नितंबांमधील वेदनांकडे दुर्लक्ष नको | पुढारी

Published on
Updated on

डॉ. मनोज कुंभार

कंबर, मान आदींचे दुखणे कधी ना कधी सगळ्यांच्या अनुभवाचे असते. रोजच्या धबगड्यात ही दुखणी येतात आणि त्यावर तात्पुरता इलाज करून ती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, नितंब किंवा कुल्याचे दुखणे हे अगदी गुपचुप आपल्या आयुष्यात येते; पण त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. कंबर, पाठ आदी दुखण्यांचा परिणाम म्हणून किंवा अतिथकव्यामुळे आलेले दुखणे म्हणून आपण त्याकडे पाहतो. काही वेळा आपल्याला ते प्रकर्षाने जाणवत नाही, मात्र वेदना होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

कंबरदुखी, मानदुखी प्रमाणेच एक दुखणे म्हणजे नितंबाचे दुखणे. कंबर दुखीचा परिणाम म्हणून होत असेल अशी आपण समजूत करून घेतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नितंबाचे दुखणे हे गंभीर असू शकते. नितंब वेदना होणारे रुग्ण जास्त नसतील पण नितंबाच्या वेदना होणारे रुग्ण असतात, मात्र गांभीर्य न समजल्याने त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे नितंबाच्या वेदनांची लक्षणे ओळखून ते टाळण्यासाठी प्रयत्न करणे तसेच त्यावर उपचार करणेही आवश्यक आहे. 

शरीराच्या रचनेनुसार नितंबांच्या हाडांमध्ये एक प्रकारचा द्रव पदार्थ असतो, ज्याला आपण वंगन असेही म्हणतो. या द्रव पदार्थांच्या मदतीने नितंबांची हाडे सहजपणे काम करू शकतात. वय वाढते तसे किंवा इतरही कारणांनी जेव्हा हाडांमधील हा द्रव पदार्थ कमी होतो तेव्हा नितंबांमध्ये वेदना होऊ लागतात. त्यामुळे दोन हाडांदरम्यान घर्षण होऊ लागते. त्यामुळे हाडे कमजोर होतात आणि हाडे तुटू शकतात. मग नितंबांच्या साध्यांचे दुखणे सुरू होते. 

अशी ओळखा लक्षणे : नितंबांमध्ये वेदना होण्याची अनेक कारणे आहेत. ही कारणे काही वेळा चटकन लक्षात येत नाहीत; पण नितंबामधील वेदनांमुळे मांड्यांमध्ये तीव्र वेदना होतात. काही वेळा नितंबांच्या सांध्यांमध्येही वेदना होतात. काही वेळा शरीराच्या इतर भागापर्यंत या वेदना जाऊन पोहोचतात. खूप वेगाने काम केल्यास या वेदना वाढत असल्याचे दिसून येते. अशा वेळी डॉक्टरांकडून तपासून सल्ला घेणे हा उत्तम पर्याय आहे. 

योग्य आहार आणि शेकणे :

नितंबातील वेदना होण्याचे मुख्य काणर आहे ते म्हणजे कॅल्शिअम आणि डी जीवनसत्त्वाची कमतरता, वाढते वय आणि व्यायामाचा अभाव. त्याव्यतिरिक्‍त अतिगोड खाण्यामुळेही त्रास होऊ शकतो. सर्वसाधारणपणे ही समस्या आपण वात विकारामध्ये समाविष्ट करतो. शौचाला साफ होत नसेल तर ही समस्या होऊ शकते. थोडक्यात आतडे स्वच्छ राहणे आवश्यक आहे. आहार योग्य असावा, त्यासाठी अल्कलाईन आहार घेतला पाहिजे. कॅल्शिअमयुक्‍त आहार असला पाहिजे. त्यात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असला पाहिजे. त्याचबरोबर तिळाचे सेवन केले पाहिजे. त्यासाठी तीळ भिजवून ते वाटून त्यात कणीक भिजवून त्याची पोळी करावी. मेथीचे सेवन करावे. तंतुमय घटक असलेल्या कणकेचे सेवन करावे. वेदना होत असतील तेव्हा शेकावे. अर्थात नितंबांच्या वेदनांचे दुखणे जुने आहे का याचीही तपासणी करणे आवश्यक असते. जर दुखणे जुने नसेल तर गरम पाणी किंवा थंड पाणी कोणत्याही एकाने शेकता येते. 3 मिनिटे गरम पाणी आणि 1 मिनिट गार पाणी असा शेक घ्यावा. चार वेळा अशा पद्धतीने शेकावे. वेदना जुनाट असतील तर स्टीम बाथ आणि मालिश करणे परिणामकारक ठरते. मालिश करायला तिळाच्या तेलाचा वापर केला पाहिजे. सांध्यांचे चलनवलन चांगले राहावे म्हणून पुरेसे पाणी सेवन करण्याची गरज असते. 

