

ओटाइटिस मीडिया हा मध्यकानाचा संसर्ग आहे, जो विशेषतः लहान मुलांमध्ये आढळतो. हा संसर्ग जीवाणू किंवा विषाणूंमुळे होतो. प्रामुख्याने सर्दी, गळ्याचा संसर्ग किंवा श्वसनसंस्थेच्या इतर त्रासांमुळे हा त्रास उद्भवतो. योग्य वेळी उपचार न केल्यास, हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो आणि ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो. ओटाइटिस मीडिया म्हणजे कानाच्या मध्यभागी (मधल्या कानात) होणारी जळजळ किंवा संसर्ग. कानातील युस्टेशियन ट्यूब या नलिकेमध्ये अडथळा आल्याने द्रव साचतो आणि त्यात जीवाणू किंवा विषाणूंची वाढ होते.
सर्दी किंवा घशाचा संसर्ग ः श्वसनसंस्थेतील संसर्गामुळे कानात द्रव साचतो.
अॅलर्जी ः धूळ, धूर किंवा इतर प्रदूषकांमुळे युस्टेशियन ट्यूब सुजते.
जैविक रचना ः लहान मुलांच्या युस्टेशियन ट्यूब लहान आणि सरळ असल्याने संसर्गाचा अधिक धोका असतो.
हवेतील बदल ः विमानप्रवास किंवा उंच ठिकाणी जाण्यामुळे कानाचा दाब बदलू शकतो.
कानात तीव्र वेदना, ऐकण्यास त्रास होणे, ताप येणे, कानातून पू किंवा पाणी येणे, संतुलन बिघडणे, लहान मुलांमध्ये सतत रडणे किंवा कानाला हात लावणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत.
हा संसर्ग जीवाणूंमुळे झाला असल्यास डॉक्टर अँटिबायोटिक्स देऊ शकतात. कानाजवळ गरम कपड्याने शेक दिल्यास वेदना कमी होऊ शकतात. युस्टेशियन ट्यूब मोकळी राहण्यासाठी आणि द्रव निचरा होण्यासाठी पाणी किंवा सूप घेणे फायदेशीर ठरते. वारंवार संसर्ग होत असल्यास, कानात एक छोटी नलिका बसवण्याची आवश्यकता लागू शकते.
* सर्दी आणि घशाच्या संसर्गावर वेळीच उपचार करणे
* लहान मुलांना धूर किंवा प्रदूषित हवेमध्ये जाऊ न देणे
* हायजिन (स्वच्छता) राखणे
* लहान मुलांना स्तनपान देणे, कारण त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
ओटाइटिस मीडिया हा साधारणपणे गंभीर नसला तरी वेळीच उपचार न केल्यास तो ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.