

डॉ. मनोज शिंगाडे
वायू प्रदूषणामध्ये सूक्ष्म कण, धूर, धूळ, रासायनिक वायू आणि वाहनांमधून बाहेर पडणारे उत्सर्जन यांसारख्या घातक घटकांचे मिश्रण असते. हे सर्व घटक थेट डोळ्यांच्या पृष्ठभागाच्या संपर्कात येतात आणि अश्रूंच्या थराला विस्कळीत करतात. आपल्या डोळ्यांतील अश्रूंचा थर तेल, पाणी आणि श्लेष्म अशा तीन थरांनी बनलेला असतो जो डोळ्यांना वंगण आणि संरक्षण देतो. हवेतील प्रदूषकांमुळे या थरांचा समतोल बिघडतो आणि डोळ्यातील ओलावा वेगाने बाष्पीभवनाने उडून जातो, ज्यामुळे डोळ्यांत अस्वस्थता जाणवू लागते.
प्रदूषणामुळे डोळ्यांवर होणार्या परिणामांची अनेक कारणे आहेत. प्रदूषकांमुळे अश्रूंच्या थरातील वंगण गुणधर्म कमी होऊन डोळे लवकर कोरडे पडतात. तसेच धूर आणि रसायनांमुळे डोळ्यांच्या बाहेरील आवरणाला सूज येते, ज्यामुळे अश्रू तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. प्रदूषित वातावरणात असताना धूळ आणि इतर कण डोळ्यांत जाऊ नयेत यासाठी आपण नकळतपणे पापण्यांची उघडझाप कमी करतो, ज्यामुळे अश्रू डोळ्यांवर व्यवस्थित पसरत नाहीत.
प्रदूषणामुळे डोळ्यांत कोरडेपणा किंवा काहीतरी टोचल्यासारखे वाटणे, जळजळ होणे, डोळे लाल होणे आणि प्रकाशाचा त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. विशेषतः कॉन्टॅक्ट लेन्स वापरणार्या व्यक्ती, वृद्ध लोक, बाहेर काम करणारे कामगार आणि आधीच डोळ्यांच्या अॅलर्जीचा त्रास असलेल्या रुग्णांना प्रदूषणाचा फटका अधिक बसतो. प्रदूषणापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी काही व्यावहारिक उपाय करणे आवश्यक आहे. बाहेर जाताना डोळ्यांच्या बाजूने बंद असणारे चष्मे किंवा सनग्लासेस वापरल्याने धूळ आणि सूक्ष्म कणांपासून संरक्षण मिळते.