांच्या उपचारादरम्यान घेतल्या जाणार्या औषधांमुळेही बीजकोषाचे नुकसान होते.
* कर्करोग किंवा कोणत्याही कारणाने गाठ किंवा सिस्ट होऊन गर्भाशय काढून टाकावे लागले आणि त्याचबरोबर बीजकोषही काढून टाकावे लागते तर रजोनिवृत्ती लवकर येते.
उपचारांची दिशा : सर्वात प्रथम म्हणजे स्त्रीची संपूर्ण तपासणी केली जाते. स्त्रीचा कौटुंबिक वैद्यकीय इतिहास, सद्यपरिस्थिती या सर्वांच्या मदतीने उपचार केले जातात. मेमोग्राफी केली जाते त्यामधून स्तनांवर काही वाईट परिणाम झालेला नाही ना याचा विचार केला जातो. हाडांच्या घनतेची चाचणी केली जाते, जेणेकरून स्त्रीला ऑस्टियोपोरोसिस नाही ना याची तपासणी केली जाते. अल्ट्रासाऊंड तपासणी करून लिव्हर, मूत्रपिंड यांची स्थिती ठीक आहे ना तपासले जाते.
स्त्री जर गर्भवती असेल तर एका नव्या थेरपीचा वापर केला जातो. त्याला स्टेम सेल थेरपी म्हटले जाते. त्यात गरजवंत महिलेची दुर्बीण किंवा लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानाद्वारे बोन मॅरोमधून बीजनलिकेतील बीज स्टिम्युलेट करून काढून टाकली जातात. त्यांच्यावर प्रक्रिया करून ती पुन्हा स्त्रीच्या बीजकोषात टाकली जातात. त्यामुळे स्त्रीचे बीजकोष पुन्हा काम करू लागते याचा अर्थ बीजांडनिर्मितीची प्रक्रिया पुन्हा सुरू होते; पण प्री मॅच्युअर मेनापॉज आलेल्या म्हणजे मुदतपूर्व रजोनिवृत्ती आलेल्या महिलांना पुुढे मुल नको असेल; पण त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास कमी करायचा असेल तर अशा महिलांना हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी दिली जाते. ही उपचारपद्धती प्रभावी असल्याचे मानले जाते. तणाव, नैराश्य येऊ नये म्हणून अँटिडिप्रेशन औषधे दिली जातात. त्यामुळे रुग्णाला आराम मिळतो.
सावधानताः प्री मॅच्युअर मेनापॉज किंवा मुदतपूर्व रजोनिवृत्तीमुळे ज्या समस्या होतात, त्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी सातत्याने 2-3 वर्षे घ्यावी लागते. सुरुवातीला या उपचारांचे काही दुष्परिणामही दिसून येतात. जसे डोकेदुखी, पचनक्रियेत गडबड, यकृतावर प्रभाव पडणे. अर्थात हे दुष्परिणाम दीर्घकालीन नाहीत. हळूहळू हे प्रभाव कमी होतात आणि शरीर उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देऊ लागते. वेळेआधी रजोनिवृत्ती होऊ द्यायची नसेल तर जीवनशैलीत काही बदल करावे लागतात. जसे तणावमुक्त जीवन, कामात व्यग्र राहाणे, आवडीची कामे करणे, पौष्टिक आणि संतुलित आहार सेवन करणे. तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिक हालचाल व्यायाम करणे, नियमितपणे वैद्यकीय तपासणी करणे आणि कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घेणे आवश्यक आहे.