कान दुखत असेल तर ‘हा’ करा उपाय!

Published on
Updated on

डॉ. संजय गायकवाड

बाहेरून येणारा ध्वनी मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करणार्‍या कानांच्या आरोग्याबाबत बहुतांश व्यक्‍ती निष्काळजी असतात; परंतु बरेचदा कानांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. 

कानाचे आजार अनेक जण बहुतेक वेळा गांभीर्याने घेत नाहीत. कान दुखणे किंवा त्यामध्ये पू होणे, तसेच मुलांच्या कानाच्या पडद्यामागे पाणी भरणे ही सामान्य समस्या आहे. या समस्येकडे पालक गंभीरतेने बघत नाहीत. तुम्हाला जाणून आश्‍चर्य वाटेल; पण लोकांना जितक्या वेळा चक्‍कर येण्याचा त्रास होतो तो 90 टक्के कानातील काही आजारांमुळेच होतो. ऐकण्यासोबतच कानाचा उपयोग शरीराला संतुलित ठेवण्यासाठीही होतो. काही वेळा कानामागून निघणारा पू कानाच्या हाडांनादेखील कमकुवत बनवतो. ज्यामुळे हा पस मेंदूमध्ये जातो. यामुळे मेंदूज्वर होतो आणि हा आजार धोकादायक बनतो. म्हणूनच यापासून बचाव होण्यासाठी कानाला वेळोवेळी स्वतःच साफ करणे आवश्यक असते. तसेच मुलांच्या कानाचीही तपासणी करत राहावी.  मूल जर कानामध्ये दुखण्याची तक्रार करत असेल, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. कानात काही तरी त्रास आहे, याची लक्षणे म्हणजे कानात घाण तयार होणे, कमी ऐकू येणे, खाज येणे, पू भरणे, पाणी भरणे इत्यादी.

कानाच्या आत एक प्रकारचे वंगण असते. त्याला सिटोमिन असे म्हणतात. हे सिटोमिन कानातील घाण बाहेर काढण्याचे काम करत असते. कानात सिटोमिन बनणे कमी झाले किंवा बंद पडले, तर कानात घाण जमणे सुरू होते. त्याला वॅक्स असे म्हणतात. हे वॅक्स सुकल्यामुळे कानात जखम किंवा पू बनणे सुरू होते. याकड दुर्लक्ष केले, तर रुग्णाला कमी ऐकू येऊ लागते. कानाच्या पडद्यामध्ये छिद्र पडते. आजार आणि दुसर्‍या प्रकारच्या संक्रमणांमुळेदेखील कानाच्या पडद्याला छिद्र पडते. संक्रमणानंतर सर्दी, पडसे झाल्यास पू बनू लागतो.

कानाच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी कानाचे नियमित स्वच्छता करत राहावी. स्वच्छतेसाठी कापूस पाण्यात बुडवून मुलायम बनवून घ्यावा. त्याद्वारे साफ करावे. कानात स्पिरिट किंवा हायड्रोजन पॅरॉक्साईड यांसारख्या रसायनांचा प्रयोग अजिबात करू नये. मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. कानात दुखण्याची किंवा खाज होण्याची तक्रार मुले करत असतील तर त्याकडे गांभीर्याने बघावे. कानामध्ये कुठलीही समस्या असल्यास कान, घसातज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कानाच्या आजारांमध्ये होणार्‍या तक्रारी म्हणजे कानात वॅक्स बनणे, कानाच्या पडद्याला छिद्र पडणे, कानाच्या आजारामुळे चक्‍कर येणे, जन्मजात बहिरेपण, मुलांच्या कानाच्या पडद्यामागे पाणी भरणे ज्याला ग्लू एअर म्हणतात. कानाच्या आजाराचे इलाज संभव आहेत. 

कानाच्या पडद्याला असणारे छिद्रदेखील शस्त्रक्रियेद्वारे ठीक केले जाऊ शकते. हे छिद्र छोटे असेल, तर औषधानेदेखील बरे होऊ शकते. आज जन्मजात बहिरेपण असणार्‍या मुलांवरदेखील इलाज करणे संभव झाले आहे.  या तंत्राला कॉकलिअर इम्प्लांट असे म्हणतात. मुलाच्या जन्मानंतर तीन-चार वर्षांतच त्याला ऐकू येत नाही, असे समजले, तर शस्त्रक्रियेनंतर तो मुलगा सामान्य मुलांप्रमाणेच ऐकू शकतो.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news