काही बाबतीत मात्र डॉक्टरांशी भेट गरजेची आहे. 

* नितंबातील वेदनांमुळे दैनंदिन कामे करण्यात अडचण येत असेल

*  बसताना देखील अडचण येत असेल

*  वेदनेबरोबर थोडी कणकण असेल

*  नितंबांच्या सांध्यांची ठेवण बिघडत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अनिवार्य आहे. 

शरीराच्या कोणत्याही भागात जेव्हा वेदना होतात त्याला कारण असते त्या ठिकाणच्या नैसर्गिक सामान्य संरचनेत झालेला बदल. शरीराच्या नैसर्गिक ठेवणीत बदल होण्याचे कारण एखादी इजा असू शकते. स्नायू कडक झाल्यासही वेदना होतात. शरीरात सांध्याच्या आत जे स्नायू असतात त्यामध्ये काठीण्य आले तरीही वेदना होतात. त्यावेळी स्नायूंना आराम मिळाला पाहिजे. नितंबांच्या वेदनेमध्येही हीच गोष्ट अवलंबिली पाहिजे. अर्थात  नितंबाच्या वेदना होणार्‍या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. शंभरातील पाच ते दहा रुग्णांना या वेदना जाणवतात. अर्थात रुग्णांची संख्या इतकी कमी असली तरीही त्याकडे दुर्लक्ष करणे नक्‍कीच चुकीचे आहे. कारण या वेदना भविष्यात गंभीर समस्या निर्माण करू शकतात. काही वेळा तपासणीअंती लक्षात येते की, रुग्णाच्या मणक्यातील चकती सरकलेली असते. अनेकदा नितंबातील सांध्यांमध्ये रक्‍तपुरवठा कमी होत असल्याने वेदना होतात परिणामी सांध्यांना इजा होते. त्या व्यतिरिक्‍त ज्या लोकांना व्यसनाची सवय असते ही समस्या भेडसावते. काही वेळा मात्र दुर्लक्ष झाल्यास नितंबांच्या सांधे बदल शस्त्रक्रिया करावी लागते. त्यामुळे या वेदनांकडे दुर्लक्ष करणे किंवा मनमर्जीने कोणत्याही प्रकारचा व्यायाम करून त्या वेदना बर्‍या करण्याचा प्रयत्न करणे, असे कोणतेही प्रयत्न करू नये. एखाद दोन दिवसांपेक्षा वेदना अधिक काळ राहत असतील तर वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क करावा. 

ऑस्टियोआर्थरायटिसही असू शकते कारण : नितंबांच्या वेदना ऑस्टियोआर्थरायटिसमुळेही होऊ शकतात. त्याव्यतिरिक्‍त जखम किंवा इजा झाल्यास देखील ही समस्या उद्भवू शकते. बॉल जॉईंटमध्ये काही गडबड असल्यासही नितंबांमध्ये वेदना होऊ शकतात. अनेक प्रकरणांत रक्‍ताचा प्रवाह कमी होतो तेव्हा ही समस्या उद्भवते. अति धूम्रपान केल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. ज्या व्यक्‍ती दीर्घकाळ स्टेरॉईडस घेतात त्यांच्याही सांध्यावर याचा परिणाम होतो. त्यामध्ये संपूर्ण नितंबच बदलावे लागते त्याला हिप ऑर्थ्रोप्लास्टी म्हटले जाते.  

शरीराच्या कोणत्याही अवयवाचे दुखणे दुर्लक्षित करूच नये, त्यातही नितंबांचे दुखणे हे कमी प्रमाणात असल्याने त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असतेच मात्र तरीही जाणीवपूर्वक अशा वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास दुखणे वाढण्यास अटकाव होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news