Hot Tea | वाफाळलेला चहा पिताय? सावधान! 'या' एका सवयीमुळे ओढवू शकतो कॅन्सरचा धोका

Hot Tea |
Hot Tea | वाफाळलेला चहा पिताय? सावधान! 'या' एका सवयीमुळे ओढवू शकतो कॅन्सरचा धोकाFile Photo
Published on
Updated on

लीमा महाजन, आहारतज्ज्ञ

भारतात चहा हे केवळ एक पेय नसून तो अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोणाची दिवसाची सुरुवात चहाने होते, तर कोणाला दिवसभरात वारंवार चहा पिण्याची सवय असते. मात्र, तुम्ही जर वाफाळलेला, अतिशय गरम चहा पिण्याचे शौकीन असाल, तर तुमची ही एक सवय तुम्हाला भविष्यात गंभीर आजाराचा रुग्ण बनवू शकते.

चहा आणि कॅन्सरचा काय आहे संबंध?

धोका चहा किंवा कॉफीमध्ये नाही, तर तो या पेयांच्या टेंपरेचरमध्ये (तापमान) दडलेला आहे. जेव्हा आपण अतिशय गरम चहा, कॉफी, सूप किंवा अगदी गरम अन्न सेवन करतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या अन्ननलिकेवर होतो. अतिउष्ण पेयांमुळे अन्ननलिकेच्या आतील नाजूक आवरणाला इजा पोहोचते. यामुळे इसोफेगस स्क्वॅमस सेल कार्सिनोमा होण्याचा धोका कैक पटीने वाढतो. हा कर्करोगाचा असा प्रकार आहे जो अन्ननलिकेवरील थरातील पेशींमध्ये विकसित होतो.

संशोधन काय सांगते?

आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या विविध संशोधनांनुसार, जर एखाद्या पेयाचे किंवा अन्नाचे तापमान 65 अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणूनच, इंटरनॅशनल एजन्सी फॉर कॅन्सर रिसर्चने अतिशय गरम पेयांना ग्रुप 2 ए कार्सिनोजेनिक श्रेणीत ठेवले आहे. याचा अर्थ असा की, ही सवय लगेच कॅन्सर निर्माण करत नाही; पण दीर्घकाळ ही सवय कायम राहिल्यास भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यता दाट असते.

कसा करावा बचाव?

पेय थोडे कोमट होऊ द्या : चहा किंवा कॉफी कपात ओतल्यानंतर ती लगेच न पिता काही मिनिटे थांबणे हिताचे आहे. वाफ कमी झाल्यानंतर आणि पेयाचे तापमान थोडे कमी झाल्यावरच त्याचे सेवन करावे.

अन्नाच्या बाबतीतही खबरदारी : केवळ चहाच नाही, तर अतिशय गरम दलिया, सूप किंवा जेवण खाणे टाळावे.

चहा वाईट नाही, सवय बदला : चहा स्वतःहून कॅन्सर निर्माण करत नाही, त्यामुळे तो पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. फक्त तो पिताना तो खूप गरम नसावा, याची काळजी घेणे पुरेसे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news