प्रमोद ढेरे
बर्याच जणांचे असे म्हणणे आहे की आयुर्वेदानुसार जेवताना व जेवणानंतर लगेच पाणी न पिता जेवणानंतर साधारण एका तासांनी पिले पाहिजे हे जरी खरे असले तरी आम्ही जेवताना पाणी पिल्याशिवाय जेवणच करू शकत नाही. अशी बर्याच जणांची समस्या आहे.
खरं तर जेवत असताना आपण पोटाचे चार भाग करावेत. आर्धा भाग घन अन्नपदार्थ म्हणजे पोळी-भाजी-भात, पाव भाग द्रव अन्नपदार्थ म्हणजे कालवण किंवा रस्सा व पाव भाग रिकामा असायला हवा. त्यामुळे पचनही चांगले व्हायला मदत होते व जेवताना पाणी पिण्याची गरज भासत नाही. मात्र, तरीही बर्याच जणांना जेवताना पाणी पिल्याशिवाय जेवणच जात नाही. अशांसाठीसुद्धा आयुर्वेदामध्ये पर्याय दिलेले आहेत. ते कोणते? तर तुमच्या सकाळच्या जेवणासोबत द्रव पदार्थाचे सेवन म्हणून तुम्ही फळांचा रस पिऊ शकता, तुमच्या दुपारच्या जेवणासोबत द्रव पदार्थाचे सेवन म्हणून तुम्ही ताक पिऊ शकता व तुमच्या रात्रीच्या जेवणानंतर द्रव पदार्थाचे सेवन म्हणून रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी दूध पिऊ शकता. अशा प्रकारे द्रव पदार्थांचे सेवन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये परवानगी देण्यात आली आहे. कारण यामुळे तुम्हाला द्रव पदार्थांच्या सेवनाचे समाधान तर मिळतेच पण तुमच्या शरीरातील त्रिदोष म्हणजेच वात-पित्त-कफ संतुलित राहून आपले आरोग्य चांगले राहते. मात्र, जेवणानंतर पाणी अजिबात पिऊ नये कारण आयुर्वेदानुसार 'भोजनांते विषंवारी'. म्हणजेच जेवणानंतर पाणी पिणे आयुर्वेदानुसार विषासमान मानले आहे कारण जेवणानंतर पाणी पिण्याने आपली जठराग्नी मंदावते व पचन व्यवस्थितपणे होत नाही व अन्न पचले नाही तर ते सडते व त्यातून अनेक विषारी द्रव्ये आपल्या शरीरात तयार होतात व त्यामुळेच आपण आजारी पडत असतो. अगदीच प्यायचे झाले तर चुळ भरण्यापुरते पाणी तोंडात घेऊन, तोंडात फिरवून मगच प्यावे.
सकाळी जेवणासोबत फळांचा ज्यूस, दुपारी जेवणासोबत ताक व रात्री जेवणानंतर दोन तासांनी दूध का प्यावे व त्यामुळे वात-पित्त-कफ हे त्रिदोष कसे काय संतुलित राहतात? तर सकाळी आपल्या शरीरात कफाचा प्रभाव वाढलेला असतो अशा वेळी जेवणासोबत फळांचा ज्यूस पिला तर कफाचा प्रभाव कमी होऊन त्रिदोष संतुलित व्हायला मदत होते. दुपारच्या वेळी आपल्या शरीरात पित्ताचा प्रभाव वाढलेला असतो. अशा वेळी जेवणासोबत ताक पिले तर पित्ताचा प्रभाव कमी होऊन त्रिदोष संतुलित व्हायला मदत होते. तर रात्रीच्या वेळी आपल्या शरीरात वाताचा प्रभाव वाढलेला असतो अशा वेळी दूध पिले तर वाताचा प्रभाव कमी होऊन त्रिदोष संतुलित व्हायला मदत होते. मात्र, रात्रीच्या जेवणानंतर दुधाचे सेवन जेवणानंतर दोन तासांनी करावे कारण जेवणामध्ये मीठ असते व दूध आणि मीठ एकत्र घेणे आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार आहे. रात्रीचे जेवण जर मांसाहारी असेल तर मात्र दूध पिणे टाळलेच पाहिजे कारण मांसाहारानंतर दूधही आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार आहे.
दुपारी जेवणासोबत ताक व रात्री जेवणानंतर दोन तासांनी दूध प्यायला सहज उपलब्ध होते. मात्र, सकाळी जेवणासोबत फळांचा ज्यूस किती लोकं पितात? 95% पेक्षा जास्त लोकं पित नाहीत म्हटले तरी चालेल. कारण आजच्या या धावपळीच्या युगात रोज दोन-चार प्रकारची फळं आणून त्याचा ज्यूस बनवणं बर्याच जणांना शक्य होत नाही. शिवाय विकतचा आणायचा झाला तर अगदी रोडवर गाड्यावरसुद्धा कमीतकमी वीस रुपयांना एक ग्लास ज्यूस मिळतो. त्यात पाणी कसलं असतं, बर्फ कसला असतो माहीत नाही. शिवाय तुम्हाला नुसता रस दिला जातो, चोथा टाकून देतात. खरं तर चोथा म्हणजे तंतूमय पदार्थ म्हणजेच फायबर आहे जे पचनासाठी गरजेचे असते. याशिवाय आज बाजारात जी फळं मिळतात ती बहुतांश कृत्रिम रासायनिक खते व कृत्रिम रासायनिक किटकनाशके वापरून वाढवलेली असतात. व्यापारीकरणामुळे ती फळं कच्ची असतानाच झाडावरून उतरवली जातात व कृत्रिम रसायनयुक्त पावडरनी पिकवली जातात. म्हणजे त्या माध्यमातून आपल्या शरीरात कृत्रिम रसायनयुक्त विषारी द्रव्ये जाण्याची जास्त शक्यता असते. यासाठी शक्यतो सेंद्रिय पदार्थांपासून तयार केलेला फळांचा रस घ्यायला हवा.